Wednesday, October 19, 2016

शासकीय अध्यापक महाविद्यालयात
वाचन प्रेरणा दिन साजरा
नांदेड, दि. 19 :- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे विविध उपक्रम राबवून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्रशिक्षणार्थ्यांना वाचन प्रेरणा मिळावी यासाठी ग्रंथप्रदर्शन, वाचनकट्टा निर्मिती वाचलेल्या पुस्तकावर चिंतनात्मक विचार, काव्यवाचन, मौलिक विचारमंथन आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर मराठी आणि इंग्रजी भाषेत भित्तीपत्रे तयार करुन त्यांचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे या होत्या. त्यांनी अस्तित्व या पुस्तकावर त्यांचे मुक्तचिंतन सादर करुन प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणा दिली. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन 2016-18 च्या तुकडीच्या संपर्क सत्राचे उद्घाटन केले. डॉ. शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पुस्तक भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांनी याप्रसंगी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला डॉ. साखरे, प्रा. सोळुंके, डॉ. मुळे, डॉ. बेलोकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांनी ग्रंथप्रदर्शनास व वाचन कट्टावर सहभाग नोंदविला. मुक्त विद्यापीठाचे  शिक्षणशास्त्र पदवी सन 2016-18 चे प्रवेशित शिक्षक आणि नियमित बी.एड प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाची प्रशिक्षणार्थी तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

0000000
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची
निवडणूक जाहीर, आचारसंहिता लागू
नांदेड, दि. 19 :-  महाराष्ट्र विधान परिषदेतील नांदेड, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ, पुणे, जळगाव या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाल्याची माहिती  नांदेड जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. निवडणूक अधिसूचना जारी करणे बुधवार 26 ऑक्टोंबर 2016. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार 2 नोव्हेंबर. नामनिर्देशन पत्राची छाननी गुरुवार 3 नोव्हेंबर. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शनिवार 5 नोव्हेंबर. निवडणुकीसाठी मतदान शनिवार 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत होईल. निवडणुकीची मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होईल. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया गुरुवार 24 नोव्हेंबर 2016 पूर्वी पूर्ण करण्यात येईल.

0000000

 हृदय, मुत्रपिंड अवयदानासाठी नांदेडमध्ये ग्रीन कॅारिडॅार
डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
मुंबई-पुणे-औरंगाबादकडे अवयव रवाना , प्रशासनाचे यश
नांदेड, दि. 19 :- अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॅारिडॅार म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात नांदेड यशस्वी झाले आहे. हृदय नांदेडच्या श्री. गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात आले. तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. यानिमित्ताने विष्णुपूरीतील डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अवयवदानासाठीच्या सुविधा उपलब्ध करून, अवयव प्रत्यारोपणासाठी पाठविण्याची प्रक्रीया महानगरानंतर पहिल्यांदाच यशस्वी करून दाखवली आहे. नांदेडच्या सुधीर रावळकर यांच्या अवयवांमुळे पाच जणांचे आयुष्य सावरले जाणार आहे. रावळकर कुटुंबियांनी दाखविलेल्या धीरोदत्तपणामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अवयव प्रत्यारोपीत होणाऱ्यांच्या कुटुंबात समाधान परतणार आहे.
अवयवदान आणि अवयवाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी विविध यंत्रणांशी समन्वय साधला. ग्रीन कॅारिडॅारसाठी पोलीस यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, विमानतळाशी निगडीत व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणांना गतीमान केले. विष्णुपूरीतून विमानतळापर्यंत हेलीकॅाप्टरनेही हृदय पाठविण्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली. पण अखेरीस विष्णुपूरी ते विमानतळ हे अंतर विक्रमी वेळेत म्हणजे अवघ्या तेरा मिनिटांत पार करण्यात आले.
मुखेड तहसीलमधील रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी सुधीर रावळकर यांचा नरसी-मुखेड रस्त्यावर अपघात झाला होता. उपचारार्थ दाखल केल्यानंतर, रावळकर यांचा मेंदू-मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आपघातग्रस्त रावळकर यांच्या कुटुंबियांना सावरण्याबरोबरच, जिल्हा प्रशासन आणि डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाने रावळकर यांच्या अवयदान समंतीपत्रानुसार रावळकर यांच्या अवयवांचे दान करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. याबाबत अवयदानाशी निगडीत औरंगाबाद येथील विभागीय समितीशी संपर्क साधण्यात आला. अवयवदाता आणि प्रत्यारोपण करावयाचा रुग्ण यांच्याबाबतच्या वैद्यकीय चाचण्या तसेच अनुषांगीक सर्व औपचारिकता पुर्ण केल्यानंतर आज सकाळी हृदय घेऊन जाण्यासाठी मुंबईतील फोर्टींस हॅास्पीटलचे हृदय-प्रत्यारोपण तज्ज्ञ डॅा. अन्वय मुळे, डॅा. विजय शेट्टी, डॅा. संदीप सिन्हा तर यकृत घेऊन जाण्यासाठी पुण्यातील रुबी हॅास्पीटलचे डॅा. कमलेश बोकील, मुत्रपिंड घेऊन जाण्यासाठी औरंगाबादच्या कमल नयन बजाज रुग्णालयाचे डॅा. अजय ओसवाल नांदेडमध्ये दाखल झाले.
डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, डॅा. पी. टी. जमदाडे, डॅा. राजेश अंबुलगेकर, डॅा. श्रीधर येन्नावार, डॅा. नितीन नंदनवनकर, डॅा. डी. पी. भुरके, डॅा. एच. व्ही. गोडबोले यांनीही आरोग्य संकुलाच्या रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह सज्ज ठेवली. दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी हृदय घेऊन डॅा. मुळे आणि त्यांचे सहकारी विमानतळाकडे रवाना झाले. अवघ्या तेरा मिनिटात हा ताफा विमानतळावर पोहचला आणि दोनच मिनिटात हृदय घेऊन विमान मुंबईकडे झेपावले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यकृत घेऊन पुण्याचे पथक विमानाने रवान झाले. तर औरंगाबादचे पथक मुत्रपिंड घेऊन मोटारीने रवाना झाले.
ग्रीन कॅारिडॅार आणि वैद्यकीय सज्जतेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न
एकीकडे अवयदान आणि प्रत्यारोपणासाठीच्या वैद्यकीय सज्जतेसाठी विष्णुपूरी आरोग्य संकुलातील शस्त्रक्रियागृहाशी निगडीत वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी काल रात्रीपासून प्रयत्नशील होते. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी काकाणी यांनी ग्रीन कॅारिडॅारसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, महेंद्र पंडित, उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याशी समन्वय साधला. विमानतळापर्यंतच्या ग्रीन कॅारिडॅारसाठी नांदेड ग्रामीणचे निरीक्षक गजानन सैदाने आणि शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राजा टेहरे, निरीक्षक नारनवार यांनी प्रयत्न केले.
थॅंक्यू..नांदेड..आणि प्रशासनाचे अश्रू..
हृदय घेऊन डॅा. मुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या लिफ्टमधून वाहनाकडे जाताना..तिथे असलेल्यांकडे पाहून..हात हलवून म्हणाले...थॅंक्यू नांदेड..थॅंक्यू...त्यांचा विष्णुपूरी ते विमानतळ हा ऐरवी चाळीस-पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी लागणारा प्रवास विक्रमी तेरा मिनिटांत पार पाडला..त्यानंतर हृदयासह मुंबईकडे रवाना होतानाही, डॅा. मुळे यांनी कृतज्ज्ञपोटी हात हलवून निरोप घेतला. एकीकडे नांदेडसारख्या शहरात अवयवदानाचा प्रयोग यशस्वी झाला. हृदय, यकृत आणि मुत्रपिंड, डोळ यासारखे अवयव दान करण्यात यश आले. पण दुसरीकडे नांदेड जिल्हा प्रशासनाशी निगडीत एक उमदा सहकारी-मित्र गमावल्याची खिन्नता..जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये होती.
0000000







  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...