Thursday, January 4, 2024

 वृत्त क्र. 17 

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे
जिल्ह्यात घरोघरी जाऊन होणार सर्वेक्षण
▪️जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी
▪️गाव व विभागनिहाय 200 घरामागे
एका प्रतिनिधींवर जबाबदारी सुपूर्द
▪️5 हजारपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती
नांदेड (जिमाका) दि. 4 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी केली आहे. या मोहिमेत एकही कुटूंब सुटणार नाही याची दक्षता प्रत्येक संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नांदेड जिल्ह्यातील ही मोहिम अधिक प्रभावीपणे यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाबाबत सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) आश्विनी जगताप व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या सर्वेक्षणासाठी सुसुत्रता रहावी यादृष्टिने शासनाने नियोजन केले आहे. सदर सर्वेक्षण मिशनमोडवर व्हावे व यात अधिक अचूकपणा यावा यादृष्टिने ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येकी 1 हजार घराच्या सर्वेक्षणासाठी 1 अधिकारी प्रतिनिधी नियुक्त केला असून त्याच्या समवेत अन्य शासकीय कर्मचारीही देण्यात आले आहेत. याबाबत लवकरच सर्व संबंधित तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण घेतले जाणार आहे. सर्वेक्षण कालावधीत कोणीही मुख्यालय सोडणार नाही अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.
महानगरपातळीवर मनपाचे वार्ड निहाय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तालुकापातळीवर महसूल यंत्रणा, संबंधित नगरपरिषदा तर ग्रामीण भागात ग्रामपंचायती, पंचायत समिती यांच्या समन्वयातून हे सर्वेक्षण युद्धपातळीवर 3 दिवसाच्या कालावधीत पूर्ण केले जाईल. मिशन मोडवर असलेल्या या सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सांगून या कालावधीत जर कोणत्या बैठका असतील त्या बैठका इतर दिवशी घेतल्या जातील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व अधिकारी निर्देश दिले.
00000


 वृत्त क्र. 16 

पोलीस पाटील भरतीच्या अर्जासाठी आवश्यक प्रमाणपत्रे

शनिवार व रविवारी मिळण्याची सुविधा

 

·         उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हाधिकारी राऊत यांचे निर्देश

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-पोलीस पाटील भरती-2023 चे अनुषंगाने जाहिरात प्रसिध्द झाली आहे. या जाहिरातीनुसार पोलीस पाटील पदासाठी अर्ज करण्याचा कालावधी 1 ते 8 जानेवारी 2024 असा आहे. इच्छूक पात्र उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रमाणपत्राची अडचण भासू नये यादृष्टीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येत्या शनिवार व रविवारी सर्व तहसिल, उपविभागीय कार्यालयाचे कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून आता नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (इडब्लूएस) प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहीवासी प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रे मिळणे सोयीचे झाले आहे.  

 

यासाठी सर्व उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार यांनी उमेदवारांना पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी 6 व 7 जानेवारी 2024 या शनिवार व रविवार या दिवशी प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे कामकाज सुरु राहील यांची दक्षता घ्यावी. तसेच पोलीस पाटील पदासाठी आवश्यक प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेले प्रस्ताव प्रथम प्राध्यान्याने हाताळावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

0000 

 वृत्त क्र. 15

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

साजरा करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 4 :- मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो.

त्यानुसार मराठी भाषा विभागाने यावर्षी मराठी भाषेसंदर्भात विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक 14 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्याबाबत सर्व कार्यालयांना निर्देशित केले आहे. या निर्देशानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे. राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये / सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. या पंधरवडयात केलेल्या कार्यक्रमांचे अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावेअसे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.   

0000

 वृत्त क्र. 14

माळेगाव यात्रेनिमित्त माळेगाव यात्रा व

गौंडगाव येथे बुधवारी दारु विक्री बंद


नांदेड (जिमाका) दि. 4 :-  श्रीक्षेत्र माळेगाव येथील 10 जानेवारी 2024 रोजी यात्रा आहे. ही यात्रा 9 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत एकूण 7 दिवस भरते . या कालावधीत लाखोंच्या संख्येने भाविक येतात.  या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी 10 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौ. माळेगाव (यात्रा) व मौ. गौडगाव येथे  दारु विक्रीचे व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. 


महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 10 जानेवारी 2024 रोजी मौ. माळेगाव (यात्रा) व मौ. गौडगाव येथील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

0000

 वृत्त क्र. 13 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 12 

जिंगल्सद्वारे प्रत्येक शेतकऱ्यांच्या कानात गुंजणार कृषि योजनेची माहिती

§  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिंगल्सचे उद्घाटन संपन्न

नांदेड (जिमाका), दि. 4 : कृषि विभागामार्फत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेविषयक जिंगल्स तयार करण्यात आले आहे. या जिंगल्सद्वारे प्रचार प्रसिद्धीसाठी प्रत्येक गाव व तालुका स्तरावर प्रत्येक मंदिर, विहार, चर्च, मस्जिद  तसेच आठवडी बाजार येथे कृषि सहाय्यकांमार्फत नागरिकांना या योजनेची  माहिती  ऐकविण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग योजनेसाठी तयार केलेले जिंगल्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे उपस्थित होते. यावेळी हदगाव विधानसभा मतदार संघामध्ये योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी कृषि विभागाला सहाय्य करून असे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले.  योजनेविषयक माहिती व जिंगल्स गाव पातळीवर, तालुका स्तरावर कशा प्रकारे कार्यरत राहील याची माहिती भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी यावेळी दिली.  

सद्यस्थितीत वैयक्तिक मालकीच्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 183 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांची एकुण किंमत 21 कोटी 62 लाख 57 हजार रुपये आहे. यामध्ये बँकाकडून 9 कोटी 93 लाख 23 हजार रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून 4 कोटी 93 लाख 62 हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

या माध्यमातून लसुण, आद्रक पेस्ट, चिप्स, मसाले, दाळे, तेलघाणा, पापड, शेवया, चिक्की, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, गुळ उद्योग इत्यादी सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभारण्यात आले आहे. अर्जा संबंधीत माहिती ही www.mofpi.nic.in  PMFME या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय नांदेड दूरध्वनी क्रमांक 02462-284252 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या योजनेचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000



  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...