Thursday, June 14, 2018


दिलखुलास कार्यक्रमात युपीएससीत
राज्यात प्रथम आलेले डॉ. गिरीश बदोले
मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत (युपीएससी) राज्यातून प्रथम स्थान पटकाविणारे डॉ. गिरीश बदोले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या शुक्रवार दि. 15 आणि शनिवार दि. 16 जून रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका तेजस्विनी मुंढे यांनी ही मुलाखत  घेतली  आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आल्याचा अनुभव,युपीएससी परीक्षा मराठी माध्यमातून देताना मराठी माध्यमांच्या पुस्तकांची उपलब्धता, परीक्षेची तयारी कधी करावी, या परीक्षेत महाराष्ट्राच्या यशाचा उंचावलेला आलेख तसेच आता उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात सुधारणा करणार आदी विषयांची माहिती डॉ. बदोले यांनी दिलखुलास मध्ये चर्चा करताना दिली.
००००


अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी
मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग सुरु होणार
शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 14 :- मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग योजनेंतर्गत अमराठी माध्यमिक शाळांमध्ये मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अमराठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपले प्रस्ताव सोमवार 25 जून 2018 पर्यंत शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण), व्यंकटराव तरोडेकर चेंबर्स चैतन्यनगर, नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (नि.शि.) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.  
अमराठी शाळेत शिकणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व प्राप्त व्हावे व त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी मदत व्हावी. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षेत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना पुरेशी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व मराठी भाषेवर प्रभुत्व वाढावे याकरीता शासन निर्णयान्वये अमराठी शाळांमध्ये इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग 1 जुलै 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीत सुरु करण्यात येणार आहेत. या वर्गास नमूद कालावधीत शिकविण्यासाठी मानसेवी शिक्षकांची मानधनतत्वावर नेमणुक करण्यात येणार आहे. शिक्षक बीएड / एमएड मराठी विषय अनिवार्य अर्हता धारक असावा. इयत्ता 8 वी ते 10 वीच्या अमराठी विद्यार्थ्यांना शिकविण्यास सक्षम असावा.
यापुर्वी ज्या शाळांमध्ये मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग चालु आहेत व नव्याने वर्ग सुरु करावयाचे आहेत अशा शाळांनी इयत्ता 8 वी ते 10 वीच्या वर्गातील अमराठी विद्यार्थ्यांची संख्या व मराठी भाषेचा मागील वर्षाच्या निकाल पत्राची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


जात प्रमाणपत्र पडताळणी
प्रकरणांची यादी प्रसिद्ध
विद्यार्थ्यांना कार्यवाहीच्या सुचना   
नांदेड, दि. 14 :- शैक्षणिक वर्षे 2017-18 साठी ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरण नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाखल केली आहेत, अशा प्रकरणात समितीने निर्णय घेतला आहे. त्यापैकी वैध व त्रुटीत असलेल्या प्रकरणाची यादी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेजवळ, नमस्कार चौक नांदेड येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. तसेच www.nanded.nic.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मागील चार दिवसात विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम होऊ नये म्हणून 1 हजार 450 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप सुरु केले आहे. ज्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरण वैध झाली आहेत अशा उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र नेण्यासाठी कार्यालयात प्रकरण दाखल केल्याची पावती, उमेदवाराचे स्वत:चे मुळ ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत व पालक आल्यास त्यांचे व उमेदवाराचे मुळ ओळखपत्र, त्याची एक छायांकित प्रत घेऊन उपस्थित रहावे. प्रकरणे त्रुटीत आहेत अशा उमेदवारांनी जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत, वडिलांचे किंवा जवळच्या रक्तनातेवाईकांचे शालेय अथवा महसुली पुरावे तसेच ज्या उमेदवारांच्या रक्त नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र पडताळणी झाले असल्यास त्योच जात प्रमाणपत्र पउताळणीचे सत्यप्रत वेळेत सादर करावे. उमेदवाराचे नाव वैध व त्रुटीतील प्रकरणाच्या यादीत नाहीत अशा उमेदवारांची प्रकरणे सुनावणीमध्ये वर्ग करण्यात आली आहेत अशा उमेदवारांनी सुनावणीची तारीख घ्यावी. ज्या उमेदवाराच्या प्रकरणात यापुर्वी सुनावणी झाली आहे अशा उमेदवारांने सुनावणीत सांगितल्याप्रमाणे कार्यवाही करुन सुनावणीची पुढील तारीख घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांने अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज समितीकडे सादर केला नाही त्यांनी विहित नमुन्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) आर. एल. गगराणी यांनी केले आहे.  
000000


महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 14 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 18 जून 2018 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. त्यानुसार सोमवार 18 जून रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त
योग प्रशिक्षण सप्‍ताहाचे आयोजन
नांदेड, दि. 13 :- आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात योग प्रशिक्षण सप्‍ताहाचे आयोजन 14 ते 21 जून या कालावधीत करण्यात आले आहे. शारिरिक व मानसिक स्‍वास्‍थासाठी नागरिकांनी योगाचे प्रशिक्षण घेऊन नियमित योग करावे, असे आवाहन  शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एच. श्‍यामकुंवर यांनी केले आहे.
21 जून आंतरराष्‍ट्रीय योग दिनाचे औचित्‍य साधून या सप्‍ताहात शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा नांदेड येथील सेमिनार हॉलमध्‍ये योग प्रशिक्षण देण्‍यासाठी महाविद्यालयातील स्‍वस्‍थवृत्‍त विभागाचे विभागप्रमुख डॉ. वाय. आर. पाटील, डॉ. बी. एम. पेरके, डॉ. एस. ओ. चव्‍हाण हे सप्ताहात रोज सकाळी 6 ते 8 वा. दरम्‍यान योगाचे प्रशिक्षण देणार आहेत.  या सप्‍ताहात 15 जून- योग व्‍याख्‍यान, 16 जून- निबंध स्‍पर्धा, 17 जून- योगशुध्‍दी क्रिया प्रात्‍यक्षिक प्रशिक्षण, 18 जून- शालेय विद्यार्थ्‍यांसाठी योग प्रशिक्षण, 19 जून- शालेय विद्यार्थ्‍यांसाठी योग प्रशिक्षण, 20 जून- रांगोळी स्‍पर्धा पोस्‍टर स्‍पर्धा, 21 जून- योग दिंडी प्रात्‍यक्षिक स्‍पर्धा. याप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


आत्महत्या टाळण्यासाठी जागरुकता आवश्यक
-डॉ. नीलम मुळे : मुलाखतकार - देवेंद्र भुजबळ.
           
समाजात दिवसेंदिवस आत्महत्यांचे, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनुवंशिकता आणि परिस्थितीजन्य विविध कारणांमुळे हे घडत आहे. राज्य सरकारने या बाबीचे गांभिर्य ओळखून 24 फेब्रुवारी, 2015 पासून ''104'' या क्रमांकाची हेल्पलाईन सुरु केली आहे.  मानसिक आजार झालेल्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींनी, कार्यालयातील सहकाऱ्यांनी, मित्रांनी संबंधित रुग्णांची लक्षणे ओळखून तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्यास या आत्महत्या टळू शकतील, असे मानसरोग तज्ज्ञ डॉ. नीलम मुळे यांनी नेटभेटमध्ये सांगितले.
डॉ. नीलम मुळे  मानसरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी मानसशास्त्रात मास्टर्स पदवी घेतली आहे. शिवाय निसर्गोपचार, योगा, ध्यानधारणा यातील 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. आज समाजातील वाढत्या मानसिक समस्या आणि त्यावर उपाय याबाबत त्या सतत जनजागृती करीत आहेत.
मानसिक आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या आधीच्या आई/वडिलांपैकी सहा पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार असेल तर शक्यता खूप असते. दुसरे कारण म्हणजे परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळेही मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशयी प्रवृतीच्या होतात. त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कटकारस्थाने रचतात असे वाटत रहाते. परत कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीची सतत भिती वाटत राहते. त्या एकच गोष्ट सतत करीत राहतात. या आजारांची नावे म्हणजे डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया (त्यात परत पॅरानॉईया एक प्रकार), कॅटॉटॉनिक, एंक्सायटी डिसऑर्डर, (दुचिंता) बायपोलर डिसऑर्डर अशी आहेत. या आजारांच्या लक्षणावरुन ती ओळखता येतात.
स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबंद्ध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो. हा रुग्ण लगेच ओळखता येतो. कॅटॉटॉनिकमध्ये रुग्ण एकाच स्थितीत दिवसेंदिवस त्याच स्थितीत राहू शकतो. एका पायावर उभे राहिले तर तसेच, एक टक पहात राहिले तर तसेच राहतील. अशा रुग्णांना शॉक ट्रिटमेंट द्यावी लागते. पण अशा रुग्णांचे प्रमाण कमी असते.
पॅरानॉईयामध्ये रुग्ण संशयखोर असतात. ते सतत संशय घेत असतात. बायको असेल तर नवऱ्याचा, नवरा असेल तर बायकोचा. त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये सतत भांडणे होतात. वैवाहिक जीवन कष्टप्रद होते. बऱ्याचदा अशा विवाहांची परिणती शेवटी घटस्फोटात होते. प्रसंगी काही रुग्ण जोडीदाराची हत्या पण करतात. त्यांच्या डोक्यात ते सतत कटकारस्थाने रचत असतात. कधीतरी शेवटी त्यांच्या हातून कृती घडते.
डिप्रेशन हे अनुवांशिकतेमुळे होऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही होऊ शकते. घरातील वातावरणही कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाही, ती एकलकोंडील बनते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये लवकरच जाते. काहीवेळा अशा व्यक्तींच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की, ते बोलत नाहीत आणि एकलकोंडेपणा वाढत जातो. फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भिती वाटत राहते. ही भिती उंचीची, पाण्याची, गर्दीची, सभेत बोलण्याची असते. एका मर्यादेपलिकडे भिती गेली की, त्याला फोबिया म्हणतात. रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी यांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी रुग्णाची लक्षणे ओळखून त्याला तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे. या रुग्णांचे उपचार म्हणजे त्यांना मानसोपचार तज्ज्ञाने लिहून दिलेली औषधे नियमितपणे घेणे, गरजेनुसार विद्युत लहरींचा वापर करणे ही होत. उपचारांचा कालावधी रुग्णाच्या आजाराच्या प्रमाणावर अवलंबून असते. स्किझोफ्रेनियामध्ये मात्र आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. पॅरानॉईयाच्या रुग्णास डिप्रेशनमध्ये गोळ्यांच्या प्रमाणापेक्षा समुपदेशन जास्त महत्वाचे असते. डिप्रेशन काही काळापुरते असू शकते. वेळेवर योग्य उपचाराने ते कायमचे बरे होऊ शकते. पण वेळीच उपचार घेतल्यास असे रुग्ण आत्महत्येस प्रवृत्त होतात किंवा अन्य व्यक्तीची हत्याही करु शकतात. भावनिक, संवेदनशील व्यक्तींना डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते.
समाजात आज जीवघेणी स्पर्धा, तुलना यामुळे डिप्रेशनचे प्रमाण वाढताना दिसते. यास एकल कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी घरातील आजी, आजोबा, काका, काकू, इतर भावंडे असतात. त्यामुळे संयुक्त कुटुंबात डिप्रेशनचे प्रमाण अत्यल्प असते. आईवडिल दोघेही नोकरीला असणाऱ्या कुटुंबातील मुलांमध्येही डिप्रेशनचे प्रमाण अधिक असते. परंतु दोघांनाही नोकरी/व्यवसाय करणे आवश्यकच असेल तर त्यांनी मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. लहान मुले आपल्याला वेळोवेळी समजून घेत असतात, त्यामुळे त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र घेणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्वाच्या ठरतात.
समाजात याविषयी जागृती होण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिणे, महिला मंडळे, शाळांमध्ये, कॉलेजमध्ये पालकसभा, कंपन्यामध्येही प्रशिक्षण घेणे असे उपक्रम डॉ. मुळे सतत करीत असतात. व्यक्तीने कार्यालयात कामाला व्यक्तीगत पातळीवर घेऊ नये तर ते सामुहिक जबाबदारी म्हणून पार पाडले पाहिजे. एकमेकांविषयी द्वेष, मत्सर असता कामा नये. एकमेकांशी सतत संवाद साधला पाहिजे. कार्यालयात निरोगी आणि पोषक वातावरण राहिले पाहिजे.
आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योगा आणि ध्यानधारणेचा फार उपयोग होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी. त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे. स्वत: डॉ. मुळेही नियमित योगासने, ध्यानधारणा करीत असतात. आपले मन हे रिकाम्या भांड्यासारखे असते. त्यात चांगले विचार टाकले तर चांगली कृती होते. नकारात्मक विचार टाकले तर व्यक्ती कृतीशून्य होते किंवा नकारात्मक बाबी करण्यास प्रवृत्त होते.
आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे आहे. आपण नशिबाला, देवाला दोष देतो. पण संकटाला संधी समजलो तर आपण ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून व्यक्तीने भविष्याचा अतिविचार करता, वर्तमानकाळ कसा चांगला होईल हे पाहिले पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले पाहिजे.
आजकाल आईवडिल दिवसभर बाहेर राहतात. पूर्वी मुले फक्त टीव्ही पाहू शकायची पण आता इंटरनेटमुळे चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही मुलामुलींपर्यंत तत्काळ पोहोचतात. त्यामुळे पालकांनी मुलामुलींना योग्य वेळीच सर्व गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. संपूर्ण आयुष्य ही एक परीक्षा असते, हे आपण समजून घेतले पाहिजे. ताणतणावांना दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला काही ना काही छंद असला पाहिजे. आपली आवड काय आहे ? हे त्या व्यक्तीने ओळखले पाहिजे. वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे, सायकल चालविणे, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, असे काही छंद जोपासले पाहिजेत.
-देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...