Tuesday, August 10, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 640 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 230 एवढी झाली असून यातील 87 हजार 525 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 48 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मुखेड कोविड रुग्णालय 2 तर मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 2 व्यक्तींला सुट्टी देण्यात आली. 

आज 48 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 78 हजार 777

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 76 हजार 425

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 230

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 525

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-24

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-48

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1.

0000

 

 

 

जिल्ह्यातील 75 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 75 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री. गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर  (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, येथे एकूण 14 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.तर शहरी दवाखाना कौठा  एकूण 1 केंद्रावर  कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री. गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल,सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 15 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनचेही प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.तर शहरी दवाखाना पौर्णिमानगर येथे कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध केले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड,नायगाव या 10 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस  दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव ग्रामीण रुग्णालय लोहा या 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस  दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय बिलोली, लोहा या तीन केंद्रावर कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध केले आहेत. ग्रामीण भागात 35 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.तर 9 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 9 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 8 लाख 68 हजार 817 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 9 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 70 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 29 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 99 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन कृषि कार्यालयाचे शेतकऱ्यांना आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  कापूस पिकातील डोमकळया वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि कार्यालयाने केले आहे. अंड्यातून बाहेर पडलेली अळी, कळीमध्ये प्रवेश करते व आतील भाग पोखरते. गुलाबीबोंड अळीचा प्रादूर्भावामुळे कळीचे नुकसान झाल्यामुळे फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात यालाच डोमकळी म्हणतात.  

डोमकळी कशी ओळखावी : पहिल्या अवस्थेतली गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते. पाकळयांना लाळेद्वारे एकमेकांना जोडुन स्वतःला स्वरक्षणासाठी बंद करून घेते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अश्या कळ्या म्हणजेच डोमकळया. डोमकळया तोडून पाकळयांना वेगळे केल्यास, पाकळया एकमेकांना लाळेद्वारे जोडल्यासारख्या दिसतात. बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरट रंगाची पहिल्या किंवा दुस-या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी आतमध्ये असल्याचे दिसून येते. 

या फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. अंड्यातून निघालेली अळी,ताबडतोब पाते, कळ्या, फुले यांना छिद्र करून आत मध्ये शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुलांचे डोमकळीत रुपांतर करते. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 10 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या कळीमध्ये झाल्यास झाडावरून कळी गळून पडते. उशीरा झालेल्या प्रादुर्भावामध्ये नुकत्याच लागलेल्या बोंडावर किंवा उशीरा लागलेल्या फुलांवर गुलाबी बोंड अळीची मादी पतंग अळी घालते. 

या फुलामधुन किंवा लहान बोंडाला छिद्र पाडून अळी बोंडात शिरते, असे छिद्र बोंडाची वाढ झाल्यामुळे बंद होते. एकदा का अळी बोंडामध्ये शिरली की, बोंडावरील छिद्र बंद असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत नाही. त्याठिकाणी फक्त काळा डाग दिसतो. 

अळी आतमध्ये राहून लहान हिरव्या बोंडामधील अपरीपक्व कापूस व सरकी खाऊन टाकते तर मोठया बोंडामध्ये फक्त सरकीवर आक्रमण करते. एक अळी बोंडामधील तिन ते चार सरकीच्या दाण्यांचे नुकसान करते. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळया आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात. प्रादूर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात, त्यामुळे रूईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते. 

डोमकळीचे नियंत्रण : डोमकळया गोळा करून अळीसह नष्ट कराव्यात, जेणेकरून गुलाबी बोंडअळीची पुढची पिढी तयार होणार नाही व प्रादुर्भाव होण्याच्या मुळ कारणाला आळा घालता येईल. ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधील माशीचे कार्ड (1.5 लाख अंडी / हे.) शेतामध्ये लावावेत. कामगंध सापळे १० प्रति हेक्टरी लावावेत. 

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता गरजेनुसार खालील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा 30 मिली / 10 लिटर. थायोडीकार्ब 75 डब्ल्यु पी किंवा 20 ग्रॅम/10 लिटर इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम / 10 लिटरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरासराष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

000000

 

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.   

बुधवार 11 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून टू-जेट विमानाने सायं. 5.45 वा.  श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6.30 वा. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हॅटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सायं. 7 वा. पदाधिकाऱ्यांच्या भेटी स्थळ- शासकिय विश्रामगृह नांदेड. रात्री 8 वा. सोईनुसार शासकिय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. 

गुरुवार 12 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.15 वा. शासकिय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. शासकिय आध्यापक महाविद्यालय, गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड आढावा बैठक. स्थळ- बोर्ड रुम गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड. सकाळी 9 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आढावा बैठक स्थळ- सिनेट सभागृह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. सकाळी 9.45 वा. राष्ट्रीय सेवा योजना कोविड योद्धांच्या सत्कार समारंभास उपस्थित स्थळ- सिनेट सभागृह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. सकाळी 10 वा. पत्रकार परिषद स्थळ- सिनेट सभागृह स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. सकाळी 10.30 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण.

0000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...