Monday, August 29, 2022

 राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

सहभागी होणाऱ्या मंडळासाठी 30 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन   

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास रुपये पाच लाखद्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2022 हा आहे. याबाबत दिनांक 26 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. किंवा स्थानिक पोलिस स्थानक अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई मेल वर दिनांक 30 ऑगस्ट 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईलअशी माहिती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दिली.

 

असे आहेत निकष

मूर्ती पर्यावरणपुरक असावी. सजावट पर्यावरणपुरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असता कामा नयेत. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनीप्रदुषण रहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा, पारंपारिक / देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त याबाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही.

 

अशी आहे जिल्हास्तरीय समिती

 वर नमूद केलेल्या बाबींची जे गणेश मंडळ पूर्तता करणार आहेत, त्यांना गुणांकन देऊन विजेत्याची निवड करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीची रचना पुढील प्रमाणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. शासकीय / शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, संबंधीत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी या समितीचे सदस्य राहतील. सदर समिती गणेशोत्सव उत्सव स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक ती माहिती, व्हिडिओ, कागदपत्र मंडळाकडून प्राप्त करून घेतील व दिनांक 13 सप्टेंबर पर्यंत मंडळांना दिलेले गुणांकन राज्य समितीला सादर करतील.

 

राज्यस्तर समितीची रचना करण्यात आली असून यात सर जे.जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता / वरिष्ठ प्राध्यापक, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील वरिष्ठ गट अ मधील अधिकारी यांचा समावेश आहे. राज्यस्तर समिती ही जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येकी एक याप्रमाणे 36 शिफारस प्राप्त गणेशोत्सव मंडळामधून गुणांकनाच्या अधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करतील.

000000   

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  36 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नांदेड ग्रामीण 1, हदगाव 1 असे एकूण 3 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 415 एवढी झाली असून यातील 1 लाख 704  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3 तर नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 9 असे एकूण 12  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 8,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 11 असे एकूण 19 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 16 हजार 845
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 96 हजार 11
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 415
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 704
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-19
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 निवडणूक ओळखपत्रांशी

आधार लिंकीगसाठी शिबिराचे आयोजन   

·         11 सप्टेंबर रोजी मासिक विशेष शिबिराचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी, मतदारांचे निवडणूक ओळखपत्रांशी आधार लिंकींग करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याअनुषंगाने मतदार यादीच्या डाटाचे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मतदारांकडून आधार तपशिल गोळा करण्याबाबतच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. जास्तीत जास्त लोकसहभाग व मतदारांचे निवडणूक ओळखपत्रांशी आधार लिंकीग करण्यासाठी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील 344 तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील एकुण 308 मतदान केंद्रावर 10 सप्टेंबर 2022 पर्यंत शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार तथा सहा. मतदान नोंदणी अधिकारी यांनी केले आहे. 

मतदारांनी पुढीलप्रमाणे मतदार ओळखपत्रास आधार लिंकीग करुन घ्यावे. मतदाराना व्होटर हेल्प लाईन ॲपद्वारे आधार लिंकीग करण्यासाठी निर्देशित करावे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक चालक यांच्याद्वारे मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. तसेच दंवडीद्वारे याबाबत प्रचार व प्रसार करण्यात यावा. संबंधित बीएलओशी संपर्क करुन मतदान केंद्रावर जावून मतदार ओळखपत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. तहसिल कार्यालय नांदेड येथील बीएलओ कक्ष (निवडणूक विभाग) येथून मतदार ओळखत्रास आधार लिंकीगचे काम करुन घेण्यात यावे. नांदेड तालुक्यातील सर्व सेतू सुविधा केंद्रावर विनामुल्य देखील 100 टक्के मतदार ओळखपत्राशी आधार लिंकीगचे काम पूर्ण करुन घ्यावे. 

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 11 सप्टेंबर 2022 रोजी मासिक शिबिराचे आयोजन मतदार केंद्रावर करण्यात येणार आहे. या शिबिरात उर्वरित असलेले मतदार ओळखपत्राशी आधार लिंकीगचे काम 100 टक्के पूर्ण करुन घ्यावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या आहेत. याबाबत सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे संबंधित वसुली अधिकारी, सुपरवायझर यांना आदेशित केले आहे, असे तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 नरेगा विभागात तक्रार निवारण प्राधिकारी नियुक्त 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्हाधिकारी कार्यालयातील नरेगा विभागास तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून बी.पी. घाडगे यांची निवड झाली आहे. 1 ऑगस्ट पासून ते रुजू झाले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता निर्माण होण्याच्या दृष्टीने तक्रार निवारण प्राधिकारी तथा स्वायत व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना कक्षात तक्रार पेटी ठेवण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेसंदर्भात अथवा मनरेगा संदर्भात जर कुणाच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारी आता जिल्हाधिकारी कार्यालयात उपरोक्त प्राधिकारी यांच्याकडे नोंदविता येतील असे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी कळविले आहे. 

 सर्व सामान्य नागरिकांना या योजनेतर्गत काम करणारे, मजूर या योजनेचे लाभार्थी तसेच क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व अंमलबजावणी यंत्रणाना असणे आवश्यक आहे. त्यासाठी या व्यवस्थेची माहिती दर्शविणारे फलक अथवा पोस्टर्स/फ्लेक्स सर्व पंचायत समिती, तहसिल कार्यालय, सर्व अंमलबजावणी यंत्रणाची तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय/मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपवनसंरक्षण वन विभाग/विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग नांदेड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय/जिल्हा रेशीम विभाग, सर्व ग्रामपंचायत स्तरावर व इतर संबंधित कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. याच बरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो कक्षात तक्रार पेटी ही ठेवण्यात आली आहे. ज्याना तक्रार सादर करयची आहे त्यांनी बाळासाहेब घाडगे, तक्रार निवारण प्राधिकारी (नरेगा), जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड (रोहयो विभाग), मोबाईल क्रमांक 9405806999/9423135100, ई-मेल- ghadgepatil222@gmail.com  वर संपर्क साधावा असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

0000

 ई-पीक पाहणी ॲपद्वारे

शेतकऱ्यांनी पीक पाहणी करुन घ्यावी

-         जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी-          

नांदेड (जिमाका) दि. 29 :- खरीप हंगाम 2022 ची पीक पाहणी नोंदविण्याची मोहिम 1 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या मोहिमेत 100 टक्के पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अप्लीकेशनद्वारे करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पिक पेरा याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी वेळेत ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे. 

कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना उदा.महाडीबीटी, शासकीय धान्य खरेदी , पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत तसेच इतर काही योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्वभवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

00000

 पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी

सर्वाधिक प्राधान्य द्या

- जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी 

·  परस्पर हिताला जपत मोठ्या उत्साहात

गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्धार 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- गत दोन वर्षात इतर उत्सवासह गणेश उत्सव आरोग्याला प्राधान्य देत आपण मर्यादेत साजरा केला. यावर्षी आरोग्याचे आव्हान कमी असले तरी पर्यावरण संतुलनाचे आव्हान मात्र कायम आहे. हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आपण घरापासून ते गणेश उत्सव मंडळापर्यंत पर्यावरणपुरक हिताला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन येथे आयोजित आज शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.   

या बैठकीस महापौर जयश्रीताई पावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, शांतता समितीची सन्माननीय सदस्य गोविंदप्रसाद बालाप्रसाद बालानी, बाबा बलविंदर सिंघ, भदन्त पंच्चाबोधीजी थेरो, संपादक मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, मो. शोएब मो. खालेद व इतर मान्यवर उपस्थित होते. 

राज्यातील गणेश उत्सवासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक एक आठवड्यापूर्वी झाली. यात राज्य पातळीवर शासनाकडून पुरस्कार देण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत राज्य पातळीवर उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळासाठी रोख 5 लाख, 2 लाख 50 हजार आणि 1 लाख रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली. उत्कृष्ट गणेश उत्सव निवडीसाठी शासनाने पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (प्लास्टिक आणि थर्माकोल याचा वापर नाही), ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूल, सामाजिक सलोखा आदी विषयावर देखावा, सजावट या कार्यासाठी विशेष गुण शासनाने दिले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट आणि गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा याला सर्वाधिक प्रत्येकी 25 गुण देण्यात आलेले आहेत. निवडीच्या या निकषावरुन पर्यावरणपूरक गणेश उत्सवाला चालना देण्याचे शासनाचे धोरण स्पष्ट असल्याचे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. 

सोशल मिडियाचा गैरवापर झाल्यास कठोर कारवाई

-        जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे 

शांततापूर्ण गणेश उत्सव ही नांदेडची ओळख आहे. येथील विविध धार्मिक स्थळातून संहिष्णुतेला अधिक प्राधान्य दिले गेले आहे. यावर्षीचा गणेश उत्सव सर्व नांदेडकर तेवढ्याच जबाबदारीने व आनंदाने साजरा करतील. कोणीही कायदाचा भंग करणार नाही याची मला खात्री असून सोशल मिडियावर पोलीसांचा कडा पाहरा असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्पष्ट केले. गत एक वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्यात किमान एक हजारावर व्यक्तींना आपण सोशल माध्यमाच्या गैर वापराबद्दल कारवाई केली आहे. हे तरुणांनी लक्षात घेऊन अधिक सकारात्मक सामाजिक काम करण्याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डीजे सारख्या वाद्यांना बंदी आहे. याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतीच्या मूर्तींना अटकाव करण्यात आला आहे. लोकांनीच कायदा समवेत स्वयंशिस्त पाळून प्रदूषण मुक्त व पर्यावरणयुक्त गणेश उत्सवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 विसर्जनाच्यावेळी मोठ्या गणेश मंडळांनी

आपली वेळ विभागून घ्यावी - महापौर जयश्रीताई पावडे 

सर्वच गणेश उत्सव मंडळ एकाचवेळी विसर्जनासाठी बाहेर पडतात. प्रत्येकात उत्साह संचारलेला असतो. तथापि यावेळा जर विभागून वेगवेगळ्या घेता आल्या तर त्याची सर्वाअर्थाने जिल्हा प्रशासनाला मदत होईल व प्रत्येकाला आपला आनंद द्विगुणित करता येईल, असे महापौर जयश्रीताई पावडे यांनी सांगितले. गणतीच्या विसर्जनाच्या पावित्र्यासमवेत आपण श्रद्धेने घेतलेल्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळणाऱ्या आहेत का हेही तपासूण घेतले पाहिजे. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना घेण्याऐवजी शाडू मातीच्या अथवा निसर्गपूरक मूर्ती लोकांनी बसविण्यावर भर दिला पाहिजे. याचबरोबर देवाला अर्पण केलेले निर्माल्य, वस्त्र हे कोणत्याही परिस्थितीत नदीत जाता कामा नयेत, अशा सूचना महापौर जयश्रीताई पावडे यांनी यावेळी केल्या. महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरण गणेश उत्सवाला चालना देण्यासाठी झोननिहाय पुरस्कार देत असल्याची घोषणा त्यांनी या बैठकीत केली. 

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी

मनपाकडून स्वतंत्र व्यवस्था

- आयुक्त डॉ. सुनील लहाने   

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार गोदावरी, आसना नदीतील पाण्याचे प्रदुषण होऊ नये म्हणून आपली श्री गणेश मूर्ती (पीओपी) नदीपात्रात विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यासाठी महानगरपालिकेच्यावतीने सांगवी (आसना नदी) आणि पासदगाव या दोन ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात अशा गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. याचबरोबर नानकसर गुरुद्वारा साहिब झरी (खदान) या तलावात मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आल्याचे मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सांगितले. मनपाच्यावतीने क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रत्येक झोनमध्ये मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात येत असून आपण प्रत्येकाने त्या-त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांकडे आपली मूर्ती सुपूर्द करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या सन्मानिय सदस्यांनी अमूल्य सूचना केल्या.

000000





  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...