Sunday, June 20, 2021

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस 30 ते 44 वयोगटासाठी

कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस 45 वर्षावरील व्यक्तींना

जिल्ह्यातील 93 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 93 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस हा 30 ते 44 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. तर कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनची लस ही 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 21 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 9 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर व सिडको या 9 केंद्रावर कोविशील्डचा 30 ते 44 वयोगटासाठी पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, श्रावस्तीनगर (विजयनगर) या 4 केंद्रावर प्रत्येकी 70 डोस तर स्त्री रुग्णालय, दशमेश हॉस्पिटल, हैदरबाग येथे प्रत्येकी 30 डोस तर जंगमवाडी, शिवाजीनगर, सिडको येथे प्रत्येकी 20 डोस उपलब्ध करुन दिली आहेत. याठिकाणी 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 30 ते 44 वयोगटावरील व्यक्तींना पहिला डोस व प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी अशा एकुण 13 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार व बारड येथे प्रत्येकी 40 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस तर 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 19 जून पर्यंत एकुण 4 लाख 83 हजार 44 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 20 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 43 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 88 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींसाठी पहिल्या लसीकरणाला तर कोविशील्ड व कोव्हॅक्सीनचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रात 30 ते 44 वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन 50 टक्के नोंदणी व ऑनस्पॉट 50 टक्के नोंदणी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 34 व्यक्ती कोरोना बाधित

तर 39 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 632 अहवालापैकी  34 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 21 तर अँटिजेन तपासणीद्वारे 13 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 115  एवढी झाली असून यातील 88 हजार 367 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 271 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 901 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, देगलूर तालुक्यांतर्गत 1, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 2, धर्माबाद 1, परभणी 1, अर्धापूर 2, कंधार 1, बिलोली 1, लोहा 4 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, नायगाव 1, नांदेड 3, हिंगोली 2, बिलोली 1, किनवट 1 असे एकूण 34 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 39 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1, मुखेड कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 1, किनवट कोविड रुग्णालय 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 25, खाजगी रुग्णालयातील 8 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 271 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  21, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 3,  किनवट कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 4,  हदगाव कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 172, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 41, खाजगी रुग्णालय 12  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 121, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 131 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 89 हजार 824

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 87 हजार 198

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 115

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 367

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 901

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-154

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-271

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2                    

00000

 

या अस्वस्थ काळात मानसिक व आरोग्य स्थैर्यासाठी, योगाभ्यासच प्रभावी पर्याय - योग पंडित रमेश केंद्रे 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- काळ अस्वस्थ आहे. काळाचा अस्वस्थपणा मानवी वर्तवणुकीवर पडणे यात काही गैर नाही. पण याची तिव्रता जर अधिक वाढली तर याचा थेट परिणाम मानवी अस्वास्थ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोना सारख्या या भयावह काळात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मानसिकतेला अधिकाधिक स्थैर्य देऊन योगाकडे वळले पाहिजे, असे अग्रही प्रतिपादन योग पंडित रमेश केंद्रे यांनी केले. जागतिक योग दिवसानिमित्त त्यांनी आपल्या अनुभवासह कोरोनाच्या आघाताला सहन करीत मनस्वास्थ्य व आरोग्याविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत जिल्हा माहिती कार्यालयाशी संवाद साधून काही उपाय सुचविले.  

योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणारा एक भक्कम आधार आहे. कोणतीही व्यक्ती या दोन आधारावर भक्कमपणा साध्य करु शकते. स्वत:चे संपूर्ण शरीर संतुलीत ठेवून जसे दोन पायावर ताठ उभे राहणे शक्य आहे त्याच धर्तीवर मनाला शुद्ध ठेवल्याशिवाय व्यक्तीमत्व म्हणून, उत्तम आरोग्याचा साधक म्हणून उभे राहता येत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आव्हाने कितीही आली तरी एकवेळ शरीर स्वास्थ्य माणसाला टिकवता येऊ शकेल परंतू मनस्वास्थ्य टिकेल याची शाश्वती नाही. नोकरीमधील ताण-तणाव, कामातील गुणवत्ता साध्य न झाल्यास येणारी नैराश्यता या नैराश्यतेतून होणारी चिडचिड, एकमेकांवर प्रत्यारोप हे सारे मार्ग आयुष्याला उद्धवस्थ करणारे आहेत. यातून बाहेर पडण्याचा महत्वपूर्ण मार्ग म्हणून सारे जग आता योगाकडे पाहत असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. 

माणसाला अपघात आणि अनुवंशीक आजार जर सोडले तर जवळपास बहुतांश असे 87 टक्के विकार हे मनाच्या अस्थ्यैर्यातून निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. ज्याचे मन जितके खंबीर तो व्यक्ती आरोग्याच्यादृष्टिने तितका खंबीर हे आपण निट समजून घेतले पाहिजे. कोरोनाच्या या कालावधीत जे मनाने खंबीर होते ते अधिक लवकर सावरले, बरे झाले याकडे दूर्लक्षुन चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वास्थ्य म्हणजेच ज्यांचे वात, पित्त, कफ हे त्रिदोष समान आहेत. स्वास्थ्य म्हणजेच ज्यांचा अग्नी प्रदिप्त आहे. स्वास्थ्य म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी, शुक्रधातू समान आहेत. मल विसर्जन विनासायास पार पडते आणि इंद्रिय, मन, आत्मा प्रसन्न आहे म्हणजे स्वास्थ्य आहे अशी साधी व्याख्या योग पंडित केंद्रे यांनी सांगितले. 

शरीराला अधिक जर स्वास्थ्य पूर्ण करायचे असेल तर त्याचा उत्तम मार्ग हा योगा आहे. 'स्थिर सुखम् आसनम्' हे पातंजलीचे एक सुत्र आहे. ज्या स्थितीत बसल्यास शरीर, मन स्थिर होते ती आवस्था म्हणजे योग्य आसन असा याचा अर्थ घेता येईल. आसनांची संख्या 84 लाख इतकी असल्याबाबत एक विचारधारा आहे. एवढे सारी आसने प्रत्येकाला होतीलच असे नाही. परंतू 'स्थिर सुखम् आसनम्' श्लोकाप्रमाणे जमेल तेवढी आसने करणे अभिप्रेत आहे. दररोज नित्य नियमाने सकाळी रिकाम्या पोटी 45 मिनिटे योगाभ्यास केल्यास शरीर मानसिक आध्यात्मिक दृष्टिने समृद्ध होईल. योगाभ्यास वयाच्या 12 व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत कोणत्याही महिला-पुरुषाला करता येऊ शकते. यास धर्म, वंश, देश याचे बंधन नाही. व्यक्तीचे मन याने हलके होते. कार्यक्षमता आणि सकारात्मकता वाढीस लागते. दैनंदिन ताण तणाव निघून जातात, असे केंद्रे म्हणाले.

कोरोनाच्या काळात सारे महत्व श्वसनावर केंद्रीत झाले आहे. याचा पहिला घाला हा श्वसनावर होतो. फुफुसांवर होतो. हे लक्षात घेता नित्त्य प्राणायाम करणे किती आवश्यक आहे याचे महत्व प्रत्येकाला आता पटले आहे. म्हणूनच बहुतांश लोक हे योग साधनेकडे वळत आहेत. यात ओमकार आणि ध्यानधारणा महत्वाची आहे. ओम म्हणत असतांना अ+ऊ+म (2+3+5) प्रमाणात म्हटले तर आपल्या शरिरात नॅट्रिक ऑक्साईड अधिक प्रमाणात पाझरतो व विकारापासून मोठा दिलासा मिळतो. नित्य योगा करणे हे म्हणूनच आवश्यक आहे.

प्रत्येक व्यक्तींनी सुरवातीच्या काळात नकारात्मक भाव बाजुला ठेवून जितक्या लवकर सकाळी उठून योगा सुरु करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यातच शरीर स्वास्थ आणि मनस्वास्थ्याचा मार्ग दडलेला असल्याचे प्रतिपादन योग पंडित तथा योग विद्याधाम नांदेड शाखेचे उपाध्यक्ष रमेश केंद्रे यांनी केले.   


      

*****

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...