Wednesday, August 2, 2023

 मतदार जागृतीसाठी

अभिव्यक्ती मताची स्पर्धेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मताची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अभिव्यक्ती मताची या विषयांतर्गत जाहिरात निर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविद्यालयाचे आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये (Art collegs) येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 हा आहे. तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावल्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

 

या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत. युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारी, लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धाचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 1 लाख रुपये, दुसरे पारितोषिक 75 हजार, तिसरे पारितोषिक 50 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रका (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 25 हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 15 हजार रुपये, तिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रुपयांची आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

 नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी घ्यावा पुढाकार

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
▪️1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा मतदार यादीत होणार समावेश
▪️मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन करणार पडताळणी
▪️एकत्रीत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोंबर रोजी होणार प्रसिद्ध
नांदेड (जिमाका) दि. 2 :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कामास जिल्हा निवडणूक विभागाने गती दिली आहे. पुनरिक्षण पूर्व उपक्रम व पुनरिक्षण उपक्रम या दोन विभागात कार्यक्रमांच्या तारखा जाहीर केल्या असून लोकशाहीच्या या पवित्र मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगिता चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संदिप कुलकर्णी व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महिला मतदारांना अधिकाधिक मतदान प्रक्रियेत सहभाग घेता यावा यावर आम्ही भर देत आहोत. याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा पडताळून घेतल्या जात आहेत. ज्या-ज्या ठिकाणी उणीवा आहेत त्याची पूर्तताही केली जात आहे. दिव्यांग मतदारांसाठी आयोगानी निर्धारीत केलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत प्रत्येक मतदार केंद्रनिहाय दिव्यांग मतदारांची संख्या पडताळून घेत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकासह तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टिने नियोजन करून मतदारांमध्ये जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच नविनतम, नवीन तंत्रज्ञान याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या द्वारा प्रत्येक घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीत नवीन मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याचबरोबर दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण केले जाईल. यासमवेत मतदार यादीतील अथवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून सुधारणा करणे, अस्पष्ट / अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराचे योग्य छायाचित्र दुरूस्त करणे, मतदान केंद्राच्या सीमांची पूनर्रचना करणे, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कालबद्ध योजना आखणे, नियंत्रण कक्ष, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे आदी कामे प्राधान्याने पूर्ण केले जातील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. नमुना 1 ते 8 तयार करण्यासह 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्र प्रारूप यादी 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत तयार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यात दिनांक 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील. याचबरोबर पुन्हा एकदा मतदार नोंदणीसाठी / दुरूस्तीसाठी मतदारांना आवाहन केले जाईल. दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकालात काढल्या जातील. 1 जानेवारी 2024 रोजी पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागण्यासह डाटाबेस अद्यावत करण्यासह पुरवणी याद्यांची छपाई केली जाईल. शुक्रवार 5 जानेवारी 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
000000





बीज प्रक्रिया संच अनुदानासाठी शेतकरी उत्पादक संघ व कंपन्याना अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 469

बीज प्रक्रिया संच अनुदानासाठी

शेतकरी उत्पादक संघ व कंपन्याना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  कृषि विभागाच्यावतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके सन 2023-24 मध्ये स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये बीज प्रक्रिया संचाचा लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेत अटी व शर्तीच्या अधीन राहून शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यत संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

या योजनेअंतर्गत प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ/कंपनी यांना बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्र सामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे. सदर प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँकेशी निगडित असून लाभार्थ्यांने शेतकरी उत्पादक संघ/कंपनी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी उत्पादक संघ/कंपनी अनुदानास पात्र राहील. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. या योजनेचा लाभ एकदाच देण्यात येईल. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

0000

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम

 वृत्त क्र. 468

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कृषि विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2023-24 अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकंडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझायीन / स्पेसिफीकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावेत. 

या योजनेंतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही व ज्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येतो अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. 

अटी व शर्तीच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव राष्ट्रीयकृत बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ / कंपनी, केंद्र शासनाची ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असावा. लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील. 

या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे. अपुर्ण बांधकाम, मंजूर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषि माल साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी सैनिक दरबारचे आयोजन

 जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी सैनिक दरबारचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 2 :- महसूल व वन विभागातर्फे 1 ऑगस्ट 2023 पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत शनिवार 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमातर्गत सैनिक दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील कार्यरत सैनिक तथा माजी सैनिकांच्या महसूल व इतर विभागाशी संबंधित असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व कार्यरत सैनिक, माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक यांनी त्यांच्या समस्या/अडचणी अधिकृत कागदपत्रांसोबत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे एक दिवस अगोदर जमा करावेत. तसेच शनिवार 5 ऑगस्ट  रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वा. उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000


 वृत्त क्र. 466

राष्ट्रीय मुख आरोग्य दिनानिमित्त

विद्यार्थ्याची मौखिक आरोग्य तपासणी


नांदेड (जिमाका) दि.
 2 :-  राष्ट्रीय मुख आरोग्य दिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत विभाग यांच्याकडून इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलविष्णुपुरी नांदेड येथील विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्याना मौखिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 


या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी विद्यार्थ्यासोबत मुख आरोग्याबद्दल संवाद साधला. दंत विभाग प्रमुख डॉ. भावना भगत  यांनी दंत रोग व  त्यावरील उपचार याची माहिती दिली. या कार्यक्रमास  डॉ. हेमंत गोडबोलेडॉ. वाय.एच. चव्हाणडॉ. विशाल टेकाळेदहिभाते नियोजन अधिकारी बालाजी डोळे इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे प्राचार्य वानखेडे शासकीय परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य नांगराले  यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तथा आभार प्रदर्शन डॉ. अरुण नागरिक यांनी केले . या कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. सुशील येमलेडॉ. सतीश राठोडकल्याण कुंडिकरशेख करीम यांनी प्रयत्न केले.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...