Friday, March 4, 2022

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 856 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 769 एवढी झाली असून यातील 1 लाख 58 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 20 रुग्ण उपचार घेत असून यात 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 691 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे माहूर 2, धर्माबाद 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहे.

आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4, असे एकुण 4 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 13, असे एकुण 20 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 79 हजार 756

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 60 हजार 10

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 769

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 58

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 691

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-08

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-20

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी आधारीत प्रक्रिया उद्योग उभारावे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (पीएमएफएमई), नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प या योजने अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या योजनेसाठी इच्छूकांना अर्ज करण्यासाठी किंवा अर्ज केले आहेत अशा लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळविण्यासाठी अडचणी येवू देऊ नयेत. लाभार्थी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बँकानी तात्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.    

या कार्यशाळेस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा अग्रणी बँकेच व्यवस्थापक व इतर बँक अधिकारी, विविध विभागाचे शाखा व्यवस्थापक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट व इतर शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (स्मार्ट) या योजनेची माहिती प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती  माधुरी सोनवणी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. 

या स्मार्ट योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीला 60 टक्के पर्यत अनुदान मिळते. यासाठी बँक कर्ज घेणे ऐच्छिक असून 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज करावेत. पीएमएफएमई योजनेत वैयक्तीक, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, बेरोजगार युवकांना देखील अर्ज करता येतो. यात नांदेड जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन ओडीओपी हळद व इतर मसाले पदार्थ असून यासाठी नविीन उद्योग व विस्तारीकरणाचे तसेच नॉन ओडीओपी मध्ये विस्तारीकरणाचे प्रस्ताव सादर करता येतात. यामध्ये 35 टक्के व कमाल 10 लाखापर्यंत प्रक्रिया उद्योगांना अनुदान देता येते. त्या व्यतिरिक्त सामाईक पायाभुत सुविधा (35 टक्के अनुदान) बीज भांडवल, ब्रँडीग व विपणन (50 टक्के अनुदान) चा लाभ देखील या योजनेमध्ये घेता येतो.

 

नानाजी देशमूख कृषि संजिवनी योजनेत प्रकल्पामध्ये समाविष्ट शेतकरी गट व जिल्ह्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रस्ताव सादर करता येतो. यामध्ये अनुदानाची टक्केवारी 60 टक्के असून कमाल 1 कोटीपर्यंत प्रस्ताव सादर करता येतो. या योजनेतर्गंत प्रामुख्याने अवजारे बँक, गोदाम, वेअर हाऊस, शीतगृह, रायपनींग चेंबर, प्रक्रिया युनिट, बीजप्रक्रीया केंद्र, दाळमिल इ. घटकांचा लाभ मिळतो. या सर्व योजनांची अर्ज प्रक्रिया सुरु असून लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे. 

या कार्यशाळेत जिल्ह्यातील परपंरागत कृषि विकास योजना (सेंद्रीय शेती) योजनेतील 5 सेंद्रिय गटांना सेंद्रीय प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. एका गटामध्ये किमान 33 शेतकऱ्यांचा समावेश असून याप्रमाणे एकूण 172 प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. सोयाबीन बियाणेचा तुटवडा होवू नये व दर्जेदार बियाण गावस्तरावर उपलब्ध व्हावे, यासाठी उन्हाळी बियाणे लागवड करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले होते. त्याअनुषंगाने नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील शेतकऱ्यांनी उत्कृष्ट सोयाबीन लागवड केल्याने बियाण्याबाबत गाव स्वयंपूर्ण झाले आहे. या शेतकऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

000000



लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 7 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.  

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.  

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000


रस्त्यावरील बालकांचे होणार सर्वेक्षण

 - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यात रस्त्यावर राहणारे अनाथ, बेघर, रात्रनिवरा गृहातील, दिवसभर रस्त्यावर राहून रात्री जवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि कुटुंबासमवेत रस्त्यावर जी बालके राहतात त्यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभागाला दिले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे याचे नियोजन केले गेले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेद्वारे या मुलांचे पूनर्वसन करण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्व बालकांची राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (एनसीपीसीआर) या संकेस्थळावर नोंदणी केली जात आहे. त्यामध्ये ही मुले कुठून आली? ज्या कुटुंबासमवेत ती राहत आहेत ते त्यांचेच पालक आहेत का ? बालमजूर म्हणून कार्यरत आहेत का ? काही समाजकंटकाकडून मुलांना भिक मागण्यासाठी ही मुले बाहेरील जिल्ह्यातून किंवा परराज्यातून आणली जातात का ? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. 

अशी मुले आढळल्यास या मुलांचे बाल संरक्षण कक्षाकडून सामाजिक पार्श्वभूमी तपासणी अहवाल तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये त्यांचे शिक्षण, सध्याचे वास्तव, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ आणि इतर पार्श्वभूमी जाणून घेतली जाईल. या मुलांचे शिक्षण सुरू नसेल तर त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे, पालकांचा शोध घेणे, निवाऱ्याची सोय करणे, काहीही सामाजिक संस्थामध्ये पाठविले जाणार आहे. 

या मुलांना केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या योजना आहेत त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधक्षतेखली कृती दलाची स्थापना झाली असून तालुका स्थरावर तहसीलदारांच्या अधक्षेतेखाली नगर पालिका मुख्य अधिकारी बाल पोलीस पथकाचे कृतिशील  सदस्य,  अंगणवाडी सेविका, चाइल्ड लाईन चे सदस्य यांनी बालकांचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचना दिल्या. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या 9730336418  या व्हॉटसॲपनंबर वरूनही बालकांच्या संरक्षणाबाबत लिंक पुरवली जाईल.

00000


 अखेर किनवट मधील पिंपळशेंडाच्या गावकऱ्यांची

25 किमी अंतराची वाचली पायपीट

 

·         पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रस्त्याच्या कामाबाबत दिले होते निर्देश

·         नव्या मार्गामुळे 17 किमी अंतर झाले कमी 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कर्नाटक आणि तेलंगणाच्या सिमांना जवळीकता साधत नांदेड जिल्ह्याच्या विस्तार 16 तालुक्यात झाला आहे. यात तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या पिंळशेंडा या गावाला सुविधेचा मार्ग नसल्याने 8 किमी अंतरावर असलेल्या मांडवी बाजारपेठेला जाण्यासाठी तब्बल 25 किमीचा फेरा पूर्ण करून जावे लागत होते. सदर मार्गासाठी खासदार हेमंत पाटील, स्थानिक आमदार भिमराव केराम व स्थानिक लोकांची आग्रही मागणी होती. या गावाची व्यथा लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी 8 किमीच्या मार्गाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश दिले. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पर्यायी मार्गाबाबत सर्व संबंधित विभागांना सोबत घेतले. यात वन विभागाच्या परवानगीपासून शेजारी तेलंगणा राज्याच्या जिल्हा प्रशासनासह समन्वय साधत विक्रमी वेळेत हा मार्गाच्या सर्व परवानग्या हस्तगत केल्या.  

 

किनवट तालुक्यातील बहुसंख्य गावे आदिवासी क्षेत्रात मोडतात. यात जिल्हा प्रशासनाच्या सोईच्या दृष्टिने किनवट येथे सर्व प्रशासकीय कार्यालय देण्यात आली आहेत. तेलंगणाच्या काठावर असलेल्या मांडवी गावात शाळा, विद्यालय व बाजारपेठे असल्याने त्या परिसरातील गावांना मांडवीला जाणे क्रमप्राप्त आहे. मात्र मांडवीला पोहचण्यास केवळ सोईचा रस्ता नसल्याने 25 किमी अंतराचा फेरा पिंपळशेंडा गावासह इतर वाड्या-पाड्यातील लोकांना पडायचा. आता या नवीन मार्गामुळे मोठा दिलासा येथील लोकांना मिळाला आहे.

 

हा मार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत घेतला आहे. रस्ते विकास योजना 2001-21 अंतर्गत या रस्त्याचा क्रमांक हा ग्रामीण मार्ग 21 असा योगा-योगाने आला आहे. या कामाचे सर्व परवानग्या हाती आल्यानंतर आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांच्या प्रमुख उपस्थित भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राठोड, पिंपळशेडा गावचे सरपंच श्री. मडावी, उपअभियंता सुधीर पाटील व मान्यवर उपस्थित होते. सुमारे 8 किमी लांबीचा हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा रस्ता असून याची रुंदी 3.30 मीटर एवढी धावपट्टीची रुंदी असणार आहे. या कामासाठी 4 कोटी 69 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...