Monday, January 9, 2023

वृत्त क्रमांक 17

 दहावी-बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या

विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्याची सुविधा

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी अतिविलंब शुल्काने गुरुवार 12 जानेवारी 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.


फेब्रुवारी-मार्च
 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगी रित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने अतिविलंब शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 25 नोव्हेंबर 2022 मुदतवाढीने निश्चित करण्यात आला होता. खाजगीरित्या इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑनलाईन पध्दतीने स्विकारणाच्या अंतिम मुदतवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.


अतिविलंब शुल्कासह निर्धारित अंतिम मुदत याप्रमाणे आहे. माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अति विलंब शुल्क रु.
 20/- प्रती विद्यार्थी प्रतीदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा मंगळवार 10 जानेवारी 2023 ते गुरुवार 12 जानेवारी 2023 या कालावधीत भरावयाचा आहेत. खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.


विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र,
 आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/ मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्काची पावती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लगेच दुसऱ्या दिवशी जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क +विलंब शुल्क/अतिविलंब शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क + विलंब शुल्क/ अतिविलंब शुल्क राहील.(विलंब शुल्क व अतिविलंब शुल्क नमूद केल्याप्रमाणे शुल्क भरण्यात यावे. )

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज करावयाचे आहे.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज,
 प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.


इयत्ता दहावी व बारावी-
 2023 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.


दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ,
 कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. इय्यता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, प्राचार्य व संबंधित घटकांनी नोंद घेवून दिलेल्या कालावधीतच फॉर्म भरणे बंधनकारक राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 16

 सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- आगामी सण, उत्‍सवात  ध्‍वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये  ध्‍वनीक्षेपक व ध्‍वनिवर्धक इत्यादी वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्‍या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्‍ह्याच्‍या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापरास शिवजयंती एक दिवसडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस1 मे महाराष्ट्र दिन एक दिवसगणपती उत्सवात दोन दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस दिवस (पहिला दिवसअष्टमी व नवमी), दिवाळी लक्ष्मीपुजन एक दिवस, ईद ए मिलाद एक दिवस, ख्रिसमस एक दिवस, 31 डिसेंबर एक या दिवसासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट राहील. तसेच उर्वरित तीन दिवस हे ध्‍वनी प्राधिकरण तथा जिल्‍हा पोलिस अधिक्षक नांदेड यांच्‍या शिफारसीनुसार जिल्‍हातील महत्‍वाच्‍या कार्यक्रमासाठी गरजेनसार जिल्‍हाधिकारी यांच्‍या परवानगीने दिले जाईल. 

 

या सण उत्‍सवासाठी ध्‍वनीवर्धक व ध्‍वनीक्षेपक वापरण्‍याबाबतची सुट जिल्‍हयातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्‍याची अंमलबजावणी करण्‍याची जाबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असेही आदेशात म्हटले आहे. 

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...