Wednesday, December 7, 2016

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबर रोजी
नांदेड, दि. 7 :-  ऊर्जा संवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी 14 डिसेंबर 2016 रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन व 14 ते 20 डिसेंबर 2016 दरम्यान राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करावा, असे सर्व शासकीय विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निर्देशीत केले आहे.
विविध कार्यक्रमांनी ऊर्जा संवर्धनाच्या साधनाची व्यापक जनजागृती करावी. शालेय स्तरावर ऊर्जा संवर्धन विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात. द्योग क्षेत्रातील विविध संघटनांनी जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करावेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रात म्हटले आहे.

000000000
धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
मतदान जागृती अभियान संपन्न
नांदेड, दि. 7 :-   मतदान निवडणूक जनजागृती रॅली धर्माबाद नगरपरिषदेच्‍या प्रांगणातून मंगळवार 6 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्‍यात आली.
रॅलीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी धर्माबाद डॉ. सचिन खल्‍लाळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ज्‍योती चौहान, सुनिल माचेवाड, धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, पोलीस निरिक्षक अंगद सुंडगे, शाळेचे मुख्‍याध्‍यापक, सहशिक्षक, शिल्‍पनिर्देशक, कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, पालक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी पथनाट्यासाठी तहसिलदार श्रीमती ज्‍योती चौहान यांनी सहभागी मुला-मुलींना मार्गदर्शन केले. धर्माबाद येथील जिजामाता कन्‍याशाळा, हुतात्‍मा पानसरे हायस्‍कुल,  इंदिरा गांधी पब्‍लीक स्‍कुल, गुरुकूल विद्यालय, लाल बहादुर शास्‍त्री महाविदयालय धर्माबाद, कस्‍तूरबा गांधी विदयालय, ऊर्दू हायस्‍कुल, जि.प. हायस्‍कुल धर्माबाद या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निवडणूक जनजागृती रॅली नगरपरिषद येथून आय.टी.आय, नरेंद्र चौक, नेहरु चौक, साईबाबा चौक, तसेच मोंढा मार्गे काढण्‍यात आली. रॅलीस चांगला प्रतिसाद मिळाला.  
नायब तहसिलदार माचेवाड यांनी कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक केले. विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी आपले मत मांडले. विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी पथनाटय व गीत सादर केले. मतदानाचे महत्‍व पटवून देवून धर्माबाद शहरातील नागरीकांनी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान नि:पक्ष व निर्भिडपणे मतदान करण्‍याचे आवाहन डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख एन.पी. पांचाळ यांनी केले.
निवडणूक विषयी दुसरे प्रशिक्षण संपन्न
 धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रिय अधिकारी, केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण 6 डिसेंबर रोजी संपन्‍न झाले. यापुर्वी प्रशिक्षणास निवडणूक निरिक्षक तथा अतिरिक्‍त मुख्‍यकार्यकारी अधिकारी पदमाकर केंद्रे यांची उपस्थिती होती.
            या प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती ज्‍योती चौहान व सुनिल माचेवाड यांनी मार्गदर्शन केले. केंद्रअध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांनी ईव्‍हीएम मशिनची प्रात्‍यक्षिकव्‍दारे प्रशिक्षण देण्‍यात आले. केंद्र प्रमुख एन.पी. पांचाळ यांनी पीपीटीव्‍दारे मतदान अधिकारी यांना माहिती दिली. मतदान अधिकारी यांना नि:पक्ष व निर्भिडपणे काम करण्‍याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी केल्‍या.

000000
वेतन पडताळणी पथकाचा
जानेवारी 2017 महिन्याचा दौरा
नांदेड, दि. 7 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जानेवारी 2017 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 17 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 18 जानेवारी ते गुरुवार 19 जानेवारी या काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे  पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.
वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी  पथकाकडे  सादर  करावीत, असे सूचित केले आहे. 

0000000

  स्ट्रॉंग रूमची संयुक्तपणे पाहणी करताना निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,  जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे.