Sunday, March 24, 2024

 वृत्त क्र. 273

 

निवडणूकीसाठी प्रशासन सज्‍ज,

आचारसंहितेचे पालन करा

 

नांदेड दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्‍यानुषंगाने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणूकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्‍ज झालेली आहे. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्‍या  मतदार यादीनुसार 86-नांदेड विधानसभा मतदार संघात एकुण  मतदारसंख्‍या 3 लाख 39 हजार 140एवढी असुन  पुरुष मतदार संख्‍या  1 लाख 74 हजार 852 (51.56 टक्के) व स्‍त्री मतदार संख्‍या  1 लाख 64 हजार 190 (48.47 टक्के) तर  इतर मतदार संख्‍या 98 एवढी आहे.  ज्येष्‍ठ नागरीकांची मतदार संख्‍या  4 हजार 389 एवढी आहे. तर सेनादल  मतदारांची संख्‍या 154 एवढी आहे.  दिव्‍यांग मतदार संख्‍या  1 हजार 685 ( पुरुष 966, स्‍त्री 719) एवढी आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात एकुण 348 मतदान केंद्रे असुन 6 सहायक  मतदान केंद्रे आहे. तर 18-19 वयोगटातील नवमतदारांची संख्‍या  4 हजार 441 एवढी आहे.

 

नांदेड उत्‍तर  विधानसभा  मतदार संघामध्‍ये एकुण 31 झोन निश्चित करण्‍यात आलेले असून त्‍यासाठी 31 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्‍यासाठी  4  S.S.T पथके आलेगाव चेकपोस्‍टलिंबगाव चेकपोष्‍ट, आसना चेकपोष्‍ट व कासारखेडा या चेकपोष्‍टवर पुरेशा मनुष्‍यबळासह तैनात करण्‍यात आलेली असुन या चेकपोस्‍टवर येणाऱ्या वाहनांची कसुन तपासणी करण्‍यात येत आहे. तसेच 4 Flying Squad देखील तैनात करण्‍यात आलेली आहेत. नांदेड उत्‍तर मतदार संघात होणाऱ्या  विविध पक्षांचे कार्यक्रमसभाइत्‍यादीवर देखरेख ठेवण्‍यासाठी 4 V.S.T कक्ष  स्‍थापन करण्‍यात आलेले आहेत. मतदारांमध्‍ये मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यासाठी स्‍वीप कक्षाची स्‍थापना करण्‍यात आलेली आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर  पिण्‍याची पाणी,  दिव्‍यांगासाठी रँप,  स्‍तनदा मातांसाठी  स्‍वतंत्र व्‍यवस्‍था व प्रतिक्षालय उभारण्‍यात येणार आहे.

 

निवडणूकीसाठी  नियुक्‍त करण्‍यात आलेले S.S.T, F.S.T.VST.VVT पथकेक्षेत्रिय अधिकारी व सर्व अधिकारीकर्मचारी यांना प्रशिक्षण देण्‍यात आलेले आहे. नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण 30 मार्च 2024 रोजी सचखंड पब्‍लीक स्‍कुलगुरुग्रंथ साहिब भवन नांदेड येथे  आयोजीत करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये मतदानासाठी नियुक्‍त अधिकारी व कर्मचारी यांना  प्रशिक्षण देण्‍यात  येणार आहे.

 

निवडणूक काळात 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्‍यात येत असून सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करुन मतदान प्रक्रिया शांततेतनिस्‍पृह वातावरणात पार पाडावी  तसेच  सर्व मतदारांनी  उत्स्‍फुर्तपणे  मतदान करावेअसे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी व  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  केले आहे.  

00000

272

हत्तीरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत घरी येऊन गोळ्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

नांदेड, दि. २३ : हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधौपचार मोहिम अंतर्गत २६ मार्च  ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत नागरीकांना  वयोमानानुसार डिईसी गोळ्या व अलबेडाझॉल गोळयाची एक मात्रा खाण्याचे, घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा हा हत्तीरोग जोखीमग्रस्त जिल्हा असून या जिल्हयातील वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरीकांना या आजाराचा धोका होवू शकतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सन २००४ पासून दरवर्षी हत्तीरोग एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम नांदेड जिल्हयात राबविली जाते.या वर्षी मात्र जिल्ह्यातील १० तालुक्यात (किनवट, माहूर, भोकर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड) ही मोहीम राबविण्यात येत आहे.

यावर्षी २६ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ या कालावधीत सदर मोहिमेअंतर्गत आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लाभार्थ्यांच्या घरोघरी जावून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डिईसी गौळण व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा कर्मचाऱ्यांसमक्ष खाऊ घालण्याची कार्यवाही करावी, असे आदेशीत केलेले आहे.

     हत्तीरोग हा दिर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकूणच शारिरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार "बुचेरेरिया बँक्रॉप्टाय" व "ब्रुगीया मलायी" या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासून होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व व विद्रुपता येते, हातापायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सुज येवून विद्रुपता येते. त्यामुळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते. त्यामुळे रुग्ण मानसिक दबावाखाली वावरतो. तसेच जन्मभर दुःख-वेदना सहन कराव्या लागतात.

    सद्यस्थितीत नांदेड जिल्हयात दि. १६ ते ३१ ऑगस्ट २०२३ हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम सर्वेक्षण  करण्यात आले.सन २०२३ च्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात अंडवृध्दीचे रुग्ण २६५ व हत्तीपायाचे रुग्ण २२०८ असे एकूण २४७३ हत्तीरोगाचे बाहयलक्षणेयुक्त रुग्ण आहेत.

 नांदेड जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने तसेच आपल्या जिल्हयात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालू असल्याने यावर एकच उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरिरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना वयोमानानुसार डिईसी गोळ्या व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा वर्षातून एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व अति गंभीर आजारी रुग्णांना हा औषधोपचार देण्यात येत नाही. तेंव्हा डीईसी व अलबेंडाझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी दि. २६ मार्च रोजी गावातील बुथवर नियोजन करण्यात येत आहे. लगेच दुसऱ्या दिवशी पासून आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा स्वयंसेविका व इतर स्वंयसेवक दि. २७ मार्च ते ०५ एप्रिल २०२४ दरम्यान आपल्या घरी येतील तेंव्हा दिलेल्या गोळ्या जेवन करुन आरोग्य कर्मचाऱ्या समक्ष घेवून शासनाच्या या राष्ट्रीय मोहिमेस प्रतिसाद द्यावा व हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये केलेले आहे.
00000




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...