Thursday, November 17, 2016

विधानपरिषद निवडणूक मतमोजणी केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
नांदेड दि. 17 :-  महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघ मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय्य वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून तसेच मतमोजणी कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहवी या दृष्‍टीने मंगळवार 22 नोव्‍हेंबर 2016  रोजी बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मतमोजणी केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयानी कळविले आहे. 
मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यतच्‍या कालावधीत परिसरातील सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, मतमोजणीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, चिन्‍हांचे प्रदर्शन व मतमोजणीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता याव्‍दारे प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.  

000000
विधानपरिषद निवडणूक मतदान केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
नांदेड दि. 17 :- महाराष्‍ट्र विधान परिषद नांदेड स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्‍या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहवी यादृष्‍टीने शनिवार 19 नोव्‍हेंबर 2016  रोजी मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयानी कळविले आहे. 
नांदेड जिल्‍हयातील तहसिल कार्यालय नांदेड, किनवट, हदगाव, भोकर, कंधार, धर्माबाद, बिलोली, देगलूर या मतदान केद्र परिसरात शनिवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान केंद्राच्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्यक्तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

0000000
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी
बँकर्सनी 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 17 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत सन 2015-16 या वर्षासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या बँक शाखांनी आपले प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरुन गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड या कार्यालयास सोमवार 21 नोव्हेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत दोन प्रतित सादर करावे,  असे आवाहन प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांनी केले आहे.
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत अतिउत्कृष्ट सक्षम बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनातर्फे दिले जातात. या धर्तीवर स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रामुख्याने बँकेशी संबंधीत असल्याने या योजनेअंतर्गत स्थापित स्वंयसहाय्यता गटासंबंधी जिल्हास्तरावर सन 2015-16 साठी सर्वोत्कृष्ट काम असलेल्या पतपुरवठ्याची जास्तीत जास्त उद्दिष्ट साध्य केलेल्या एक बँक शाखेस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

000000
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी
महिला बचतगटांना 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 17 :- स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सन 2015-16 या वर्षासाठी तालुका जिल्हास्तरावर प्रथम, व्दितीय तृतीय पारितोषिकसाठी दारिद्रय रेषेखालील स्वयंसहाय्यता महिला बचत गटांनी आपले प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी, यांच्याकडे सोमवार 21 नोव्हेंबर 2016 पर्यंत सादर करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांनी केले आहे.
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दारिद्रय रेषेखालील आदर्श सक्षम स्वंयसहाय्यता महिला बचत गटांसाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजना दिनांक 1 मे 2006 पासून शासन निर्णय दि. 18 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानूसार सुरु करण्यात आली आहे. ही योजना विभागस्तर, जिल्हास्तर तालुकास्तरावर सुरु आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

0000000
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी
पत्रकारांना 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड दि. 17 :- स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेची, महाराष्ट्र राज्याग्रामीण जीवनोन्नती अभियानाची उत्कृष्ट प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठीचे प्रस्ताव प्रसिध्द केलेल्या बातम्या फोटो लेखमाला इत्यादीसह पंचायत समितीस्तरावरुन गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड या कार्यालयास सोमवार 21 नोव्हेंबर 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांनी केले आहे.
स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत अतिउत्कृष्ट सक्षम बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनातर्फे दिले जातात. या धर्तीवर स्वर्णजयंती  ग्रामस्वरोजगार योजनेबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये स्वयंसहाय्यता बचतगटाचे कार्य, त्यांचे उपक्रम याबाबत दिलेली प्रसिध्दी, त्यासाठी प्रसिध्द केलेल्या बातम्या, फोटो फिचर्स, लेखमाला, इत्यादी सर्वोत्कृष्ट प्रसार प्रसिध्दी देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका पत्रकाराला शासनातर्फे राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार सन 2015-16 साठी  देण्यात  येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

00000000

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर कॅमेऱ्यांची नजर, चोख पोलीस बंदोबस्त मतदान साहित्य आज रवाना होणार

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावर
कॅमेऱ्यांची नजर, चोख पोलीस बंदोबस्त
मतदान साहित्य आज रवाना होणार
नांदेड, दि. 17 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यालयाकडून सज्जता करण्यात येत आहे. मतदानासाठी उद्या शुक्रवार 18 नोव्हेंबर रोजी मतदान साहित्य रवाना होणार आहे. मतदान प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी पुरेश्या पोलीस बंदोबस्तासह, मतदान  प्रक्रियेवर कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याची काटेकोर व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे. निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील या सर्व प्रक्रियेबाबत वारंवार आढावा घेत आहेत.
 निवडणुकीसाठी शनिवारी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत मतदान होईल. निवडणुकीसाठी शुक्रवार 18 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान साहित्य रवाना करण्यात येईल. मतदानासाठी पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने विहीत केलेले ओळखपत्र तसेच प्राधिकारी संस्थेचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. मतदानासाठी पसंती क्रमाची मतदान पद्धती असल्याने, मतदारांना उमेदवाराच्या छायाचित्रासह असलेल्या मतपत्रिकेवर पसंती क्रमांक अंकात नोंदवावा लागणार आहे. मतदान पद्धतीबाबत मतदारांना विहीत प्रक्रिया अवगत करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मतपत्रिका आणि मतदान याबाबतची सर्व प्रक्रिया गुप्त मतदान प्रक्रियेनुसार काटेकोरपणे अंमलात आणली जाणार आहे.
मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 472 मतदार पात्र आहेत. त्यामध्ये 227 मतदार पुरूष तर 245 मतदार स्त्रिया आहेत. आठही मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी आणि एक क्षेत्रीय अधिकारी अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली अनुषांगीक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मतदानानंतर मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जमा करून, त्याकडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. बचत भवन येथेच मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर, 2016 रोजी सकाळी आठ वाजता सुरु होईल.
गोपनीय मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता
मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर त्या-त्या प्राधिकारी संस्थांचे महिला व पुरुष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  याशिवाय मतदान केंद्राच्या आत व बाहेरही व्हिडीओ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.  
मतदान केंद्रात मतदाराला केवळ ओळखपत्र नेता येणार आहे. त्याशिवाय पेन, मोबाईल किंवा अन्य कोणतेही उपकरण, साहित्य, कागद आदी साहित्य नेता येणार नाही. मतपत्रिकेवर मत पसंती क्रमांक नोंदविण्यासाठी निवडणूक विभागाकडूनच जांभळ्या रंगाच्या शाईचे पेन पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांना तपासणीत अन्य साहित्य बाहेर ठेवावे लागेल. याची नोंद घेऊन, मतदारांनी मतदानासाठी जाताना विहीत केलेल्या ओळखपत्राशिवाय अन्य कोणतीही गोष्ट बाळगू नये, असे आवाहन निवडणूक कार्यालयाने केले आहे.
मतदान केंद्र व संलग्न प्राधिकारी संस्था
मतदान केंद्रांची यादी मतदान केंद्राचे ठिकाण, केंद्र ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीचे नाव,  त्या मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव अशा क्रमाने पुढीलप्रमाणे.
नांदेड- तहसील कार्यालय नांदेड : जिल्‍हा परिषद नांदेड  (सर्व पं.स. सभापतीसह) नांदेड वाघाळा मनपा व नगर पंचायत अर्धापूर. किनवट- तहसील कार्यालय किनवट :  नगर पंचायत माहूर व नगर परिषद किनवट. हदगाव- तहसील कार्यालय हदगाव :  नगर पंचायत हिमायतनगर व नगर परिषद हदगाव. भोकर- तहसील कार्यालय भोकर : नगर परिषद भोकर व नगर परिषद मुदखेड. कंधार- तहसील कार्यालय कंधार :  नगर परिषद लोहा व नगर परिषद कंधार. धर्माबाद- तहसील कार्यालय धर्माबाद : नगर परिषद उमरी व  नगर परिषद धर्माबाद. बिलोली- तहसील कार्यालय बिलोली : नगर पंचायत नायगाव, नगर परिषद कुंडलवाडी व नगर परिषद बिलोली. देगलूर- तहसील कार्यालय देगलूर : नगर परिषद देगलूर व नगर परिषद, मुखेड.  
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...