Monday, January 30, 2023

वृत्त क्रमांक 49

 उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात

स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष 


 

निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी  उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामशाहीमुळे पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला मुक्तीसाठी जे आंदोलन करावे लागले त्यात उमरी येथील ऐतिहासिक संदर्भही अधिक महत्त्वाचे आहेत. येथील हैद्राबाद स्टेट बँक, पोलीस स्टेशनवरील हल्ला, रेल्वे रूळ उखडून टाकणे याला आज 30 जानेवारी रोजी बरोबर 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या बँकेवर हल्ला झाला ती बँक खाजगी जागेत असल्याने आज त्या जागेचे स्वरूप बदलले आहे. मात्र निजामाच्या पोलीसाची ज्या पोलीस चौकीवर हल्ला झाला ती इमारत आज त्या काळातील हैद्राबाद मुक्तीच्या आठवणी आपल्या प्रत्येक शिळेवर घेऊन उभी आहे. या उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती त्या काळातील तिजोरीसह मुक्तीच्या या लढ्याला पुढच्या पिढीसाठी वाहते करण्यास सज्ज आहेत.

 

पोलीस विभागाने हे पोलीस स्टेशन आहे त्या स्थितीत आजवर व्यवस्थीत जपले असून ऐतिहासिक साक्षीसह उमरीतील शांतता व सुव्यवस्थेसाठी येथून कामकाज पाहिले जाते. दि. 30 जानेवारी 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी हा हल्ला व बँकेची लूट करण्यात आली. हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदार म्हणजेच 29 जानेवारी रोजी उमरखेडचे स्वातंत्र्य सैनिक देवसरी या गावी जमले. चार गटात विभागालेल्या या स्वातंत्र्य  सैनिकांनी 30 जानेवारी रोजी हल्ला करून निजामाला धास्तावून सोडले. रेल्वेचे रूळ व तारा तोडण्यासाठी बारडचे राजाराम देशमुख, थेरबनचे अमृतराव व 35 सैनिक रवाना झाले. नागनाथ परांजपे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांच्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ल्यासाठी धाव घेतली. यात लहानचे भिमराव देशमुख व इतर मंडळी होती. रेल्वे स्टेशनवर हल्ल्यासाठी उमरीचे मोहन शर्मा, जगदीश, बाबुराव कुटूंरकर व इतर मंडळी होती.

 

उमरीच्या मोंढ्यातील हैद्राबाद स्टेट बँकेच्या शाखेवर 21 जणांच्या तुकडीने हल्ला केला. यात अनंत भालेराव, आबासाहेब लहानकर, साहेबराव देशमुख-बारडकर, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, दिंगबरराव उत्तरवार, शंकरलाल शर्मा, बन्सीलाल मालाणी, धनराज पुरोहित, रघुनाथ पंडीत, काशिनाथ शेट्टी हे स्थानिक उमरीचे कार्यकर्ते होते. सायंकाळी 4.30 वा. तीनही ठिकाणी हे मुक्तीसाठी हल्ले करण्यात आले.

 

काळ झपाट्याने पुढे जरी गेला असला तरी इतिहासातील अखंड भारताच्या व स्वातंत्र्याच्या लढ्यातील हे ऐतिहासिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमवेत मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव आता सुरू असून शासनाने यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

 

मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यादृष्टिने लवकरच उमरी आणि बारड येथे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांना नव्या पिढीसमवेत आम्ही संवाद घडवून आणत आहोत.

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

उमरी पोलीस स्टेशन आज ज्या वास्तुत आहे त्या वास्तुचा ऐतिहासिक संदर्भ लाखमोलाचा आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने आम्ही ही जागा आहे त्या स्थितीत आजवर त्याच इमारतीतून शांतता व सुव्यवस्थेसाठी सांभाळून ठेवली आहे. या इतिहासाला प्रवाहित करण्यासाठी प्रयत्नरत राहू

-   जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

0000  






वृत्त क्रमांक 48

 जयंती, राष्ट्रीय दिनाबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 30  :- राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले. जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालयांनी या शासन निर्देशांचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

सन 2023 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबतचे सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र. जपुति-2022/प्र.क्र.120/कार्या.29 दि. 18 जानेवारी 2023 अन्वये दिलेल्या सुचनेनुसार सन 2023 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि यासंदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावे. अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाने याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्देशीत केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 47

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144   

नांदेड (जिमाका) दि. 30 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 20 जानेवारी 2023 सकाळी 6 वाजेपासून ते रविवार 19 फेब्रुवारी 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पुल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...