Wednesday, August 2, 2023

 नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी घ्यावा पुढाकार

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
▪️1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांचा मतदार यादीत होणार समावेश
▪️मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन करणार पडताळणी
▪️एकत्रीत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोंबर रोजी होणार प्रसिद्ध
नांदेड (जिमाका) दि. 2 :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कामास जिल्हा निवडणूक विभागाने गती दिली आहे. पुनरिक्षण पूर्व उपक्रम व पुनरिक्षण उपक्रम या दोन विभागात कार्यक्रमांच्या तारखा जाहीर केल्या असून लोकशाहीच्या या पवित्र मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगिता चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संदिप कुलकर्णी व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महिला मतदारांना अधिकाधिक मतदान प्रक्रियेत सहभाग घेता यावा यावर आम्ही भर देत आहोत. याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा पडताळून घेतल्या जात आहेत. ज्या-ज्या ठिकाणी उणीवा आहेत त्याची पूर्तताही केली जात आहे. दिव्यांग मतदारांसाठी आयोगानी निर्धारीत केलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत प्रत्येक मतदार केंद्रनिहाय दिव्यांग मतदारांची संख्या पडताळून घेत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकासह तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टिने नियोजन करून मतदारांमध्ये जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना तसेच नविनतम, नवीन तंत्रज्ञान याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या द्वारा प्रत्येक घरोघरी भेट देऊन मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणीत नवीन मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याचबरोबर दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण केले जाईल. यासमवेत मतदार यादीतील अथवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून सुधारणा करणे, अस्पष्ट / अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी मतदाराचे योग्य छायाचित्र दुरूस्त करणे, मतदान केंद्राच्या सीमांची पूनर्रचना करणे, मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे, कालबद्ध योजना आखणे, नियंत्रण कक्ष, कंट्रोल टेबल अद्ययावत करणे आदी कामे प्राधान्याने पूर्ण केले जातील, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. नमुना 1 ते 8 तयार करण्यासह 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्र प्रारूप यादी 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत तयार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. यात दिनांक 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जातील. याचबरोबर पुन्हा एकदा मतदार नोंदणीसाठी / दुरूस्तीसाठी मतदारांना आवाहन केले जाईल. दिनांक 26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकालात काढल्या जातील. 1 जानेवारी 2024 रोजी पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागण्यासह डाटाबेस अद्यावत करण्यासह पुरवणी याद्यांची छपाई केली जाईल. शुक्रवार 5 जानेवारी 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
000000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...