Friday, April 12, 2024

 वृत्‍त क्र. 337

वृत्त क्र. 33६

 मौजे पिंपळगाव निमजी येथील आरक्षित जागेवर कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपळगाव निमजी येथील दलित समाजासाठी आरक्षित मोकळया जागेवर शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून 13 एप्रिलच्या रात्रीपासून ते 30 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत घोषित केले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन मौ. पिंपळगाव निमजी ता. जि. नांदेड येथील वादग्रस्त मोकळी जागा 13 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केले आहे.  

 

पोलीस अधीक्षक नांदेड यांना मौ. पिंपळगाव निमजी ता.जि.नांदेड येथील वादग्रस्त जागेवरुन गावामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधितांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणि बाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

00000 

वृत्त क्र. 33५

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र


मुदतीत प्राप्त होण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन


नांदेड (जिमाका) दि. 12 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे "समता पंधरवडा"  निमित्ताने 25 एप्रिल पर्यंत जातपडताळणी विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

समता पंधरवडयात सन 2023-24 मधील विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विहित मुदतीत समिती मार्फत जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

यामोहिमेदरम्यान संपूर्ण जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती महाविद्यालयस्तरावर स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत.

त्याअनुषंगाने समता पंधरवड्यात जिल्ह्यातील इ. 11 व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थी, सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल मेहेंद्रकर,उपायुक्त अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी  रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 33४

 राष्ट्रीय लोकअदालतीचे तारखांमध्ये बदल

नांदेड (जिमाका) दि. 12 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन 5 मे  व 14 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. मात्र निवडणूक व इतर कारणास्तव या राष्ट्रीय लोकअदालत तहकूब करण्यात आल्या आहेत.

5 मे 2024 रोजी होणारी राष्ट्रीय लोकअदालत 27 जुलै 2024 रोजी तर 14 सप्टेंबर 2024 रोजीची लोक अदालत 28 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. राष्ट्रीय लोकअदालतीच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद सर्व संबंधितानी घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी.एम.जज यांनी केले आहे.

0000 

 वृत्‍त क्र. 333

चला निवडणूक आयोगाचे कान-डोळे होऊ या

सीव्हिजिल अॅप व 1950 क्रमांकाचा वापर करू या

आचारसंहितेचा भंग व कोणताही गैर प्रकार होत असल्यास जरूर कळवा

 जिल्ह्यात सीव्हिजिलवर 57 तक्रारी तर 1950 वर 247 तक्रारी प्राप्त

नांदेड दि.  12 - निवडणूक काळामध्ये शासकीय यंत्रणा भयमुक्त  वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्नरत असते.सामान्य नागरिकही अशावेळी निवडणूक आयोगाचे कान-डोळे होऊ शकतात. निवडणूक आयोगाने यासाठी सीव्हिजिल अॅप व कोणत्याही फोनवरून लागणारा 1950 क्रमांक नागरिकांना उपलब्ध केला आहे. आतापर्यंत सी -व्हिजिलवर 57 तक्रारी तर 1950 या क्रमांकावर 247 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कक्षाचे प्रमुख तथा नगरपरिषद प्रशासन अधिकारी गंगाधर इरलोड यांनी ही माहिती दिली आहे.

निवडणुका पारदर्शक, भयमुक्त तसेच सर्व उमेदवारांना समान संधी देणा-या असाव्यात अशी अपेक्षा निवडणूक आयोगाला आहे. मतदारसंघात नियुक्त निवडणूक निरीक्षकांनी देखील ही अपेक्षा उमेदवार व जनतेकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी आपले दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्याचप्रमाणे सीव्हिजिल व 1950 हा क्रमांक काम करते. नागरिकांनी याचा वापर करावा, असे आवाहन गंगाधर इरलोड यांनी केले आहे.

आतापर्यंत सीव्हिजिल या अॅपवरून 57 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 28 कारवाई करण्यात आली आहे. तर 1950 या क्रमांकावर 247 तक्रारी आल्या आहेत. प्रशासनातर्फे त्यांचेही निरसन करण्यात आले आहे.

काय आहे सीव्हिजिल अॅप

हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

काय आहे 1950 नंबर

निवडणूक आयोगाने प्रत्येक नागरिकाला दक्ष राहण्यासाठी उपलब्ध केलेला सर्वात सोपा उपाय म्हणजे 1950 हा क्रमांक आहे. या क्रमांकावर निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहिता भंगपैशांचा वापरदारूचा वापरअफवा कोणी पसरवत असेल तर त्याची माहिती देता येते. आपल्या हातातील मोबाईलवरूनही आपल्याला संपर्क साधता येते. 24 तास ही सेवा उपलब्ध आहे. आपल्या मतदानाच्या माहिती संदर्भात नव्हे तर निवडणुकीच्या संदर्भात काही तक्रारी असेल तर याचा वापर करण्यात यावाअसे आवाहन प्रशासनाने केले आहे.

000000







वृत्‍त क्र. 332

फेक न्‍यूजसाठी मुखेडमध्‍ये तालुका प्रतिनिधीवर गुन्‍हा दाखल

नांदेड जिल्ह्यात 'फेक न्यूज ', संदर्भातील पहिला गुन्हा

नांदेड दि. 12 - निवडणूक काळामध्‍ये वार्तांकन करतांना वस्‍तुस्थिती सोडून दिशाभूल करणारे वृत्‍त प्रकाशित केल्‍याप्रकरणी एका दैनिकाच्‍या तालुका प्रतिनिधीवर मुखेड येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी गुन्‍हा दाखल केला आहे. निवडणूक काळात 'फेक न्यूज ',बाबतचा जिल्हयातील हा पहिला गुन्हा ठरला आहे.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाची नाहक बदनामी करणा-या वृत्‍ताला वस्‍तुनिष्‍ठ नसलेली बातमी (फेक न्यूज) असे परिभाषीत केले आहे. तरी देखील एका वृत्‍तपत्राच्‍या प्रतिनिधीने चुकीची बातमी प्रकाशित केली आहे. यामुळे निवडणूक आयोगाची विनाकारण बदनामी झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 16-नांदेड लोकसभा मतदारसंघांतर्गत 91-मुखेड विधानसभा मतदारसंघात 29 मार्च 2024 रोजी निवडणुकीच्‍या अनुषंगाने मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. या प्रशिक्षणाबाबत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍याकडून कोणतेही माहितीची खातरजमा न करता एका वृत्‍तपत्रामध्‍ये प्रशिक्षण सुरू होण्‍यापूर्वीच्‍या रिकाम्‍या खुर्चीचे फोटो तसेच प्रशिक्षणास अनुपस्थित असणा-या कर्मचा-यांची पाठराखण प्रशासन करीत असल्‍याचे चुकीचे वृत्‍त दिले होते. (प्रशिक्षणास अनेक कर्मचाऱ्यांची दांडी तर अशा कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून पाठराखण ) त्‍यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा मतदारसंघ (91-मुखेड) यांच्‍याकडून कोणतेही खातरजमा न करता वस्‍तुस्थितीला सोडून वृत्‍त प्रकाशित केल्‍याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम (भा.प्र.से) यांनी पोलीस स्‍टेशन मुखेड येथे गुन्‍हा दाखल केला आहे. वृत्तपत्रांनी निवडणूक प्रक्रिया संदर्भात वृत्तलेखन करताना, इलेक्ट्रॉनिक्स व कोणत्याही माध्यमांवर बातमी दाखवताना संबंधित विभागामार्फत खातरजमा करावी, दुसरी बाजुही मांडावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

फेक न्‍यूज व निवडणूक आयोग

तथ्‍यहिन बातमी संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारी 2024 च्‍या मिडिया मॅटर हॅन्‍ड बूकमध्‍ये 9.1 या सत्रामध्‍ये आयोगाच्‍या संदर्भात अपप्रचार पसरविणा-या तथ्‍यहिन बातम्‍यांसंदर्भात कडक कारवाई करण्‍याचे निर्देश दिले आहेत. विशिष्‍ट कालमर्यादेत या वृत्‍ताचे खंडन करण्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी तातडीने ही कार्यवाही केली असून संपादकांनी देखील संबंधीत तालुका प्रतिनिधीला समज देण्‍याचे आवाहन केले आहे. यासंदर्भातील गुन्‍हा मुखेड पोलीस स्‍टेशनमध्‍ये दाखल करण्‍यात आला आहे.

०००००

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...