Wednesday, October 12, 2022

 जिल्ह्यातील 777 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 3 हजार 537 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यातील 777 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली असून लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला 4 लाख 3 हजार 537 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 

 

आज पर्यंत 32 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या 9 पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. इतर प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त    डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 95 गावे लम्पी बाधित आहेत. या 95 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 41 हजार 758 एवढे आहे. यातील 777 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 478 एवढी आहे. एकुण गावे 573 झाली आहेत. या बाधित 95 गावाच्या किमी परिघातील 573 गावातील (बाधित 95 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही लाख 50 हजार 729 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 32 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

0000

 मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा

योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा

 

नांदेड (जिमाका) दि. 12  : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी शासनाच्यावतीने योजना तयार करण्यात आली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात या योजनेसाठी इच्छुक पात्र बचतगटांनी  http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर शनिवार 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावीत. या अर्जाची सत्यप्रत सहायक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

00000

 नेहरू युवा केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

·       15 ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धा

नांदेड (जिमाका) दि. 12 :-नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक युवकांनी शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत नेहरू युवा केंद्र, राज निवास शिवराय नगर मालेगाव रोड, तरोडा खु.नांदेड येथे अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी केले आहे.

स्पर्धा 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 पासून नरहर कुरूदंकर सभागृह, पिपल्स महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रतापपाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

युवा उत्सवात चित्रकला स्पर्धा कविता लेखन, छायाचित्र स्पर्धा, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धक हा नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असावा. त्याचे वय 1 एप्रिल रोजी 18 ते 29 वर्ष असावे. एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभाग घेता येईल.चित्रकला, कविता लेखन छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धेसाठीर प्रत्येकी 30 युवकांना सहभागी होता येईल. प्रथम पारितोषिक 1 हजार रुपये, द्वितीय 750, तृतीय 500 रूपये, आणि स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. 

जिल्हास्तरावर भाषण स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 10 युवकांना सहभागी होता येईल. यासाठी प्रथम पारितोषिक 5 हजार रुपये, द्वितीय 2 हजार रुपये, तृतीय 1 हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात 10 संच सहभागी होईल प्रथम बक्षिस 5 हजार रुपये, द्वितीय 5 हजार 250 रुपये, तृतीय 1 हजार 250 रूपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.यात सहभागी युवकांमधील विषयाची मांडणी वकृत्व शैली या आधारावर चार युवकांची परिक्षकातर्फे निवड करून प्रत्येक 1 हजार 500 रूपये बक्षिस म्हणून देण्यात येईल. अधिक माहितीसाठी युवकांनी नेहरू युवा केंद्र राज निवास शिवराय नगर मालेगाव रोड तरोडा खु.नांदेड दुरध्वनी क्रमांक 02462-263403 येथे संपर्क साधावा नेहरू युवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

 ऑटोरिक्षा परवान्याबाबत

अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नविन ऑटो रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीनी एकापेक्षा अधिक परवानेसाठी अर्ज करु नयेत. तसेच कोणी ऑटोरिक्षा परवाने देतो असे अमिष दाखवत असल्यास अशा अमिषाला ऑटोरिक्षा चालक/मालक यांनी  बळी पडू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

गृह विभाग क्र.एमव्हीआर-0815/प्र.क्र.387/परि-2 दिनांक 18.07.2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये नविन ऑटो रिक्षा परवाने वाटप करण्याबाबत घोषित केलेले होते. यामध्ये परवाना प्राप्त करुन घेण्यासाठी अटी  शर्ती निर्धारीत केल्या आहेत. अर्जदार ऑटो रिक्षा परवान्यासाठी अर्ज करतांना या शासन निर्णयातील अटी  शर्तीची पूर्तता करीत असल्याबाबत, त्यात तो सुशिक्षीत बेरोजगार  त्याकडे यापूर्वी ऑटोचा कुठलाही परवाना नसल्याबाबतचे शपथपत्र देण्याबाबत सूचित केलेले आहे. 

परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या पत्रासोबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयाने कार्यालयामधून वाटप करण्यात आलेल्या ऑटोरिक्षा परवाने बाबतची माहिती पडताळणी केली असता असे निदर्शनास आले आहे की, वाहन प्रणालीद्वारे एका व्यक्तीने एकापेक्षा अधिक ऑटोरिक्षा परवाने घेतलेले आढळून आलेले आहे. ज्या अर्जदारांनी एकापेक्षा अधिक ऑटोरिक्षा परवाने घेतलेले आहेत. त्यांनी स्वत:हुन परवाने जमा करावेत. अन्यथा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत त्यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 9.50 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 12 :- जिल्ह्यात बुधवार 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 9.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1104.90 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बुधवार 12 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 15.40 (1117.80), बिलोली-5.70 (1079.80), मुखेड- 2 (1004.60), कंधार-10.10 (942.60), लोहा-7.80 (955.30), हदगाव-5.90 (976.80), भोकर-3.20 (1229.90), देगलूर-0.30 (919.60), किनवट-11.30 (1350), मुदखेड- 8.40 (1219), हिमायतनगर-10.80 (1347.80), माहूर- 29 (1221.20), धर्माबाद- 00 (1381.90), उमरी- 7.70(1255.80), अर्धापूर- 37.30 (1041.30), नायगाव-12.70(976.60मिलीमीटर आहे.

0000

लेख

वेळेत उपचार व स्वच्छता यातच लम्पी आजारावर नियंत्रण ! 

राज्यातील पशुधनांमध्ये विशेषत: गोवंशीय प्राण्यांमध्ये लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव बहुतांश जिल्ह्यात आढळून आला आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागामार्फत मोठया प्रमाणात लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकरी व पशुपालक यांना उपाययोजनाची माहिती वेळेत होण्यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे व उपाययोजनामुळे जिल्ह्यात आजच्या स्थितीला लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी गोठ्यातील स्वच्छता व बाधित असलेल्या जनावरांना गोठ्यापासून वेगळे करुन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु करावेतअसे आवाहन पशुसवंर्धन विभागाच्यावतीने वेळोवेळी करण्यात येत आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी घाबरून न जाता बाधित पशुचा वेळेत उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो.

 

लम्पी रोगाचा प्रसार हा डासचावणाऱ्या माश्यागोचीडचिलटेबाधित जनावरांचा स्पर्शदुषित चारा-पाणी याद्वारे होतो. या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स या विषाणूमुळे होत आहे.

 

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

चारा कमी खाणाऱ्या जनावराची तात्काळ ताप मोजावी व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करावा. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करावी. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डासमाश्यागोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करावे. निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येवू नयेत म्हणून औषध लावणे व गोठयामध्ये औषधांची फवारणी करावी. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करु नयेरोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांना स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करावे.

 

लम्पी रोगाची लक्षणे

अंगावर 10 ते 20 मि.मि. व्यासाच्या गाठीसुरुवातीस भरपूर तापडोळयातून नाकातून चिकट स्त्रावचारा खाणे पाणी पिणे कमी अथवा बंददुध उत्पादन कमीकाही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणेत्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतु पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे.

 

पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार पशुपालकांनी लसीकरण करुन घ्यावेपशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्तीअशासकीय संस्थासंबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखानापशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक. 18002330418 अथवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री क्र. 1962 वर संपर्क साधावा.

 

लम्पी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या शासनाने पुर्ण लसीकरण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. जनावराचे लसीकरण करण्यासाठी सर्व पशुसंवर्धन विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघा पर्यंत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्यात येत आहे.

 

लम्पी आजारामुळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य दिले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी  30 हजार रुपये,  शेतात काम करणाऱ्या बैलासाठी  25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात आहे. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. 

नांदेड जिल्ह्यात 11 ऑक्टोंबर 2022 पर्यंत लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 697 आहे. जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 4 लाख 998 एवढ्या पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 83  गावे लम्पी बाधित आहेत. या गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 36 हजार 150 एवढे आहे. यातील 697 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 433  एवढी आहे. बाधित गावाच्या पाच किमी परिघातील गावातील पशुधन संख्या ही लाख 38 हजार 974 एवढी आहे. जिल्ह्यात लम्पी आजारामुळे मृत पशुधनाची संख्या 29 एवढी झाली आहे. लसमात्रा 4 लाख 34 हजार 250 उपलब्ध आहे.

अलका पाटील, 

उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

0000 

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई

मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील

- जिल्हाधिकारी अभिजित राऊत


 ·       शेतकऱ्यांनी वेळेत विमा कंपनीला  माहिती कळविणे आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र हा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी यासाठी आवश्यक असलेली माहिती दिलेल्या कालमर्यादेत विमा कंपनीला कळविणे अत्यावश्यक असून शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे नुकसानीचे निकष देण्यात आले आहेत. यात विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग, नैसर्गीक आपत्ती, पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर, पुराचे पाणी शेतात शिरुन दिर्घकाळ जलमय होणे, शेतात पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या पिकामध्ये कापणी पासून 14 दिवसापर्यंत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस इत्यादी कारणामुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान ग्राह्य धरल्या जाते.

 

सद्यस्थितीमध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी अधिसूचना काढलेली असताना देखील स्थानिक नैसर्गीक आपत्ती अंतर्गत व काढणी पश्चात नुकसान झाल्यास पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सदरील घटकाअंतर्गत नुकसान भरपाई मिळणार नाही याची सर्व शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी.

 

विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती/पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन Crop-Insurance हे ॲप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 18002337414/ 02462 240577/ 02462 240578/ 02462 240579/ 02462 240580/ 02462 240581/ 02462 240582 /180042533333 किंवा ईमेल pmfbypune@uiic.co.in / 230600@uiic.co.in ) द्वारे नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी, कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...