Thursday, February 17, 2022

 नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित

तर 57 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 466 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 708 एवढी झाली असून यातील 99 हजार 832 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 188 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, धर्माबाद 1, किनवट 1, लोहा 1, मुखेड 1  तर अँटिजेन तपासणीद्वारे अर्धापूर 2 असे एकुण 8 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 18,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 32, खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 57 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 36, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 140, खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 188 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 66 हजार 792

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 47 हजार 284

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 708

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 832

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 688

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-03

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-188

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 समस्याग्रस्त व पिडित महिलांसाठी

सोमवारी महिला लोकशाही दिन 

जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील अर्ज  

नांदेड, (जिमाका) दि. 17:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 21 फेब्रुवारी 2022 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 21 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम

अंतर्गत तक्रार निवार समिती गठीत करण्याचे निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार ज्या आस्थापनामध्ये दहा किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी असतील अशा प्रत्येक नियोक्त्याने आपल्या आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे आवश्यक आहे. ही समिती गठीत / अद्यावत करून अहवाल तसेच दहा पेक्षा अधिक कमी कर्मचारी असल्यास तसा अहवाल iccdwcdned@gmail.com या मेलवर पाठविण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. 

अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही. अधिनियमातील कलम 13, 14, 22 नुसार करावाई केली नाही. या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदी व जबाबदारीचे पालन न केल्यास मालकाला 50 हजार रुपयापर्यंत दंड होईल. हाच प्रकार पुन्हा केल्यास परवाना रद्द व दुप्पट दंड अशी तरतुद आहे. 

शासकीय कार्यालये व स्थानिक प्रधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, खाजगी क्षेत्र-1, संघटना किंवा खाजगी उपक्रम / संस्था, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठादार संस्था, वितरण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, करमणूक केंद्र, औद्योगिक संस्था, आरोग्य संस्था, सेवा पुरवठादार, रुग्णालये, सुश्रुषलये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडा संकुल इत्यादींनी अंतर्गत समिती गठीत / अद्यावत करावी. तसेच दहा पेक्षा अधिक कमी कर्मचारी असल्यास तसाही अहवाल iccdwcdned@gmail.com या मेलवर पाठविण्यात यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

00000

 दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध 

नांदेड (जिमाका) दि. 17  :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परिक्षा मार्च-एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 पासून स्कूल लॉगनीमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव  डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी मार्च-एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी, इयत्ता दहावी परिक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेश हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. 

या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची प्रत विभागीय मंडळात त्वरीत पाठवावी. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधीत माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावेत. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधीत मुख्याध्यापकांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक सर्व माध्यमिक शाळांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

000000

सुधारीत वृत्त क्रमांक 158

अवैध गर्भपातीची माहिती देणाऱ्यास मिळणार 1 लाख रुपये 

·         नांदेड जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात वाढ 

नांदेड (जिमाका) दि. 17:- वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 ची प्रभावी अमंलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात यापुढे कठोर करण्यात येईल. यानुसार मान्यताप्राप्त केंद्रामध्ये वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन होत असेल किंवा एखाद्या मान्य नसलेल्या ठिकाणी अवैध पध्दतीने गर्भपात केला जात असेल किंवा अपात्र व्यक्ती गर्भपात करीत असेल तर अशा प्रकरची माहिती  देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपीत ठेवून खबरी योजने अंतर्गत माहिती देणाऱ्याला 1 लाख रूपये बक्षीस म्हणून देण्यात येईल अशी माहिती पीसीपीएनडीटी कायदा 1994 च्या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी दिली. 

पीसीपीएनडीटी कायदा 1994 ची परिणामकारक व राज्यातील मुलींचे जन्मात व लिंग गुणोत्तर सुधारणा होण्याच्या दृष्टिने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला  अशासकीय सदस्या वैशाली मोटे, लातुर येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.एकनाथ माले, नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.सुरेशसिंग बिसेन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

पोटातील गर्भांच लिंग जाणून घेणे आणि जर ती मुलगी असेल तर गर्भपात करणे यासाठी अल्ट्रासाउंड सोनोग्राफी हे गेल्या काही वर्षात गर्भाच लिंग जाणून घेण्यासाठी सर्वात जास्त वापरल जाणार तंत्रज्ञान आहे. 1980 नंतर स्त्री गर्भ ओळखून गर्भपात करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले यामुळे मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले. 

नांदेड जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात झालेली वाढ ही खरच कौतुकास्पद आहे. जन्मदर कमी असलेल्या तालुक्यांनी मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करावे आणि येत्या काळात जन्मदर नक्कीच वाढलेला दिसेल. मुलींच्या जन्माबाबत असलेली उदासीनता दूर करण्यासाठी यापुढे प्रत्येक तालुक्याला एक कार्यशाळा घेण्यात येईल . यामध्ये ग्रामसेवक, शिक्षकसेवक, कृषीसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच, पोलिस पाटील यांना पीसीपीएनडीटी कायद्याबाबत संपूर्ण माहिती देण्यात येईल. यामुळे गावामध्ये कुठेही गर्भपात किंवा यासंबंधित काही प्रकार होत असल्यास यांची तात्काळ माहिती मिळेल अवैद्य गर्भपात करणाऱ्या नागरिकांना कायद्याचा धाक राहील असा विश्वास डॉ आशा मिरगे यांनी व्यक्त केला. 

अवैद्य गर्भपात करणाऱ्या मध्ये फक्त डॉक्टरच जबाबदार नसून यामध्ये रेडिओलॉजिस्ट, गायनाकोलॉजिस्ट याप्रमाणे त्या कुटुंबातील सदस्यही तेवढेच जबाबदार असतात. या गुन्ह्यासाठी संबंधित डॉक्टरला 5 वर्षापर्यंत कैद 50  हजार रूपये दंड, लिंग निवडीसाठी दबाव आणणाऱ्या व्यक्तीस 3 वर्षापर्यंत कैद आणि 50 हजार रूपये दंड करण्याची तरतूद आहे.  

आपल्या घरात नातेवाईकांमध्ये शेजारी किंवा गल्ली गावात गर्भलिंग निदानासाठी तंत्रज्ञानाचा जर वापर एखादा डॉक्टर करीत असेल तर एक सजग  आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली तक्रार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढील टोल फ्री क्रमांक 180023334475 वर नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले.

00000

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन होईल.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...