Wednesday, August 24, 2016

कायदेविषयक शिबीर संपन्न
          नांदेड, दि. 24 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालामार्फत नमो कोचिंग क्लासेस नांदेड येथे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
            या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विष्णु गोडबोले यांनी शिक्षणाचा अधिकार याविषयी तर ॲड मुकुंद वाकोडीकर यांनी राष्ट्री विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना, ॲड श्रीमती घोरपड व ॲड श्रीमती झगडे यांनी महिलांचे अधिकार, शिक्षणाचा अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. न्या. कुरेशी यांनीही विविध योजना विषयांवर मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन ॲड  मो. शाहेद इब्राईम यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्त्या सौ. उज्वला दरडा यांनी मानले.

000000
महात्मा फुले विकास महामंडळाचे
योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 24 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या). नांदेड यांच्यामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. या महामंडळाच्या नांदेड कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शनिवार 29 ऑक्टोंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
महामंडळाच्यावतीने 50 टक्के अनुदान योजनेची प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये असून प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. बीज-भांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा 50 हजार ते 5 लाखापर्यंत आहे. प्रकल्प मर्यादा 20 टक्के बीज भांडवल योजनेसाठी 4 टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येते. यामध्ये महामंडळाचे 10 हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे. बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड समान हप्त्यात तीन ते पाच वर्षात करावी लागते, यात अर्जदाराचा सहभाग 5 टक्के आहे.  
या योजनांसाठी अर्ज करताना पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे राहतील. अर्जदार अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला दाखला, उत्पन्न शहरी भागात 50 हजार 500 तर ग्रामीणसाठी 40 हजार 500 रुपयापेक्षा जास्त नसावे. पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायनुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले जसे वाहनाकरीता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी, अधारकार्ड व पॅनकार्ड जोडावेत.
लाभार्थीने यापूर्वी महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच तो कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्तता करुनच अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात शनिवार 29 ऑक्टोंबर 2016 पूर्वी कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. एका व्यक्तीने एकाच योजनेमध्ये अर्ज करावा. अर्जदाराने स्वत: मूळ प्रमाणपत्रासह कार्यालयात अर्ज दाखल करुन रितसर पोचपावती घ्यावी. गैरअर्जदाराकडून अर्ज स्विकारले जाणार नाही, असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकानी कळविले आहे.

00000000
मोटार सायकल रॅलीत
हेल्मेट घालणे सक्तीचे
नांदेड, दि. 24 :- सार्वजनिक, खाजगी उपक्रम जयंती, वाढदिवस, मिरवणुका इत्यादी कार्यक्रम साजरे करताना मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येते या रॅलीत मोटार सायकल चालकाने हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. यात दोषी आढळल्यास  मोटार  वाहन कायदानुसार संबंधीतावर  दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मोटार वाहन अधिनियम 1989 च्या कलम 129 नुसार सार्वजनिक ठिकाणी मोटार सायकल चालविताना चालकाने हेल्मेट घालणे अनिवार्य असून  पगडी परिधान करणाऱ्या शिख नागरिकास या तरतुदीतून सूट आहे, असेही म्हटले आहे.  
00000


लोकशाही दिनाचे 6 सप्टेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 24 - सामान्य जनतेच्या अडचणी ऐकू घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. सोमवार 5 सप्टेंबर 2016 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने मंगळवार 6 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 1 ते 3 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे  लोकशाही  दिन आयोजित  केला असल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिनामध्‍ये अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या  निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्‍वरुपाच्‍या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत असेही आवाहन करण्‍यात आले आहे.  यादिवशी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी हजर राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
अर्जदार यांनी विहित नमुन्‍यात (प्रपत्र 1 अ ते 1 ड) अर्ज करणे आवश्‍यक. तक्रार निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे असावे. अर्जदाराने विहित नमुन्‍यात 15 दिवस आगोदर दोन प्रतीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालयात अर्ज पाठविणे आवश्‍यक आहे. तालुकास्‍तरावर अर्ज दिल्‍यानंतर एक महिन्‍यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालय येथील लोकशाही दिनामध्‍ये अर्ज करता येईल. लोकशाही दिनामध्‍ये न्‍यायप्रविष्‍ट प्रकरणे, राजस्‍व/अपील, सेवाविषयक, आस्‍थापना विषयक बाबी, विहित नमुन्‍यात नसलेले, अंतिम उत्‍तर दिलेले आहे किंवा देण्‍यात येणार आहे, निवेदने वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000000
मानवी दिव्यदान : अवयवदान
         अवयवदानाविषयीच्या जनजागृतीसाठीच्या 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महा-अवयवदान अभियान आयोजित केले आहे. त्यानिमित्त जिल्हयात जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजीत केले जाणार आहेत. त्याअनुषंगाने अवयवदानाबाबत जनजागृतीपर प्रसृत करण्यात आलेला लेख...
       
नादी काळापासून संपूर्ण जगामध्ये आणि वेगवेगळया धर्मामध्ये दानाला महत्त्व आहे. दान हे समाजातील गरजू किंवा अत्यंत  गरीब  व्यक्तीला दानशूर व्यक्तीकडून दिले जाते. दान म्हणजेच त्यापासून दान देणाऱ्याला आर्थिक फायदा अथवा त्यांची  प्रसिद्धी मिळत नाही. दान देणाऱ्याला मानसिक समाधान मिळते  व निती मुल्यात वृध्दी होते.
        जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टीमध्ये मृत्यू हा आटळ आहे. त्याननंतर  वेगवेगळया जाती धर्मामध्ये वेगवेगळया पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावतात. परंतू देह व त्यातील अवयव हे अमूल्य आहेत. त्यांची अशा पद्धतीने जाळून राख करणे, किंवा जमिनीत माती करून नष्ट करणे, हे ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत समाजात करत आहेत हे कितपत योग्य आहे? यावर समाजाने जागृत होऊन विस्तृत विचार करणे आवश्यक आहे. जर प्रत्येकांनी मृत्यू पूर्वी आपले अवयवदान करण्याची इच्छा असेल तर इच्छा संमती पत्र भरून दयावयाचे आहे. त्यानंतर आपणास एक ओळखपत्र दिले जाईल जे की , आपल्या सोबत 24 तास ठेवणे गरजेचे आहे.
      तसेच आपण दान केलेले अवयव हे फक्त गरजू व प्रतिक्षा यादीवरील रुग्णांना मोफत दिले जातील त्यासाठी शासनाची समिती मार्गदर्शन आणि नियंत्रण करत असते. अवयव दान देणाऱ्याचीतो अवयव घेण्याऱ्याची माहिती म्हणजे, कोणी कोणास अवयव दान दिले याची माहिती गुप्त ठेवली जाते.
       अवयवदान प्रामुख्याने तीन प्रकारे करता येते. जीवंतपणी  आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना आई, भाऊ, बही, मुले, पत्नी इत्यादींना. एक किडनी किंवा लिव्हरचा तुकडा अवयवच्या स्वरुपात दान करु शकतो. ब्रेन-डेथ झाल्यावर म्हणजेच मेंदूमृत झाल्यावर, त्यासाठी नेमून दिलेल्या समितीने अतिदक्षता   विभागात असलेल्या रुग्णाचा मेंदूमृत घोषित केल्यावर संबंधित रुग्णांच्या नातेवाईकानी अवयवदानासाठी संमती दयावयाची असते. त्यानंतर अशा रुग्णाचे दोन्ही किडनी, डोळे, फुप्फुसे, लिव्हर, स्वादूपिंड, हृदय, कानाचे  पडदे  तसेच  हाडे, त्वचा इत्यादी प्रकारच्या अवयवाचे दान करता येते. त्यामुळे अनेक प्रकारच्या गरजू रुग्णांना एका अवयव दात्याकडून  जीवनदान मिळते व मृत्यू झालेल्या व्यक्तींना अवयवदानाच्या रूपाने, अनेकांत जीवंत असल्याचा समाधान आणि आनंद मिळतो. मृत्यू झाल्यानंतर सहा तासाच्या आत आपण डोळे, त्वचा व हाडे दान करु शकतो. अवयवदान  करताना संमती पत्रात दोन व्यक्तीच्या साक्षीदार म्हणून सह्या आवश्यक आहेत. त्यापैकी एक साक्षीदार हा जवळचा नातेवाईक असणे आवश्यक आहे. आपल्या नातेवाईकाचा किंवा आपला एखादा अवयव दुसऱ्याच्या शरीरात मृत्यूनंतरही जीवंत राहतो. यासारख आनंदाची दुसरी बाब जीवनात असूच शकत नाही. त्यामुळे अवयव दान हे महादान आहे. 
                                                           -  डॉ. एच. आर. गुंटूरकर
                             (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक) एम. डी. (मेडीसीन)

000000
हंगामात आतापर्यंत 65.31 टक्के पाऊस  
          नांदेड, दि. 24 :- जिल्ह्यात बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 15.91 मिलीमीटर  पाऊस झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 0.99  मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे.  तर जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 624.10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या  हंगामातील  पावसाची  टक्केवारी  65.31 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात बुधवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय  पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 1.63 (603.35), मुदखेड- 0.67 (524.35), अर्धापूर- 0.67 (656.99) , भोकर- निरंक (848.00) , उमरी- निरंक (483.26), कंधार- 0.33 (502.31), लोहा- निरंक (621.00), किनवट- 1.43 (733.42), माहूर- निरंक (894.00), हदगाव- 0.29 (766.99), हिमायतनगर- 6.00 (725.65), देगलूर- निरंक (411.68), बिलोली- 2.00 (622.20), धर्माबाद- निरंक (537.36), नायगाव- 1.60  (537.20), मुखेड- 1.29 (517.84) आज  अखेर  पावसाची सरासरी 624.10  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9985.60) मिलीमीटर आहे.  

000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...