Friday, June 21, 2019

अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग सुरु होणार




नांदेड दि 21 :- अल्पभाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाऊंडेशन वर्ग सुरु होणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्व अमराठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपले प्रस्ताव 25 जून 2019 पर्यंत शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) व्यंकटराव तरोडेकर चेंबर्स चैतन्यनगर नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.
अमराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मराठी भाषेवर प्रभुत्व प्राप्त व्हावे व त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी मदत व्हावी, केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना पुरेशीसंधी उपलब्ध करुन देण्यासाठी व मराठी भाषेवर प्रभुत्व वाढावे यासाठी शासन निर्णयान्वये अमराठी शाळांमधील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनासाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग 1 जुलै 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत सुरु करण्यात येणार आहेत. या वर्गास नमूद कालावधीत शिकविण्यासाठी मानसेवी शिक्षकांची मानधन तत्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. सदर शिक्षक बीएड / एमएड अर्हताधारक असावा व इयत्ता आठवी ते दहावीच्या अमराठी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यास सक्षम असावा.
यापुर्वी ज्या शाळांमध्ये मराठी भाषा फाउंडेशन वर्ग चालू आहेत अशा शाळांनी व नव्याने वर्ग सुरु करावयाचे आहेत अशा शाळांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील अमराठी विद्यार्थ्यांची संख्या व मराठी भाषेचा मागील वर्षाचा निकाल पत्राची प्रत प्रस्तावासोबत जोडावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.  
000000



पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा

नांदेड दि 21 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 22 जून 2019 रोजी परभणी येथून दुपारी 4 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. दुपारी 4 ते 5.30 वाजेपर्यंत नांदेड येथे विविध विमा केंद्रांना भेटी. सायं. 5.45 वा. नांदेड रेल्वेस्थानक येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000


पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा  

नांदेड दि 21 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 23 जून 2019 रोजी सकाळी 8.30 वा. परभणी येथून मोटारीने सकाळी 10 वा. नांदेड येथे आगमन व पिक विमा शेतकरी मदत केंद्र येथे उपस्थिती. सकाळी 11 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील.
000000



अन् मुख्यमंत्र्यांनी मुलींचे
म्हणने मान्य केले....!
नांदेड दि. 21 :- योग शिबिरातून प्रस्थान करताना माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी काही मुलां-मुलींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली. श्रेयस मार्तडे यांच्या  स्मृती योगा ग्रुपच्या मुलां-मुलींचा हा संच होता. योगा प्रात्यक्षिकाची चांगली तयारी आणि त्याचा अनेक दिवसाचा सराव करुन या आम्ही योगाच्या प्रात्यक्षिकांची तयारी केली होती. आपण थांबा आणि आमचे सादरीकरण बघा असे समृध्दी कडगे, त्रिशा मारकोळे या मुलींनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील महत्वाच्या कार्यक्रमासाठी जाण्याचे थोडावेळ थांबवून या मुलींचे म्हणणे मान्य केले. मुख्यमंत्र्यांनी या मुलांना स्वत: स्टेजवर आणले. त्यांच्यासोबत फोटो काढले. तेंव्हा कुठे या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या मुलांनी अतिशय चापल्याने एकापेक्षा एक सरस योगा प्रात्यक्षिकं दाखवून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर रामदेवबाबा यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे जाहीर कौतूक केले.



राज्यस्तरीय योग शिबिरात नांदेडकरांनी
अनुभवला चैतन्याचा अखंड झरा... 
नांदेड दि. 21 :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शिबिरात नांदेडकरांसहीत राज्यभरातून आलेल्या योगसाधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबांच्या योग सादरीकरणाचा चैतन्यदायी अखंड खळखळणारा झरा अनुभवला. यावेळी योगसाधकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. या उत्साही वातावरणात सहभागी घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाल्याचा आनंद नांदेडकरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. 
नांदेड शहरातील शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) येथे राज्यस्तरीय योग दिनासाठी मागील दहा दिवसापासून राज्य शासनाच्या विविध आस्थापना आणि पतजंली योगपीठाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम आज भल्या पहाटे दिसून आला. नांदेड शहरातील  शिबिराकडे जाणारे रस्ते वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी युवक-युवती , महिला -पुरुष, अबाल वृध्द , शिक्षकवर्ग , विद्यार्थी असे शहरी, ग्रामीण भागातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग जाणवत होता. कार्यक्रम स्थळाकडे शिस्तबध्दरितीने लाखोंच्या संख्येने जाणाऱ्या लोकांमध्ये उत्साह दिसून येत होता.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रशासकीय यंत्रणातील महसूल, पोलीस, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, होमगार्ड, जिल्हा परिषद, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यासह विविध स्वंयसेवी संस्था व संघटना यांच्या स्वंयसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमस्थळी मुख्य व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या योग प्रात्यिक्षिकांना एका भव्यदिव्य सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पांढऱ्या शुभ्र पोषाखामधील लाखों नागरिक योगासनाचे विविध प्रकार करीत होते. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, गोल्डन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे निरीक्षण आणि वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्येक क्षणाची नोंद घेत होते. विविध वृत्त वाहिन्यांद्वारे याचे थेट प्रसारण जगभरातील 177 देशातील नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी यांची सुरु असलेली लगबग जाणवत होती.
भारतीय परंपरेतील पाच हजार वर्षांपेक्षा जुन्या योग विद्येला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त करुन देतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघातून योगदिन हा जगभरात साजरा केला जावा. या मांडलेल्या प्रस्तावाला जगातून 177 देशांनी पाठींबा दिल्याने सुरु झालेला आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सलग पाचवे वर्ष असल्याने राज्यस्तरीय शिबिराचा बहुमान नांदेड नगरीला प्राप्त झाल्याने हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवून आपल्या मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती उत्साही दिसत होता.
सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये विविध भागातील जातीधर्मातील लोकांच्या मनामध्ये योगाबद्दल असलेली आस्था त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियातून जाणली.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या पांगरा गावाच्या श्रीमती नंदाबाई कदम म्हणाल्या, शहरापासून दूर असूनही आमच्या खेडेगावात योगाबद्दल जनजागृती वाढत आहे. नियमितपणे योगासाने करणारी अनेकजण आहेत. त्यांना या भव्य योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. परंतु सगळ्यांना येणे शक्य नसल्याने गावातील 50 महिला आणि पुरुषांचा चमू या कार्यक्रमासाठी आज येथे आलेला आहे . येथील कार्यक्रम पाहून आनंद झाला असून त्याची माहिती आम्ही गावातील इतरांना देणार आहोत.

नांदेडच्या नागार्जून नगर भागातील उर्दू प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती रिझवाना अंजूम यांनी सांगितले की, आम्ही योगदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह सहभागी झालो आहोत. योगगुरु रामदेवबाबांना प्रत्यक्षात योगासने करुन दाखवतांना पाहता आले, ही कायम स्मरणात राहणारी घटना आहे.
        नांदेडच्या सचखंड विद्यालयातील  अनिल कौर रामगडीया आणि हरजिंदर कौर या शिक्षिका म्हणाल्या  की, आरोग्यपूर्ण जीवनासाठी योगा हा महत्वाचा असल्याचे जाणवल्याने आमच्या विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक नियमितपणे योगा करतात. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने आम्हाला यामध्ये सहभागी होता आले, याचा खुप आनंद वाटतो.
नांदेड येथील गुरुदत्त रिसर्च फाऊडेंशनचे फिजिओथेरेपी महाविद्यालयाचे डॉ. राहूल अशोक मैड यांनी सांगितले की, व्यायाम आणि योगासने आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून त्यामुळे आपणाला शारिरीक दुखण्यांपासून दूर राहण्याची आणि आनंदी जीवन जगण्याची संधी मिळते. यासाठी योगासनांबाबत जणजागृतीसाठी महाविद्यालयातील अध्यापक आणि विद्यार्थी योगदान देतात. तसेच त्याबद्दलची शास्त्रोक्त माहितीही देण्याचा नियमित प्रयत्न केला जातो. आजच्या योगदिनात सहभागी होण्यासाठीदेखील आम्ही लोकांना प्रेरित केले.
        
भंडारा जिल्ह्यातील सेंदुरवाफा गावातल्या योगप्रचारक प्रिती प्रकाश डोंगरवार यांनी सांगितले की, योगप्रचारक प्रकल्प, पतजंली योग समिती योगासनासाठी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात जगभर कार्य करते आहे. शासनाने हा उपक्रम योगदिनाच्या माध्यमातून जगभरात नेवून याला मोठी मान्यता दिली आहे. यामुळे आमच्या उत्साहात भर पडली असून आजच्या योगदिनासाठी आमच्या भंडारा जिल्ह्यातून योग साधकांचे व प्रचारकांचे पथक पंधरा दिवसांपासून नांदेड येथे आलेले होते. मी स्वत: गृहीणी असून मला योगाचे महत्व पटल्याने इतरांना देखील ते सांगण्यासाठी मी हे काम करते आहे. आम्ही नांदेड शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी जावून लोकांना योगासनांबाबत तसेच आजच्या योगदिनाबद्दल माहिती दिली. वर्षभराच्या इतर कालावधीत योगशिबीर, आरोग्यसभा याद्वारे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत.     
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलीत या सोहळ्याच्या रुपाने संपन्न झाल्याने आयोजक, प्रशासन आणि स्वंयसेवक यातील प्रत्येकाला आनंद झाल्याचे दिसून आले.        
0000




योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
§  नांदेडचा एकाचवेळी विक्रमी संख्येने योगा शिबीरात सहभागी होण्याचा जागतिक विक्रम
§  यापुर्वीचा विक्रम मोडीत काढत गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डकडून प्रमाणपत्र मिळविले.
§  2040-50 दरम्यान भारत सर्वात मोठे आध्यात्मिक व सामर्थ्यशली राष्ट्र होणार
§  योग दिनाच्या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख लोकांची उपस्थिती
नांदेड दि 21:- प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे. म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी योगगुरु स्वामी रामदेवबाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई चिखलीकर-देवरे, प्रविण पाटील चिखलीकर, औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील 150 पेक्षा अधिक देशात सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.  
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात येण्याची विनंती बाबाजींना केली असता, त्यांनी ती तातडीने मान्य केली. त्यांना आम्ही हा कार्यक्रम मराठवाड्यातील नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना मोठा आनंद झाला होता. बाबाजी या राज्यस्तरीय शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे खूपखूप आभार , असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले . भारताची प्राचीन योग विद्या योगगुरु रामदेवबाबा यांनी संपूर्ण देशाबरोबरच ती जागतिक स्तरावरही पोहोचविली, याचा अभिमान असून आज नांदेडच्या पावनभूमीत प्रत्यक्ष रामदेवबाबा हे आपल्याला योग विद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आलेले आहेत. या संधीचा लाभ घेऊन नांदेड जिल्हा वासियांनी निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी नियमीत योगासने करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
भारत देश हा प्राचीन योग विद्येच्या माध्यमातून अध्यात्म महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजनैतीकदृष्ट्या भारत अधिक सुरक्षित होत असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगून सन 2040 ते 2050 दरम्यान भारत विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले.
आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथे जमलेल्या प्रत्येक नागरिकांने योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म व सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
योगा शिबिराची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
एकाचवेळी एकाच ठिकाणी 91 हजार 323 लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी मोडला जाऊन नांदेडच्या पावनभूमीत एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली.
यावेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली. जागतिक विक्रम नांदेडकरांनी प्रस्थापित केल्याचे गोल्डन बुक प्रमाणपत्र श्री. विष्णुई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांना यावेळी दिले. आयुष विभागाने तयार केलेल्या पवनी या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पतंजलीच्यावतीने स्वदेशी समृद्धी कार्ड अंतर्गत पतंजली कार्यकर्त्यांना मदत देण्यात येत असते. नांदेड येथील पतंजली कार्यकर्त्याचा अपघात होऊन जायबंदी झाल्याने त्या कार्यकर्त्यांला पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.
मेरा जीवन-मेरा मिशन
रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित मेरा जीवन, मेरा मिशन या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या आत्मचरित्राच्या पुस्तकांची प्रकाशनापूर्वीची विक्रीची नोंदणी आजपासून सुरु झाली. यावेळी श्री फडणवीस यांनी या आत्मचरित्राच्या 100 पुस्तकांची आगाऊ मागणी नोंदविली असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी रामदेवबाबा यांनी व्यासपीठासह सर्व योग साधकांना शरीराला ऊर्जा प्राप्त करुन देणाऱ्या योगींग-जॉगींग आसनाने सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगासनांचे विविध प्रकार केले. यावेळी सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत रामदेवबाबा यांनी सूर्यनमस्कार, ताडआसन, त्रिकोण आसन, वृक्षासन, गरुडासन आदि अनेकविध आसनांचे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. जयदीप आर्या यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख नागरिकांची उपस्थित होती.
000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...