Thursday, February 17, 2022

 दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध 

नांदेड (जिमाका) दि. 17  :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परिक्षा मार्च-एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ही प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार 18 फेब्रुवारी 2022 पासून स्कूल लॉगनीमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव  डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी मार्च-एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी, इयत्ता दहावी परिक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेश हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे. 

या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची प्रत विभागीय मंडळात त्वरीत पाठवावी. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधीत माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावेत. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधीत मुख्याध्यापकांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक सर्व माध्यमिक शाळांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...