Wednesday, September 7, 2016

गणेश मंडळांनी संवाद पर्वच्या माध्यमातून
शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात
-        जिल्हाधिकारी सुरेश काकाणी

  नांदेड, दि. 7 :- गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनावर आधारीत देखावे व संवाद पर्वच्या माध्यमातून गणेश मंडळांनी जनतेपर्यंत पोहचाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले.   
नांदेड जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान, लोकमान्य गणेशोत्सव पुरस्कार घोषणा व गणराया अवार्ड-2015 चे वितरण श्री. काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडले, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, हजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराचे अधीक्षक डी. पी. सिंघ, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे आदी उपस्थित होते.  
गणेशोत्सव कालावधीत लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध पुरस्कारही जाहीर केले आहेत. गणेशोत्सव प्रभावी माध्यम असल्याने गणेश मंडळांनी शासनाच्या विविध समाजपयोगी व कल्याणकारी योजनेवर आधारीत देखावे सादर करुन त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचावी. गणेशोत्सव काळात शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने संवाद पर्व हा उपक्रम हाती घेतला आहे. गणेश मंडळांनीही यामध्ये सहभागी व्हावे. कृषि व्यवसायाशी निगडीत तसेच लोकशिक्षणामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, उज्ज्वल नांदेड आदी लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावे असे सांगून श्री. काकाणी यांनी गणेशोत्सव व बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सहिष्णुता, एकोपा व सहकार्याचा वातावरणात व पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक  संजय ऐनपुरे यांनी केले. तर शांततेच्या, खेळीमेळीच्या व उत्सवाच्या वातावरणात बकरी ईद व गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांनी केले.
या
वेळी गणेशोत्सव-2015 मध्ये नांदेड जिल्ह्यात विविध गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपताना पर्यावरणपूरक व समाजोपयोगी केलेल्या कामगिरी बद्दल विविध गणेश मंडळांना पोलीस विभागाच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण पारितोषिकामध्ये प्रथम क्रमांक- श्री सर्वश्वर गणेश मंडळ रंगार गल्ली नांदेड, द्वितीय क्रमांक- पटेल बाल गणेश मंडळ विनायकनगर नांदेड, तृतीय क्रमांक- श्री कृष्ण यादव गणेश मंडळ गोकुळनगर देगलूर यांना देण्यात आले. विविध उपक्रमांतर्गत साई गणेश मंडळ मोरया गल्ली कंधार, अष्टविनायक गणेश मंडळ नवीन बस्थानक भास्कर नगर बिलोली, श्री विठ्ठलेश्वर गणेश मंडळ मांजरम ता. नायगाव, आर्य वैश्य गणेश मंडळ सराफा लाईन किनवट, सार्वजनिक गणेश मंडळ इस्लापूर यांना देण्यात आले. तर उत्तेजनार्थ बक्षीस सार्वजनिक गणेश मंडळ मोंढा भोकर, जयभवानी युवा गणेश मंडळ कंधार, शासकीय आयुर्वेदीक गणेश मंडळ वजिराबाद नांदेड, विघ्नहर्ता गणेश मंडळ धर्माबाद या गणेश मंडळांना श्री. काकाणी व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.  
प्रारंभी प्रास्ताविकात अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची सादरीकरणातून माहिती दिली. या अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील 200 गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आदर्श गणेश विसर्जन कसे व्हावे याची चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. देवराये यांनी केले. या कार्यक्रमाला शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.  

000000
स्पर्धा परिक्षेत यशसंपादन करणाऱ्यांनी
सामाजिक भान ठेवून काम करावे
- जिल्हाधिकारी  सुरेश काकाणी

नांदेड, दि. 7 :- स्पर्धा परिक्षेत यशसंपादन करुन प्रत्यक्ष काम करताना सामाजिक भान ठेवून काम करावे आणि आपली कर्मभुमी हीच मातृभुमी आहे अशी भावना मनात रुजवावी , असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले.
उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महिला व बालविकास अधिकारी वर्ग-2 व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता वर्ग-1 पदी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबीरात श्री. काकाणी बोलत होते. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे हा सोहळा काल संपन्न झाला. यावेळी मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्रा. मनोहर भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या यशावर न थांबता यशाची शिखरे पादाक्रांत केली पाहिजे त्याच बरोबर समाजाचे काही देणे लागतो ही ऊर्जा मनात ठेवून इतरांनाही प्रवाहात आणावे. दैनंदिन जीवन जगत असताना दररोजच्या परिक्षेला मानसिकतेने तयार राहिले तर त्याच ऊर्जेतून नवीन दिशा मिळत जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
यावेळी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते महिला व बालविकास अधिकारी वर्ग-2 पदासाठी निवड झालेले उमेश मुदखेडे, लिंगुराम राजुरे, सखाराम माने, राहूल शिवशेट्टे, शिवहार येजगे, मयुरी पुणे, शिवगंगा पवार, राजेश गजलवाड तर जिल्हा प्रशिक्षण संस्था जेष्ठ अधिव्याख्याता वर्ग-अ पदी निवड झालेले जगन्नाथ कापसे, मंजुषा औढेंकर या गुणवंताचा पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. मनोहर भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच गुणवंतानी आपले मनोगत व्यक्त केले. उज्ज्‌वल नांदेड उपक्रमात आम्ही आमचे योगदान देवू असे सांगितले.
प्रास्ताविक व सूत्रसंचलन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी केले. शिबिरासाठी आरती कोकुलवार, अजय वट्टमवार, बाळू पावडे, रघुवीरसिंह, लक्ष्मण शन्नेवाड, मयुर कल्याणकर यांनी संयोजन केले.

000000
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
10 सप्टेंबर ऐवजी 8 ऑक्टोंबर रोजी
नांदेड, दि. 7 :- नांदेड जिल्हा न्यायालयात व सर्व तालुका न्यायालयात 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात शनिवार 10 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी सण येत असल्यामुळे  राष्ट्रीय लोकन्यायालय पुढे ढकलण्यात आले असून शनिवार 8 ऑक्टोंबर 2016 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. विधीज्ञ, पक्षकारांनी याची नोंद घ्यावी, असे अवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.    
राष्ट्रीय लोकन्यायालयात पक्षकार, वकिलांनी आपली जास्तीतजास्त फौजदारी अदखलपात्र गुन्हयातील तडजोडयोग्य प्रकरणे तसेच वाहतुक, पेट्टी मॅटर व नगरपालीका, महानगरपालिका यांची प्रकरणे सांमजस्याने मिटविण्यासाठी ठेवून आपसात निकाली काढावीत. शनिवार  10 सप्टेंबर ऐवजी 8 ऑक्टोबर रोजी पक्षकारांनी आपली प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयास, जवळच्या विधी सेवा समिती  किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांनी केले आहे.

000000
सार्वजनिक उत्सव मंडळांनी
प्रसाद वाटपात आवश्यक खबरदारी घ्यावी 
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन 
नांदेड, दि. 7- सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे सर्व अन्न व्यवसायिकांनी प्रसाद वाटपात आवश्यक खबरदारी घ्यावी.  अन्न, प्रसाद याबाबत काही संशय असल्यास आपले क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी अथवा सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. नागरिकांनी यासंदर्भात माहिती, तक्रार, सूचना असल्यास एफडीए हेल्पलाईन क्र. 1800222365 वर कळवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पी. डी. गळाकाटू यांनी केले आहे.
सार्वजनिक उत्सव मंडळे, पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यवसायिक यांनी अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 त्या अंतर्गत नियम नियमन 2011 मधील तरतूदीचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रसाद करताना (उत्पादनाची) जागा स्वच्छ आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल हा अन्न पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकांकडूनच खरेदी करावा. तसेच प्रसाद बनविण्याऱ्या केटरर्सची माहिती अद्यावत करुन ठेवावी. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी झाकण असलेली असावी. फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना/नोंदणी धारकाकडूनच करावी. कच्चे / सडलेले किंवा खराब फळांचा वापर करु नये. प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील याची खात्री करावी. आवश्यक तेवढयाच प्रसादाची निर्मिती करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असावे. प्रसाद उत्पादन करणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी (हेड गिअर) इत्यादी देण्यात यावे प्रत्येकवेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ ठेवावेत. प्रसाद उत्पादन वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करुन घ्यावी. दुध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील असे कमी तापमानावरच साठवणुकीस ठेवावेत. खवा / माव्याची वाहतूक साठवणूक थंड / रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी प्रसादामध्ये याचा वापर होत असल्यास दक्षता घेण्यात यावी. जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला खवा / मावा प्रसादासाठी वापरु नये. अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहिल. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असेही आवाहन सहायक आयुक्त (अन्न)  श्री. गळाकाटू यांनी केले आहे.

000000
जिल्हा परिषदेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा
नांदेड दि. 7 :- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार 9 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित केली आहे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांनी कळविले आहे.

0000000
चर्मकार विकास महामंडळ प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
प्रशिक्षण संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 7 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून चर्मकार समाजातील कुटुंबामधील पात्र मुला-मुलींसाठी प्रशिक्षण योजना ही त्यांचे व्यवसायिक कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. पात्र प्रशिक्षण संस्थांनी प्रस्ताव मंगळवार 13 सप्टेंबर 2016 पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्‍हा व्‍यवस्‍थापक संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड यांनी केले आहे.  
प्रशिक्षण योजनेसाठी पुढील अटी पूर्ण करीत असलेल्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. संस्था ही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तंत्र शिक्षण मंडळ, व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळ यांची मान्यता अथवा इतर तत्सम संस्थांशी संलग्नता असावी. संस्था सलग 5 वर्षापासून कार्यरत असावी. संस्थेचे मागील तीन वर्षाचे ऑडिट पूर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, यंत्रसामुगी व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. मागील तीन वर्षात ट्रेडनिहाय किती प्रशिक्षणार्थींना वर्षनिहाय प्रशिक्षण दिले आहे याचा तपशील देण्यात यावा. संस्थेमार्फत तीन वर्षात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे किंवा नोकरी मिळाली आहे त्याचा तपशील दयावा. तीस टक्के महिला प्रशिक्षणार्थी असणे आवश्यक आहे. शासनमान्यतेप्रमाणे एका वर्षात ट्रेडनिहाय किती विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी मान्यता आहे, याबाबत तपशील देण्यात यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ट्रेडची परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल याचा तपशील देण्यात यावा. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉब प्लेसमेंटकरीता काय कार्यवाही करण्यात येते व स्वयंरोजगार थाटण्यासाठी कोणती मदत प्रशिक्षणार्थीस करण्यात येते. याकरीता आपणाकडे कोणती यंत्रणा कार्यरत आहे याचा तपशील देण्यात यावा. बाहेरगावच्या प्रक्षिणार्थीसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था होऊ शकेल काय याबाबत तपशील दयावा.  प्राप्त संस्थेच्या प्रस्तावाची स्थळ पाहणी ही गुरुवार 15 सप्टेंबर 2016 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक करतील व त्याचा अहवाल प्रधान कार्यालय मुंबई येथे सादर करतील असेही प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे.

000000
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना  
जि. प. समाज कल्याण कार्यालयाकडे हस्तांतरीत   
नांदेड दि. 7 :-  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सन 2016-17 पासून जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे शासनाने हस्तांतरीत केली आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाशी  संपर्क साधावा  असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी विजाभज व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून लाभ देण्यात येतो.  

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...