Friday, November 11, 2016

बिहारचे राज्यपाल कोविंद यांचे
शासकीय विश्रामगृह येथे स्वागत
नांदेड, दि. 11 :-  बिहारचे राज्यपाल राम नाथ कोविंद यांचे आज नांदेड दौऱ्यासाठी येथे आगमन झाले. राज्यपाल श्री. कोविंद यांचे शासकीय विश्रामगृह नांदेड येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यासोबतच राज्यपाल श्री. कोविंद यांचे महानगरपालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनीही पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार पी. के. ठाकूर, तहसिलदार महादेव किरवले, तहसिलदार किरण अंबेकर आदींची उपस्थिती होती. आगमनानंतर मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल श्री. कोविंद यांनी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्याकडून जिल्हासंबंधी विविध विषयांची माहिती घेतली.
0000000

तोडकर / आरेवार 11.11.2016
कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे आवाहन
नांदेड दि. 11 - शासन अध्यादेशानुसार शनिवार 19 नोव्हेंबर ते शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016 या कालावधी जिल्ह्यात कौमी एकता सप्ताह म्हणून व 20 नोव्हेंबर हा अल्पसंख्याक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व निमशासकीय, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आदींसह विविध यंत्रणांनी दखल घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहात शनिवार 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस, रविवार 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक  कल्याण दिवस, सोमवार 21 नोव्हेंबर भाषिक सुसंवाद दिवस, मंगळवार 22 नोव्हेंबर दुर्बल घटक दिवस, बुधवार 23 नोव्हेंबर सांस्कृतिक एकता दिवस, गुरुवार 24 नोव्हेंबर महिला दिन आणि शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016 पर्यावरण जोपासना दिवस साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार 19 नोव्हेंबर रोजी शासनाच्या सर्व कार्यालयातून तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. हा सप्ताह साजरा करण्यासाठी संबंधितांनी अल्पसंख्याक विकास विभाग 3 नोव्हेंबर 2015 रोजीच्या शासन परिपत्रकाचे अवलोकन करावे व आपल्या अधिनस्त यंत्रणांद्वारे सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करावा , असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे. 

0000000
कापूस, तूर पिक संरक्षणासाठी संदेश
नांदेड, दि. 7 :-  उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर अंतर्गत देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या पाच तालुक्यासाठी कापूस व तूर पिकासाठी क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकावरील किडरोग सर्वेक्षणाचे काम चालू आहे. किड सर्वेक्षक, किड नियंत्रक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून पुढील प्रमाणे संदेश दिला आहे.
कपाशीवरील लाल्या रोग आढल्यास मॅग्नेशियम सल्फेट 0.2 टक्के 20 ग्रॅम 10 लिटर किंवा युरीया 2 टक्के पाण्यात मिसूळ फवारावे. तुरीवरील शेंगा खाणाऱ्या अळ्यासाठी प्रोफेनोफॅस 50 टक्के 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. घाटे आळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत.

000000
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आज आयोजन
नांदेड, दि. 11 :- जिल्हा न्यायालय नांदेड येथे आज शनिवार 12 नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकन्यायालयामध्ये दिवाणी, फौजदारी, भूसंपादन, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे तसेच विविध बॅंकांची तसेच विविध मोबाईल कंपन्यांची दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार असून अद्यापपर्यंत 2 हजार 984 दाखलपुर्व प्रकरणे व न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 2 हजार 440 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. लोकन्यायालयात आपली प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
             लोकन्यायालयासाठी जिल्हा न्यायालयात 8 पॅनल तयार करण्यात आली आहेत. त्याद्वांरे न्यायालयातील न्यायाधीश व विधीज्ज्ञ सामोपचाराने प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. लोकन्यायालयाचे शनिवारी 12 नोव्हेंबर सकाळी 10.30 वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, पोलीस अधिक्षक संजय येनपुरे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, नांदेड अभियोक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद एकताटे, जिल्हा सरकारी वकील अॅड. अमरिक सिंघ वासरीकर, तसेच जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, विधिज्ज्ञ व निमंत्रितांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
विधीज्ज्ञ, भू-संपादनअधिकारी, विमा कंपनी अधिकारी, विविध मोबाईल कंपन्यांचे अधिकारी तसेच पक्षकारांनी आपली प्रकरणे या लोक न्यायालयात निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव न्या. . आर. कुरेशी यांनी केले आहे.

00000
रब्बी-उन्हाळी हंगामासाठी पाणी-पाळ्यांना
मान्यता, शेतकऱ्यांनाही नियोजनाचे आवाहन

नांदेड, दि. 7 :- जिल्ह्यातील शेतीसाठी रब्बी तसेच उन्हाळी हंगामासाठी द्यावयाच्या पाणी पाळ्याविषयी नियोजन करण्यात आले असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत पाणी पाळ्यांना (आवर्तन) कालवा सल्लागार समितीने मान्यता दिल्याची माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, इसापूर प्रकल्पांतर्गत तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प आणि लघुसिंचन प्रकल्पातील पाण्याचाही सिंचनासाठी पुरेपूर वापर व्हावा असे नियोजन असून, त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी योग्य पिकांची निवड, अन्यबाबीसांठी नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र.-1 च्या कार्यकारी अभियंता यांनी नांदेड जिल्ह्यासाठीच्या पाणी पाळ्या (आवर्तन)बाबत जाहीर प्रकटन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,  उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर उजवा मुख्य कालवा कि.मी.119 व इसापूर डावा कालवा कि.मी.84 च्या वितरण व्यवस्थेतंतर्गत सन 2016-17साठी प्रकल्पात उपलब्ध पाणी साठ्यातून पाणी सोडण्यास मुंबईत नुकताच जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार रब्बी हंगामात डिसेंबर 2016 व जानेवारी 2017 या कालावधीत दोन पाळ्या (आवर्तने) देण्यास तर उन्हाळी हंगामात मार्च ते जून 2017 या कालावधीत तीन पाळ्या (आवर्तने) देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करून, पाणी-पाळ्याचे वेळापत्रक लक्षात घेऊन, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करावे. तसेच त्यानुसार सिंचन क्षेत्राची मागणी गृहीत धरू
न विहीत नियमानुसार आपल्याशी संबंधित कार्यालयात अर्ज व देय पाणी पट्टी भरावी, असे आवाहनही जलसंपदा विभागाच्यावतीने प्रकटनात करण्यात आले आहे.
तत्पुर्वी, जिल्ह्यातील रब्बी व उन्हाळी पाण्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड पाटबंधारे मंडळ व इतरही संबंधित यंत्रणांकडून नुकताच आढावा घेतला. या आढाव्यानंतर जिल्ह्यातील आमदुरा, बळेगाव आणि डिग्रस या प्रकल्पांत पुरेसे पाणी साठले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने रब्बी –उन्हाळी हंगामात घ्यावयाच्या पिकांचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले. बंधाऱ्यावरील पाणी वापराबाबत संबंधित यंत्रणेकडे म्हणजेच नांदेड पाटबंधारे मंडळाच्या उत्तर व दक्षिण विभागांकडे पुर्वपरवानगी घेऊन, हे पाणी सिंचनासाठी वापरता येणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी व संबंधित संस्था आदींनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.  
जिल्हयातील मोठ्या प्रकल्पातील पाणी-पाळ्यांचे आणि अंतर्गत साठवण प्रकल्प, बंधारे आदीं ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी आतापासूनच चांगले नियोजन करावे. आवश्यक तेथे कृषि विभागाशी संपर्क-समन्वय ठेवून मार्गदर्शन, सल्ला घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी केले आहे.

00000