Thursday, January 22, 2026

वृत्त क्रमांक 93

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

 - हिंद दी चादर गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम

नांदेड, दिनांक २२ (जिमाका) : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी  समागम वर्षाचे औचित्य साधून, आज पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेले श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'चे गायन, ज्याने उपस्थित संगतांना मंत्रमुग्ध केले.

पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम आज पार पडला.  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचे  ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे  जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ.  विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे), हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती.  

विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण  तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी (संगत) मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.

****















 वृत्त क्रमांक 92

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम स्थळी 

जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा; भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम असर्जन परिसरातील मोदी मैदानावर संपन्न होणार आहे.

या पावन शहीदी समागमास नांदेड शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोयीसाठी नांदेड शहर व परिसरातील विविध गावे व ठिकाणांहून कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी २०० पैक्षा अधिक वाहनांची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. यात स्कुलबस व इतर वाहनांचा समावेश आहे.

या मोफत वाहतूक सुविधेमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ व वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचता येणार असून, ज्येष्ठ नागरिक, महिला व कुटुंबीयांसाठी ही व्यवस्था विशेष लाभदायक ठरणार आहे.

तरी सर्व भाविक व नागरिकांनी या मोफत वाहतूक सुविधेचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागम कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.

००००००

 वृत्त क्रमांक 91

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम पार्श्वभूमीवर २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी

नांदेड दि.२२ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त असर्जन परिसरातील मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पावन शहीदी समागमासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नांदेड येथे उपस्थित राहणार असल्याने शहर व तालुक्यात मोठी वर्दळ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तसेच वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी नांदेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक व नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये, तसेच कार्यक्रमाचे आयोजन सुव्यवस्थित आणि शांततेत पार पडावे, हा यामागील उद्देश आहे.

तरी सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा व धर्म, मानवता आणि बलिदानाच्या या ऐतिहासिक शहीदी समागमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले आहे.

०००००


 

 वृत्त क्रमांक 90

शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त 24 जानेवारी रोजी भव्य मिरवणूक

मिरवणूकीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी व फुलांची सजावट

नांदेड, दि. २२ जानेवारी :- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी रोजी मोदी मैदानावर भव्य व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमस्थळी दोन्ही दिवस श्री गुरुग्रंथ साहिब विराजमान राहणार आहेत. 

या अनुषंगाने 24 जानेवारी रोजी सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा ते मोदी मैदान पर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून त्यावर हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी करण्यात येणार आहे. संपूर्ण मिरवणूक मार्ग फुलांनी सजविण्यात येणार आहे.

ही भव्य मिरवणूक भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती व आध्यात्मिकतेचा अविस्मरणीय अनुभव ठरणार असून, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

 Witness History in Nanded! "Hind-Di-Chadar" 350th Martyrdom Commemoration

The historic land of Nanded is all set to host the grand commemoration of Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji's 350th Martyrdom. Organized by the Government of Maharashtra and Takhat Sachkhand Sri Hazur Sahib, this event is a tribute to the supreme sacrifice made for the protection of Dharma.
Distinguished Guests: Union Home Minister Shri Amit Shah Ji, Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, UP CM Yogi Adityanath Ji, and other eminent leaders.
Spiritual Presence: Seek blessings from Sant Giani Harnam Singh Khalsa, Pt. Dhirendra Krishna Shastri (Bageshwar Dham), H.B.P. Sanjay Maharaj Pachpor, and many other revered saints.
Come, let us be witnesses to this great saga of valor!
🗓 Date: January 24th & 25th, 2026 📍 Venue: Modi Ground, Vaghala, Nanded clock Time: 8:00 AM to 10:00 PM




विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...