Friday, June 22, 2018





खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतला
 विविध विकास कामांचा आढावा 
नांदेड, दि. 22:-  नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज एका बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेतला.
 विविध विषयांची आढावा बैठक येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. यावेळी खा. अशोकराव चव्हाण बोलत होते.  
यावेळी सर्वश्री आमदार श्रीमती अमिताताई चव्हाण, आ. डि . पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण,                        आ. अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदि. विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रीय पेयजल योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे खा. चव्हाण यांनी निर्देश देवून ते म्हणाले की, पिक विमा भोकर आणि देगलूर या तालुक्याला समान मिळाला पाहिजे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. विविध बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जवाटप याबाबतचा आढावा घेण्यात आला. सांसद आदर्श रोहिपिंपळगाव ता. मुदखेड आणि चांडोळा ता. मुखेड येथील कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. आमदार आदर्श ग्राम जांभळी ता. भोकर येथील विकास कामांना गती देण्याबाबत सुचित करण्यात आले. तसेच मुजामपेठ ता. नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 मध्ये मिळणाऱ्या निधीबाबत नागरिकांच्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करावी. धनेगाव ता. नांदेड येथील व मुजामपेठ ता. नांदेड येथील मावेजाबाबत योग्य कार्यवाही करण्यात यावी, असेही खा. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
0000000



पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकांना
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या नोटीस
खुलासा सादर न केल्यास एकतर्फी कार्यवाही  
नांदेड, दि. 22 :- सन 2018-19 खरीप पिक कर्ज वाटप उद्दिष्टाबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्‍हरसिस बॅंक, ओरियंटल बॅंक ऑफ कॉमर्स या बँकांच्या जिल्हा समन्वयकांना भारतीय रिर्जव्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार गुरुवारी (21 जून) रोजी कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. मुदतीत खुलासा सादर न केल्‍यास एकतर्फी कार्यवाही करण्‍यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे की, जिल्‍हा समन्‍वयक बॅंक ऑफ इंडिया नांदेड यांना खरीप पिक कर्जाचे 77.36 कोटी रुपयाचे उद्दीष्‍ट देण्‍यात आले असून उद्दिष्‍टपूर्ती 1.33 कोटी रुपये झाले आहे. जिल्‍हा समन्‍वयक, इंडियन ओव्‍हरसिस बॅंक, नांदेड यांना खरीप पिक कर्जाचे 6.30 कोटी रुपयाचे उद्दिष्‍ट देण्‍यात आले असून उदिष्‍टपूर्ती 0.34 कोटी रुपये झाले आहे. जिल्‍हा समन्‍वयक, ओरियंटल बॅंक ऑफ कॉमर्स नांदेड यांना खरीप पिक कर्जाचे 8.27 कोटी रुपयाचे उदिष्‍ट देण्‍यात आले असून उदिष्‍टपूर्ती केली नाही. यावरुन पिक कर्ज वाटप हे संथगतीने होत असून आपले उद्दिष्‍टपूर्तीबाबत गांभीर्य दिसून येत नाही. याचगतीने बँकेने काम केल्‍यास उदिष्‍टपूर्ती करणे असाध्‍य दिसून येते. आपल्‍या या उदासिन धोरणांमुळे कास्‍तकार / शेतक-यांचे नुकसान होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब गंभीर असून शासन शेतक-यांप्रती कर्ज उपलब्‍ध करुन देण्यास कटिबध्‍द असतांना बॅंकेकडूनही तसा प्रतिसाद मिळणे आवश्‍यक आहे.
बँकांना वारंवार सूचना व आदेश देऊनही उदिष्‍टपुर्ती न करणे ही बाब भारतीय रिर्जव्‍ह बॅंकेने दि. 3 जुलै 2017 रोजी दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे उल्‍लघंन करणारी आहे. त्‍यामुळे आपले विरुध्‍द विभागीय चौकशी तथा भारतीय दंड संहिता कलम 187 अन्‍वये फौजदारी स्‍वरुपाची कार्यवाही का करण्‍यात येऊ नये याबाबतचा खुलासा ही नोटिस मिळाल्‍या पासून दोन दिवसांचे आत जिल्हाधिकारी नांदेड यांचे समक्ष सादर करावे. विहीत मुदतीत खुलासा सादर न केल्‍यास याबाबत आपले काहीही म्‍हणणे नाही असे गृहित धरुन एकतर्फी कार्यवाही करण्‍यात येईल, असेही कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केले आहे.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...