Tuesday, November 13, 2018


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यात 28 नोव्हेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 14 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे
अंदाजित वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 13 :- सन 2019 मध्ये आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत.
000000


मालेगाव येथे 13 तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही
4 हजार 900 रुपयाचा दंड आकारला  
नांदेड दि. 13- जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने मालेगाव येथे आज अचानक धाडी टाकून कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार या पथकामार्फत 13 तंबाखू विक्रेत्यांकडून 4 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम व नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.
या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तथा संतोष बेटकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक खेडकर आदी होते.
जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.
00000


कापूस, तूर पिकाचा कृषि संदेश
 नांदेड, दि. 13 :- जिल्ह्यात कापुस, तुर  पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात येत आहे.
कापूस पिकावर कामगंध सापळयातील लुर बदलावे आणि सायपरमेथ्रीन 3 टक्के + इंडोक्झाकार्ब 10 टक्के एस. सी 5 मिली प्रति 10 पाण्यात फवारावे. तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. तसेच इमामेक्टीन बेंझोएट 5 एस.जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे. गुंडाळलेली पाने अळीसहीत नष्ट करावीत, असे आवाहन  नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000



अल्पसंख्याक उमेदवारांसाठी
पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण
नांदेड, दि. 18 :- "पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत" राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकडून प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत असून यासंदर्भात निवड चाचणीसाठी सोमवार 19 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा मुख्यालयातील पोलीस परेड ग्राऊंड नांदेड येथे अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती, दोन पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांच्या निवडीसाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त नसल्याचा पुरावा. उमेदवार अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या समाजातील असावा. उमेदवार हा 18 ते 28 या वयोगटातील असावा. उमेदवारांची उंची पुरुष 165 से.मी. व महिला 155 से.मी., छाती पुरुष 79 सेमी. फुगगवून 84 से.मी. असावी. उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील. उमेदवार शारीरिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
प्रशिक्षणाचे स्वरुप : निवडलेल्या उमेदवारांना एकुण दोन महिने (50 दिवस) प्रशिक्षण दिले जाईल.  निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणा दरम्यान 1 हजार 500 रुपये प्रतीमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. मैदानी प्रशिक्षणानंतर संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार, गणवेश साहित्यासाठी गणवेश, बुट, मोजे, बनियन आदीसाठी 1 हजार रुपये एवढी एकरकमी अनुदान देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


मंत्री राजकुमार बडोले
साधणार जनतेशी ई-संवाद
            नांदेड, दि. 13 : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, हे राज्यातील जनतेशी गुरुवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता लाईव्ह ई-संवाद साधणार आहेत. ऐरोली, नवी मुंबई येथील, पार्थ नॉलेज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून श्री. बडोले  ई-संवाद साधणार आहेत.
            महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त आणि भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,दिव्यांग, आणि निराश्रीत इत्यादी समाजघटकांसाठी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी बरोबरच सामाजिक प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. ई-संवादद्वारे जनतेच्या विविध प्रश्नांची उत्तरे श्री. बडोले देणार आहेत.   
            या कार्यक्रमात elearning.parthinfotech.in लिंक द्वारे सहभागी होऊन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, त्यांची यशस्विता, याबाबतचे प्रश्न, 83 84 85 86 85 या क्रमांकावर व्हॉटसअॅप द्वारे श्री. बडोले यांना विचारावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
0000000


महिलांच्या सुरक्षेसाठी दरमहा 
महिला लोकशाही दिनाचे आयोजन
नांदेड दि. 13 :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने समस्याग्रस्त व पिडित महिलांना  त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण  होऊन न्याय मिळावा या हेतुने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन  पाळण्यात येतो  आहे.
त्यानुसार  तालुकास्तरावर  प्रत्येक तहसील कार्यालयात महिन्याचा चौथा सोमवार आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याचा तीसरा सोमवार महिला  लोकशाही  दिन म्हणुन  पाळण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनाचे आयोजन  जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी  11 ते 12 या वेळेत  करण्यात येते. या महिला लोकशाही दिनात  तक्रार दाखल करु इच्छिणाऱ्या महिलांनी  किमान चार दिवस आधीपर्यंत आपली तक्रार दोन प्रतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे सादर करावी.
अर्ज स्विकृतीचे निकष पुढीलप्रमाणे आहे. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तक्रार, निवेदन दोन प्रतीत सादर करावे. सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ  नसावे. अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रतीसह सादर करावा. सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाही. निवडण  आचार संहिता काळात त्या-त्या स्तरावर, विधिमंडळ अधिवेशन काळात राज्य स्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.
शासन निर्णयाप्रमाणे महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार यांचेकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्याच्या आत कार्यवाही  न झाल्यास संबंधित महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही  दिनात अर्जदार महिलेस  अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीतजास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव  तथा बालविकास  प्रकल्प अधिकारी यांची जबाबदारी राहील.
तरी महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय व जिल्हास्तरावर  जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.  
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...