Thursday, January 8, 2026

 पत्रकार परिषद निमंत्रण

ई-मेल संदेश दि. ९ जानेवारी 2026

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्त पत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्हा

 महोदय, 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम बाबत “हिंद की चादर” हा कार्यक्रम दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे होत आहे. या अनुषंगाने  मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, राज्य समितीचे समन्वयक  मा. रामेश्वर नाईक, क्षेत्रीय समिती अध्यक्ष मा. डॉ. विजय सतबीर सिंग यांचे उपस्थितीत आज 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता गुरु ग्रंथ साहिब भवन, पहिला मजला, एसी हॉल, सचखंड पब्लिक स्कूल नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे.  

तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.   

पत्रकार परिषद दिनांक :-    09.01.2026 (शुक्रवार)

वेळ     :-   दुपारी 1.00 वा.

स्थळ    :- गुरु ग्रंथ साहिब भवन, पहिला मजला, एसी हॉल, सचखंड पब्लिक स्कूल नांदेड

    

        प्रमोद धोंगडे

प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

            नांदेड

वृत्त क्रमांक 22

१५ जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

नांदेड ९ जानेवारी :- राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६  रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६  रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. 

ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. 

०००००

वृत्त क्रमांक 21

पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26 साठी राज्यस्तरीय निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड, दि. ८ जानेवारी:- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2025-26 चे आयोजन छत्तीसगड राज्यात करण्यात येणार असून, या स्पर्धेसाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा पुरुष व महिलांच्या खुल्या वयोगटात होणार आहे.

या स्पर्धेत एकूण सात खेळप्रकारांचा समावेश असून त्यामध्ये फुटबॉल, हॉकी, जलतरण, वेटलिफ्टिंग, आर्चरी, कुस्ती व अ‍ॅथलेटिक्स या खेळांचा समावेश आहे. राज्यस्तरीय निवड चाचणीमधून निवड झालेले खेळाडू व संघ राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरणार असून, त्यानंतर अंतिम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संबंधित खेळांच्या एकविध राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येऊन राज्यस्तरीय निवड चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय निवड चाचणी कार्यक्रम

 (13 जानेवारी 2026)

• आर्चरी, कुस्ती व वेटलिफ्टिंग

स्थळ : अमरावती

संपर्क : श्री. चांदेकर (9404379677), श्रीम. त्रिवेणी वान्ते (9975590232), शेख सलीम (9657277457)

• हॉकी

स्थळ : नेवासा, जि. अहिल्यानगर

संपर्क : विशाल गर्जे – 8369539077

• अ‍ॅथलेटिक्स

स्थळ : पालघर, जि. पालघर

संपर्क : अमृत घाडगे – 9870048649

• जलतरण

स्थळ : महाळुंगे–बालेवाडी, पुणे

संपर्क : बालाजी केंद्रे – 9503548988

• फुटबॉल

स्थळ : नागपूर

संपर्क : अनिल बोरावार – 9422559083

महत्त्वाच्या सूचना

निवड चाचणी अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) प्रवर्गातील खेळाडूंकरिता असून जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र व मूळ आधारकार्ड अनिवार्य आहे.

सर्व खेळाडूंनी स्वखर्चाने निवड चाचणीत सहभागी व्हावे. निवास व भोजनाची व्यवस्था केवळ खेळाडूंसाठी करण्यात येईल.

सहभागी खेळाडूंनी आवश्यक क्रीडा साहित्य व संरक्षक साधने स्वतः आणणे बंधनकारक आहे.

दि. 12 जानेवारी 2026 पूर्वी संबंधित संपर्क प्रमुखांकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

वैयक्तिक खेळप्रकारांमध्ये आर्चरीत प्रत्येक प्रकारातील पहिले तीन, तर कुस्ती, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण व वेटलिफ्टिंगमध्ये पहिले दोन खेळाडू राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत.

हॉकी व फुटबॉल या सांघिक खेळप्रकारांमध्ये उत्कृष्ट संघाची निवड करण्यात येईल.

निवड चाचणीत सहभागी खेळाडूंना कोणतेही प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील जास्तीत-जास्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत सी. आर. होनवडजकर (7972953141) व श्रीमती शिवकांता देशमुख (9657092794) यांच्याशी संपर्क साधावा.

0000000

वृत्त क्रमांक 20

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक
नांदेड, दि. ८ जानेवारी : बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना कडक निर्देश जारी केले आहेत.
या निर्देशांनुसार कोणत्याही मंगल कार्यालयात किंवा धार्मिक स्थळी विवाह सोहळा आयोजित करताना वधूचे वय किमान १८ वर्षे व वराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. विवाहास परवानगी देताना आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नसून जन्माचा दाखला किंवा शालेय कागदपत्रे – जसे की बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अथवा प्रवेश-निर्गम उतारा – यांच्या आधारेच वयाची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अनेक प्रकरणांमध्ये आधार कार्ड व शैक्षणिक कागदपत्रांमधील जन्मतारखेत तफावत आढळून येत असल्याने बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणताही बालविवाह होऊ नये यासाठी मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे.
तसेच कायदेशीर विवाहाचे वय पूर्ण नसल्यास विवाहासाठी जागा देण्यास नकार देणे बंधनकारक असून, या संदर्भातील सूचना फलक मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाहास चालना देणे, परवानगी देणे अथवा कोणत्याही प्रकारची सेवा पुरविल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास ग्रामीण भागात ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक), शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड किंवा चाइल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बालविवाहमुक्त नांदेड जिल्हा घडविण्यासाठी नागरिकांचे, मंगल कार्यालयांचे व धार्मिक संस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत “बेटी बचाओ, बेटी पढाओ” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
०००००

वृत्त क्रमांक 19

जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम ‘ई-टपालवाला सेवा’

जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना आता मिळणार जलद माहिती

नांदेड, दि. ८ जानेवारी : राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा प्रशासनाने नागरिकाभिमुख व अभिनव असा ‘ई-टपालवाला सेवा’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांच्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीची माहिती थेट त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

या सेवेमुळे नागरिकांना कार्यवाही बाबतची माहिती मिळविण्यासाठी कार्यालयात वारंवार येण्याची गरज राहणार नाही. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज अथवा पत्र सादर करताना त्यामध्ये स्वतःचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक नमूद करावा.यामुळे अर्जदारास त्यांनी मागितलेली माहिती घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात प्रथमच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, केवळ मागील दोन दिवसांत १ हजार ५०० नागरिकांना या ई-टपालवाला सेवेद्वारे माहिती देण्यात आली आहे. तसेच आगामी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी नेमणूक करण्यात आलेल्या ५७७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांचे आदेश या ई-टपालवाला सेवेद्वारे थेट त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात आले आहेत.

लोकाभिमुख, पारदर्शक, जलद व कार्यक्षम प्रशासन देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

ही सेवा यशस्वीपणे कार्यान्वित करण्यासाठी आयटी कन्सल्टंट संतोष निलावार व मुख्यमंत्री फेलो आर्थव मोडक यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

०००००

 वृत्त क्रमांक 18

अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

वाहनांसह वाळू जप्त; १८ लाख ३८ हजार रुपयांचा दंड

नांदेड, दि. ८ जानेवारी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे काल सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे.





या कार्यवाहीदरम्यान वाळूने भरलेला एक हायवा ट्रक, दोन जेसीबी पोकलेन मशीन तसेच अंदाजे ४० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर महसूल विभागामार्फत २ लाख ८३ हजार रुपये तसेच परिवहन विभागामार्फत ५५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.


तसेच प्रत्येकी दोन जेसीबी पोकलेन मशीनवर परिवहन विभागामार्फत प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून या संपूर्ण कारवाईत दोन मशीनवर एकूण १५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


या कारवाईत लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसीलदार श्री. पाठक, उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्तेवार यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून दोषीवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेत.

०००००

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...