Sunday, June 27, 2021

 

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबियांपर्यंत

सामाजिक न्यायाच्या योजना पोहचविण्यासाठी

आजपासून जिल्हा प्रशासनाची विशेष मोहिम

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- गतवर्षीच्या मार्च महिन्यांपासून अवघ्या जगाप्रमाणे नांदेड जिल्हाही कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. आजच्या घडिला जवळपास 91 हजार 225 बाधित जिल्ह्यात झाले असून यातील सुमारे 88 हजार 578 बाधित उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. प्रशासनाने प्रयत्नाची शर्त करुन जिल्ह्यातील प्रत्येक बाधितांपर्यंत आरोग्याच्या सेवा-सुविधा पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. यात विविध सेवाभावी संस्था, ग्रामपंचायती, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनीही मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. एकुण बाधितांपैकी सुमारे 1 हजार 904 व्यक्ती जिल्ह्यात कोरोनानी बळी पडले आहेत. अशा कुटुंबांना सावरण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने एक मिशन हाती घेऊन सामाजिक न्यायाच्या शासकिय योजना त्या-त्या कुटुंबाच्या पात्रतेनुसार तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.  

 

राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या धोरणाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील कोरोनामुळे बळी पडलेल्या व्यक्तींच्या अनाथ मुलांना तात्काळ सहाय्य पुरविले जात आहे. पालक गमविलेल्या शुन्य ते 6 वयोगटातील बालकांसाठी शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुला-मुलींसाठी स्वतंत्र बालगृह अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या गरजू कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहिम हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी सोमवार 28 जून पासून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पर्यंत योजना पोहचविण्याचा प्रयत्न करतील.

 

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभ अशा कुटुंबांना दिला जाईल. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहेत. महिला व बालविकास विभागांतर्गत बालसंगोपन योजना, शिशुगृह योजना, बालगृह योजना, शुभमंगल सामुहिक विवाह योजना यांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, एपीएल (केशरी) शेतकरी योजना यांचा समावेश आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थी इयत्ता 6 वी ते दहावीसाठी निवासी शाळा, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना यांचेही प्रावधान ठेवले आहे.

 

या सर्व योजना कोविड-19 मधील मृत्त पावलेल्या गरजू कुटुंबियांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी गावनिहाय अशा कुटुंबास भेट देणार आहेत. या प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या पर्यंत योजना पोहचविण्याचा अभियानाचा शुभारंभ सोमवार 28 जून पासून केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

00000

 

जिल्ह्यातील 95 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 95 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 28 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 12 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको व रेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट आणि 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको, रेल्वे हॉस्पिटल या 10 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस तर शिवाजीनगर व जंगमवाडी या केंद्रावर 50 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.  

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 26 जून पर्यंत एकुण 5 लाख 90 हजार 780 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 24 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू तर  12 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 124 अहवालापैकी  6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 225 एवढी झाली असून यातील 88 हजार 578 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 153 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

26 जून रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मुखेड तालुक्याती केब्नुर तांडा येथील 67 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 904 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, बिलोली तालुक्यांतर्गत 1, मुखेड 1, कंधार 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 6 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 12 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 2,  खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 5 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 153 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 23,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  4, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 3,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 57, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत 51, खाजगी रुग्णालय 3 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 127 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 2 हजार 426

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 99 हजार 596

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 225

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 578

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 904

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-87

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-153

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4                       

00000

 

सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने घडिपत्रिका-भित्तीपत्रिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

 

सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने

घडिपत्रिका-भित्तीपत्रिकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

 


नांदेड (जिमाका) दि. 27 :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या घडिपत्रिका-भित्तीपत्रिकाचे प्रकाशन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे जलसंपदा प्रकल्पाच्या आढावा बैठकीत हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर आदि विविध विभागांच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रमांची माहिती यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मंत्री महोदयांना दिली. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक श्रीमती अलका पाटील, दुरमूद्रणचालक विवेक डावरे, छायाचित्रकार विजय होकर्णे, सर्वसाधारण सहाय्यक काशिनाथ आरेवार यांनी परिश्रम घेतले.

0000

 

स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मारकास

आवश्यकतेप्रमाणे निधीची उपलब्धता करु

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 

पालकमंत्री अशोक चव्हाण, समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंचनावर सखोल चर्चा

 


नांदेड (जिमाका) दि. 27 :- महाराष्ट्राच्या सिंचन विकासात स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे योगदान मोलाचे आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील पाणी प्रश्नाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या काळी उभारलेल्या जायकवाडीसह इतर प्रकल्प सिंचनाच्या दृष्टिने किती मोलाचे होते हे आज कळून चुकते. त्यांनी सिंचन प्रकल्पांसाठी जे योगदान दिले व त्यांच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विष्णुपूरी येथील स्मारकास आवश्यक ते प्रमाणे निधीची उपलब्धता केली जाईल. याचबरोबर त्यांच्या नावाने जलभूषण पुरस्काराचे वितरण 14 जुलै रोजी करण्याच्यादृष्टिने आवश्यक त्या सर्व पूर्व प्रक्रिया शासनस्तरावर पूर्ण करुन हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

 


नांदेड जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प व पाणी व्यवस्थापनेचा आढावा घेणारी व्यापक बैठक काल दि. 26 जून रोजी रात्री उशीरापर्यंत संपन्न झाली. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या आढवा बैठकीस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, खासदार हेमंत पाटील, विधानपरिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे,आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी, मुख्य अभियंता दिलीप तवार, अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, अधिक्षक अभियंता महाजन उप्पलवाड यांची उपस्थिती होती.

 


पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यातील सिंचन प्रश्नासह नांदेड जिल्ह्यातील जलव्यवस्थापन व सिंचन प्रकल्पाच्या विविध प्रश्नांबाबत सादरीकरण केले. यात प्रामुख्याने उर्ध्व पेनगंगा प्रकल्पातील निर्माण झालेली 781 दलघमी एवढी तुट, प्रकल्पाच्या 15 कि.मी. लांबीच्या कालव्यांची 50 टक्क्यावर आलेली वहन क्षमता व याच्या तातडीने दुरुस्तीची गरज, साखळी धरण न होऊ शकल्याने 109 दलघमी पाण्याची झालेली तूट भरुन काढण्यासाठी कयाधू नदीवर खरबी बंधाऱ्यातून पाणी वळविणे, गोजेगाव बंधाऱ्यातून इसापूर धरणात 97 दलघमी पाणी वळविणे, पेनगंगा नदीवर दिगडी उच्च पातळी बंधाऱ्यातून 582 दलघमी पाणी उपसाद्वारे इसापूर धरणात वळविणे, पेनगंगा नदीवर 6 उच्च पातळी बंधारे तसेच माहूर शहरास पाणी पुरवठ्याच्यादृष्टिने धनोड उच्च पातळी बंधाऱ्याचा समावेश करुन उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या 6 व्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देणे हे विषय पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आकडेवारीसह निदर्शनास आणले.

 

माहूर-हदगाव-हिमायतनगर-उमरखेड या परिसरातील 50 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्यादृष्टिने नियोजन करणे, सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचा आवश्यक बदलासह सुधारित प्रस्ताव, महत्वाकांक्षी आणि तेवढाचा आवश्यक असलेल्या लेंडी प्रकल्पास गती देणे, पुर्णा नदीवरील 4 उच्च पातळी बंधाऱ्यांना प्रशासकिय मान्यता देणे, रेणापुर-सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे, पिंपळढव साठवण तलावास प्रशासकिय मान्यता, बाभळी बंधाऱ्यात पाणी साठवण्याच्यादृष्टिने मंत्री स्तरावर तेलंगणा राज्यासमवेत चर्चा करणे, मध्य गोदावरी खोऱ्यात 28 टिएमसी पाणी वापरासाठी धरणे बांधणे, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मध्य गोदावरीत आणणे, पाटबंधारे खात्याच्या एकुण 45 वसाहती विविध शासकिय वापरासाठी उपलब्ध करणे हे विषय पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे उपस्थित करुन त्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली.  

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्प हा मोठा प्रकल्प असून या प्रकल्पात 781 दलघमी एवढी तूट निर्माण झाली आहे. या प्रकल्पास 1 हजार 500 कि.मी. लांबीचे कालवे आहेत. या कालव्यांची वहन क्षमता प्रत्यक्षात 50 टक्के एवढी झालेली आहे. या कालव्याची दुरुस्ती तातडीने करुन घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे अंदाजपत्रक तात्काळ मान्य करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले. अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करुन प्रकल्पाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक शासनास तातडीने सादर करावीत. तूर्त गळती अधिक असलेल्या बांधकामांची दुरुस्ती महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या देखभाल दुरुस्ती निधीतून करण्याचे त्यांनी सांगितले.

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत सापळी धरण न होऊ शकल्याने 199 दलघमी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी सापळी धरणांच्या पुनर्नियोजन अंतर्गत कयाधू नदीवर खरबी बंधाऱ्यातून 109 दलघमी पाणी वळविणे यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. पेनगंगा नदीवर गोजगाव येथे उच्च पातळी बंधाऱ्यातून 97 दलघमी पाणी उपसाद्वारे इसापूर धरणात वळविण्याबाबतचा प्रस्तावास सर्व संबंधितांची मंत्रालय स्तरावर आवश्यक बैठक घेऊन त्यास मान्यता देण्याबाबत निर्णय घेऊ असे ना. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणात 582 दलघमी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी पेनगंगा नदीवर दिगडी उच्च पातळी बंधाऱ्यातून 582 दलघमी पाणी उपसाद्वारे इसापूर धरणात वळविणे आवश्यक आहे. या प्रस्तावास सर्व संबंधितांची मंत्रालय स्तरावर आवश्यक बैठक घेऊन त्यास मान्यता देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

पेनगंगा नदीवरील नवीन 6 उच्च पातळी बंधारे तसेच माहूर शहरास पाणी पुरवठा करावयाच्यादृष्टिने धनोडा उच्च पातळी बंधाऱ्यांचा समावेश उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या 6 व्या सुधारित अंदाजपत्रकास करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत घेतला. त्याअनुषंगाने उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या 5 व्या सुप्रमा अंदाजपत्रकातील शिल्लक 470 कोटी किंमतीचा वापर या बंधाऱ्यासाठी करण्यात येणार आहे. यामुळे 9 हजार 310 हेक्टर क्षेत्रास लाभ होऊन माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड या परिसरातील 50 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

 

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचा आवश्यक सुधारित प्रस्ताव, शासनास सादर करावा. या बदलास मजनिप्राच्या मान्यतेनंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेबाबत निर्णय घेता येईल. लेंडी प्रकल्प हा नांदेड जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पास सुधारित मान्यता प्राप्त झाली असल्याने या प्रकल्पास गती देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पातील मुख्य अडचण ही पूनर्वसनाची असल्यामुळे शासनाने मुक्रमाबाद या गावठाणाचा स्वेच्छा पूनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करुन गती देता येऊ शकेल. त्यानुसार स्वेच्छा पूनर्वसनाबाबत ताडीने निर्णय घेण्यात येईल. सन 2021-22 या वर्षात 300 कोटी अतिरिक्त देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच सन 2022-23 व 2023-24 मध्ये प्रतीवर्षी 400 कोटी रुपये निधी देऊन सन 2023 मध्ये घळ भरणी व सन 2024 मध्ये प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.  

 

पूर्णा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांसाठी मध्य गोदावरी खोऱ्यात2.8 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्धता शासनाने नुकतीच मंजूर केली असून या पाण्यातून पूर्णा नदीवरील 4 उच्च पातळी बंधाऱ्यांना प्रशासकिय मान्यता देण्याबाबत शासनस्तरावर तातडीने निर्णय घेण्यात येईल. यासाठी आवश्यकतेनुसार मापदंडाची सुधारणा करण्यात येईल. तसेच बंधाऱ्यासाठी मध्यम प्रकल्पाचे मापदंड लावण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढविणे तसेच पिंपळढव साठवण तलावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत निर्णय मजनिप्राच्या मान्यतेनंतर घेऊ, असे त्यांनी सांगितले.   

 

बाभळी बंधाऱ्यात पाणी साठवण्याचा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे मागील 8 वर्षात जटील झाला असून पोचमपाड धरणामुळे अतिक्रमित होणारा 0.60 टीएमसी साठा कमी करुन बाभळी बंधाऱ्याची उंची कमी केल्यास पाणीसाठा करण्यात अडचण येणार नाही. यादृष्टिने मंत्री स्तरावर तेलंगणा राज्यासमवेत बैठक घेऊ. नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे खात्याच्या एकुण 45 वसाहती असून त्याची स्थिती अत्यंत मोडकळीची आहे. या वसाहती जिल्हाधिकारी यांचेकडे असलेल्या कॉमन-पूल (Common-pool) अंतर्गत घेण्यात येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांची आवश्यक दुरुस्ती करुन घेण्यात येईल व आवश्यकता असलेल्या विविध शासकिय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याचा वापर करता येईल. याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.  

0000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...