Saturday, February 18, 2017

जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना
समाज कल्याणचे आवाहन 
नांदेड दि. 18 :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील दिव्यांगासाठी (अपंगासाठी) राखून ठेवलेल्या 3 टक्के अनुदानाच्या लाभार्थी योजनेसाठी अर्ज केलेल्यांनी सोमवार 27 फेब्रुवारी रोजी नृसिंह विद्यामंदीर नांदेड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्व:उत्पन्नातील अपंगासाठी राखून ठेवलेल्या 3 टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्याबाबत ज्या लाभार्थ्यांनी तालुका पंचायत समितीमार्फत अर्ज सादर केली आहेत व ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी सोमवार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. नृसिंह विद्यामंदीर, डॉ. काब्दे हॉस्पीटलच्या मागे, पारसनगर नांदेड येथे अर्जातील नमूद केलेल्या कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित रहावे, असेही आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000000
महाराष्ट्र हरित सेनावर  विविध घटकांनी
उत्स्फुर्तपणे नोंदणी करावी - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेडला आघाडीवर ठेवण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 :- वन विभागाच्‍या `महाराष्‍ट्र हरित सेना` या योजनेच्‍या संकेतस्‍थळावर जिल्ह्यातील विविध घटकांनी उत्स्फुर्तेपणे सदस्‍य म्‍हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. यात वैयक्तीकरित्या आणि सामुहिकरित्या सदस्यत्त्व नोंदणीत नांदेड जिल्ह्यातील घटकांनी प्रयत्न करावेत आणि जिल्ह्याला या नोंदणीत आघाडीवर ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
हरितसेनेत समाविष्ट होण्यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in वर नोंदणी करता येणार आहे. याद्वारे नोंदणी केल्यानंतर संबंधितांचे प्रमाणपत्रही तयार होईल. वैयक्तीक सदस्यत्त्वात विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, तसेच खासगी संस्थांचे कर्मचारी, अधिकारी, व्यावसायीक, ज्येष्ठ नागरिक यांना नोंदणी करता येईल. तर सामुहिकरित्या सदस्यत्त्वात निमशासकीय व अशासकीय संस्था, शैक्षणीक संस्था, सहकारी संस्था, औद्योगीक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांना नोंदणी करता येते.
नियोजित 50 कोटी वृक्षारोपणाचा व संगोपनाचा कार्यक्रम लोकसहभागाद्वारे जन चळवळीत रुपांतरीत करुन यशस्‍वीरित्‍या राबविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी `महाराष्‍ट्र हरित सेना` स्‍थापित करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्‍या अनुषंगाने महाराष्‍ट्र हरित सेनेचे सदस्‍य म्‍हणून नोंदणी करण्‍यासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्‍थळाची निर्मिती करण्‍यात आली आहे. या संकेतस्‍थळावर दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत किमान 1 कोटी लोकांनी, स्‍वयंस्फूर्तीने स्‍वयंसेवक म्‍हणून या उपक्रमाचे सदस्‍य म्‍हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रीन आर्मीचे सदस्‍य असलेल्‍या सभासदांना वृक्ष लागवड, संगोपन, वन व वन्‍यजीव आणि वन विभागातील संबंधित क्षेत्रामध्‍ये आपले योगदान देता येईल. तसेच या उपक्रमात उत्तम काम करणाऱ्या सभासदांना बक्षिस योजना व इतर सवलतीद्वारे सन्‍मानित करण्‍याची योजना विचाराधीन आहे. नोंदणीची पद्धत अत्‍यंत सोपी असून वर नमूद संकेतस्‍थळावर आवश्‍यक ती माहिती भरल्‍यानंतर सभासद नोंदणी झाल्‍याचे आणि त्‍यानुसार प्रमाणपत्र सिस्टिममध्‍ये तयार होऊन सदस्‍याच्‍या मेल आयडीवर आणि एसएमएस वर पाठविले जाईल.
जिल्‍ह्यातील विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी, त्‍यांचे कुटुंबिय, आप्‍तेष्‍ट, मित्र परिवार, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय आणि खाजगी संस्‍था यांनी महाराष्‍ट्र हरित सेनेमध्‍ये सदस्‍य नोंदणी केल्‍यास त्‍यांना अशा उपक्रमात काम करण्‍याची संधी मिळेल. या लोकोपयोगी आणि सध्‍याच्‍या व भविष्‍यातील पिढीला उत्तम व सुरक्षित पर्यावरण देण्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वांनी `महाराष्‍ट्र हरित सेनेचे` सदस्‍य म्‍हणून नोंदणी करण्‍याबाबत आवाहन आहे. तसेच याबाबत संनियंत्रण व समन्‍वय करुन जास्‍तीत-जास्‍त सदस्‍य नोंदणी होण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात येत असल्‍याचे श्री. काकाणी यांनी सांगितले. या नोंदणीत नांदेड आघाडीवर राहील, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल या पार्श्‍वभूमीवर आणि राज्‍यातील वनक्षेत्र 20 टक्क्यांवरुन 33 टक्‍केपर्यंत नेण्‍याचा भाग म्‍हणून, वृक्षारोपणाची गती तुटू न देता, त्‍यामध्‍ये सातत्‍य ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्‍यानुसार पुढील तीन वर्षात 50 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्‍ट ठरविण्‍यात आले आहे. त्‍याबाबत कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करण्‍याबाबत आवश्‍यक सूचना करण्‍यात आल्‍या आहेत. राज्‍यामध्‍ये 1 जुलै, 2016 रोजी जनतेच्‍या सहभागाने एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लावण्‍याचे उद्दिष्‍ट सहज ओलांडले गेले. प्रत्‍यक्षात एकाच दिवशी 2.83 कोटी वृक्ष लागवड झाली. `लिमका बुक ऑफ रेकॉर्ड` या संस्‍थेने या आगळ्या वेगळ्या आणि नाविन्‍यपूर्ण कार्यक्रमाची दखल घेतली आहे.
00000000
पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे
मार्चमध्ये आयोजन ; नियोजनास प्रारंभ
नांदेड दि. 18 :- कृषि विषयक विकसीत तंत्रज्ज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसांचे जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्याचा कृषि महोत्सव 22 ते 26 मार्च, 2017 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवा-मोंढा येथील मैदानावर या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा समितीची नियोजनाची प्राथमिक बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
       
बैठकीस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी पद्माकर केंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, किनवट आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे,  उपवनसंरक्षक सुजय डोडल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॅा. एस. बी. भातलंवडे, पशूसंवर्धन आयुक्त डॅा. स्मिता उके, सहायक प्रकल्प अधिकारी डॅा. प्रवीणकुमार घुले आदींची उपस्थिती होती.
या पाच दिवसी कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद-चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विक्रेता खरेदीदार संमेलन आणि शेतकरी सन्मान समारंभ असे घटक राहणार आहेत. कृषी प्रदर्शनात सुमारे दोनशे दालने असतील. यात शासकीय विभागांच्या दालनांसह, विविध कंपन्याचे, खाद्यपदार्थांचे, प्रात्यक्षिके यांचा समावेश राहील. कृषी तंत्रज्ज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, विविध कृषी महामंडळे, तसेच उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेतला जाणार आहे. परिसंवाद-चर्चासत्रात कृषी शास्त्रज्ज्ञ, तज्त्र अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक, यशस्वी शेतकरी-उद्योजक यांचे व्याख्यान-मार्गदर्शन यांचा समावेश राहणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्रामध्ये धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार मालाची विक्री करण्यात येणार आहे. याशिवाय विक्रेता खरेदीदार संमेलनात सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) प्रकल्प, कृषी माल प्रक्रिया उद्योजक आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यात संवाद घडवून आणण्यात येणार आहे. यातून बाजाराभिमुख कृषी विस्ताराला चालना मिळेल. शेतकरी सन्मान समारंभात जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी, तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी आदींचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.
            या पाच दिवसीय कृषी महोत्सवाची रुपरेखा निश्चित करण्यासाठी विविध यंत्रणांशी समन्वय साधण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कृषी महोत्सव शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे आणि जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, तसेच उद्योजक, संस्था, संघटना यांच्या समन्वयातून यशस्वीरित्या आयोजित करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले.

0000000
यशवंत महाविद्यालयात कर्करोग
जनजागृती कार्यक्रम संपन्न
नांदेड दि. 18 :- कर्करोग दिन व पंधरवाडा 4 ते 20 फेब्रुवारी 2017 या दरम्यान साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त शुक्रवार 17 फेब्रुवारी रोजी श्री गुरुगोबिंद सिंघजी मेमोरियल हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्यावतीने यशवंत महाविद्यालय येथील प्रेक्षागृह येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डॉ दिपक हजारी यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, तंबाखू हे मानवी आरोग्यास घातक आहे. याबद्दल विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषे माहिती दिली. त्याचबरोबर दंत शल्याचिकित्सक डॉ. रोशनी चव्हाण यांनी विद्यार्थांना तंबाखू सारख्या निकोटीनयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे कॅन्सरसह होणाऱ्या विविध आजाराची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात  प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव म्हणाले की, व्यक्ती तो कोणीही असो त्यास केवळ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाबरोबरच इतर कोणत्याही प्रकारच आरोग्यास घातक व्यसनापासून दूर राहायचे असेल तर इतर व्यक्तींच्या मदतीची गरज नसून स्वतः तसा निर्धार करणे आवश्यक आहे, असे सांगितले
यावेळी डॉ. आर. जी. चिल्लावर, प्रा. डॉ. पद्माराणी राव, प्रा. डॉ. एच. एस. पतंगे, प्रा. आर. एन. सोनवणे तसेच जिल्हा एनसीडी  समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

00000
शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी
तज्ज्ञ मार्गदर्शक नियुक्तीबाबत आवाहन
नांदेड दि. 18 :- उच्च माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणअंतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावीत, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
ज्या उच्च माध्यमिक शिक्षकांची सेवा 24 वर्षे पूर्ण झालेली आहे व ज्यांनी एम.एड. अथवा एम. फील. अथवा पी.एच.डी. अथवा एम.एस.ए.सी.आय.टी. या संगणक अभ्यासक्रमाची शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली आहे अशा अर्हताप्राप्त शिक्षकांसाठी निवडश्रेणी विषय निहाय 5 दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण व 11 दिवसांचे गृहकार्य पूर्ण करणे यांचे आयोजन मंडळामार्फत करण्यात येते.
वरील दोन्ही प्रशिक्षणाचे आयोजन मे-जून 2017 मध्ये विभागीय मंडळनिहाय करण्यात येणार आहे. या प्रत्यक्ष प्रशिक्षणापूर्वी तज्ज्ञमार्गदर्शकांसाठी 2 / 3 दिवसांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण एप्रिल 2017 मध्ये आयोजित करण्यात येईल. या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या शिक्षकांनी आपली माहिती पुढील दिलेल्या पात्रतेच्या निकषानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या तज्ज्ञ मार्गर्शकासाठी दिलेला फॉर्म http://traning.mh.hsc.ac.in या लिंकवर ऑनलाईन भरावा.
तज्ज्ञ मार्गदर्शक पदासाठी अर्हता, पात्रता पुढील प्रमाणे राहील. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तज्ज्ञांची समान आवश्यक पात्रता ही वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, विद्यापीठ स्तरावरील शिक्षक, शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आहे. वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण तज्ज्ञांसाठी अर्हता- क. महाविद्यालयातील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 12 वर्षे सेवा पूर्ण झालेला असावा. क. महाविद्यालयातील शिक्षकांचे स्वत:चे वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे. वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 15 वर्षाचा असावा.
निवडश्रेणी प्रशिक्षण तज्ज्ञांसाठी अर्हता– क. महाविद्यालयातील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव किमान 24 वर्ष सेवा पूर्ण झालेला असावा. क. महाविद्यालयातील शिक्षकांचे स्वत:चे निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे. वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांचा शैक्षणिक अनुभाव किमान 15 वर्षाचा असावा.
भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून आपल्या क. महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत 28 फेब्रुवारी 2017 च्या आत राज्य मंडळ कार्यालयास सादर करावयाचा आहे. त्यातून प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गर्शकांची निवड करण्यात येईल, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सचिव कृष्णकुमार पाटील यांच्यावतीने लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

000000
शिक्षकांच्या निवडश्रेणी सेवांतर्गत
प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 18 :-  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण मे-जून 2017 मध्ये विभागीय मंडळनिहाय आयोजित करावयाचे आहे. त्यासाठी संबंधितांना अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे, शिक्षण मंडळ पुणे यांनी कळविले आहे.
पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी मंडळाच्या http://traning.mh.hsc.ac.in या लिंकवर 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत प्रशिक्षण निहाय वेगवेगळे , स्वतंत्र ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केलेली होती. या प्रशिक्षणासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी पात्र शिक्षकांनी भरलेल्या अर्जाची प्रत घेऊन आपल्या शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांमार्फत संबंधीत जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयांकडे तातडीने सादर  करावी.
उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ज्या शिक्षकांची सेवा 11 वर्षे पूर्ण किंवा त्याहून अधिक झालेली आहे व निवडश्रेणीसाठी ज्या शिक्षकांची सेवा 23 वर्षे पूर्ण किंवा त्याहून अधिक झालेली आहे अशा शिक्षकांचेही अर्ज प्रशिक्षणासाठी स्विकारण्यात येतील. वरील लिंकवर प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी भरलेल्या अर्जाची प्रिन्ट शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाकडे सादर केल्यानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी अर्हताप्राप्त शिक्षकांची माहिती, नावे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयांकडून शिफारस यादीमध्ये मंडळास प्राप्त होतील, अशा शिक्षकांनाच प्रशिक्षणात सहभागी करुन घेण्यात येईल, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सचिव कृष्णकुमार पाटील यांच्यावतीने लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

0000000
जिल्ह्यासाठीच्या तीन स्थानिक सुट्या जाहीर
नांदेड दि. 18 :- शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अधिकारात असलेल्या सन 2017 या वर्षाकरीता नांदेड जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.  
शनिवार 15 एप्रिल 2017 रोजी हाजी सय्यद सरवरे मगदूम (रहे) कंधार उरुस निमित्त, बुधवार 30 ऑगस्ट 2017 रोजी जेष्ठा गौरी पुजन आणि शनिवार 16 डिसेंबर 2017 रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा (पालखी सोहळा) या तीन स्थानिक सुट्ट्या नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदे अंतर्गतची कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही या अधिसुचनेत म्हटले आहे.

000000
  उज्ज्वल नांदेड अंतर्गत सोमवारी
मार्गदर्शन शिबिरात भस्के यांचे व्याख्यान
नांदेड दि. 18 :-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वल नांदेड अभियानांतर्गत सोमवार 20 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरा पुणे येथील डॉ. सचिन भस्के हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील सामान्य  विज्ञान या विषयाची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबारास नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महत्वपूर्ण शिबिरा उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...