Wednesday, October 8, 2025

 वृत्त क्रमांक  1069

#भारतीयवायुसेनादिन

वृत्त क्रमांक  1068

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षमतेतून पारदर्शकतेकडे वाटचाल : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

•  “सेवा पंधरवाडा” अंतर्गत जिल्हा प्रशासनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम  

•  १९ हजार ६३९ कि.मी. रस्ते मोकळे 

•  ७२ आर जमीन घरकुलधारकांना 

•  २७ गावांना स्मशानभूमी, २ हजार ४०८ शासकीय जमिनींची केएमएल फाईल अद्ययावत 

•  एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना विविध सुविधेचा लाभ

नांदेड, दि. ८ ऑक्टोबर : "सेवा पंधरवाडा" उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून सर्व उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात आले असून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक बनविण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर या कालावधीत हा सेवा पंधरवाडा राबविण्यात आला. 

टप्पा 1 अंतर्गत रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा

गावरस्ते, शिवारस्ते, शेतरस्ते व पायरस्ते मोकळे करण्याच्या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण २ हजार १६९ रस्ते मोकळे करण्यात आले असून त्यांची लांबी तब्बल १९ हजार ६३९ कि.मी. आहे. या माध्यमातून १ लाख ५१ हजार ५१९ शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

टप्पा २ : सर्वांसाठी घरे- घरकुलधारकांना जमीन प्रदान

‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरकुलधारकांना घरबांधणीसाठी ७२ आर शासकीय जमीन प्रदान करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक कुटुंबांना निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टप्पा ३ अंतर्गत : गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी

जिल्ह्यातील ५२ गावांपैकी २७ गावांना शासकीय गायरान जमिनीसह स्मशानभूमी / दफनभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित गावांसाठी प्रक्रिया सुरू आहे.

सर्व शासकीय जमिनींची माहिती एका क्लिकवर

जिल्ह्यातील सर्व शासकीय जमिनींची माहिती लॅंड बँकच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. यात एकूण २ हजार ४०८ जमिनींच्या KML फाईल तयार करून GIS प्रणालीवर नकाशावर दर्शविण्यात आल्या आहेत. यामुळे शासकीय जमिनींचे डिजिटल सिमांकन (geo-fencing) झाले असून त्या जमिनींचे संरक्षण व विविध योजनांसाठी जलद वाटप शक्य झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नागरिकांसाठी A.I. चॅटबॉट

जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर A.I. चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून विविध योजनांची माहिती, अर्ज नोंदणी आणि ऑनलाईन तक्रारींची सुविधा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत ३०८ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

तांड्यांना महसूली गावाचा दर्जा

संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० तांड्यांना महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

भटक्या व विमुक्त समाजासाठी शिबिर

भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांसाठी आयोजित शिबिरांद्वारे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी १ हजार ९७५ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच १ हजार  ८२३ नागरिकांची नवी मतदार नोंदणी करण्यात आली आहे.

या सर्व उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासनात पारदर्शकता, गतीमानता आणि लोकाभिमुखतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा प्रशासनाने “सेवा पंधरवाडा”ला खऱ्या अर्थाने जनसेवेचा उत्सव बनवला आहे.

0000















वृत्त क्रमांक  1067

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे सायबर सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रम

नांदेड, दि. ८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत आणि नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे ७ ऑक्टोबर रोजी कोनाळे कोचिंग क्लासेस, स्टेडियमजवळ, नांदेड येथे सायबर सुरक्षा (Cyber Security) विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये पोलीस अधीक्षक (सायबर नांदेड) वसंत सप्रे, श्रीमती अनुसया कोनाळे (संचालिका, कोनाळे कोचिंग क्लासेस), स.पो.नि. दयानंद पाटील (कम्युनिटी पोलिसिंग), पो.उ.नि. एम.बी. चव्हाण, आणि पो.उ.नि. काशिनाथ कारखेडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शरद देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणात सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले व न्यायव्यवस्था नागरिकांच्या दारी न्याय पोहोचविण्याचे कार्य करते, असे सांगितले.

वसंत सप्रे यांनी ऑनलाईन फ्रॉड विषयक मार्गदर्शन केले. स.पो.नि. दयानंद पाटील यांनी चाइल्ड पॉर्नोग्राफीसंबंधी माहिती दिली, तर पो.उ.नि. एम.बी. चव्हाण यांनी डिजिटल अरेस्ट या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स.पो.नि. दयानंद पाटील यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मिळून २४८ जणांची उपस्थिती होती.

00000

वृत्त क्रमांक  1066 

भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांकडून शेतीजमिनींसाठी अर्ज मागविणे सुरू 

नांदेड दि. ८ ऑक्टोबर : जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांना शेतीची जमीन देण्यासाठी शासनामार्फत एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर सिंचित शेती देण्यात येणार आहे.

या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. पात्र आदिवासी नागरिकांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे प्रकल्प कार्यालय किनवट येथे सादर करावीत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

सदर योजना ही शासन निर्णय क्र. एपीजी-२०१८/प्र.क्र.१२७/१८, दिनांक २८ जुलै २०२१ अन्वये राबविण्यात येत असून या माध्यमातून भूमिहीन आदिवासींना स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जितेंद्रचन्द्रा दोन्तुला यांनी प्रसिद्ध केली आहे.

---

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...