Thursday, March 31, 2022

 विष्णुपुरी प्रकल्पाजवळील काळेश्वर परिसर

आता ठरेल पर्यटनाचे प्रमुख आकर्षण 


·    पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून 12 कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्प हे बंदिस्त पाईपलाईनने मोठया प्रमाणात कृषि क्षेत्रासाठी  पाणी पुरवठा करणारा आशिया खंडातला पहिला प्रकल्प म्हणून ओळखला जातो. आता या वैभवात भर पडत असून काळेश्वर मंदिर परिसर हे पर्यटनासह जलक्रीडा आणि साहस यांचेही आकर्षण केंद्र म्हणून नावारुपास येईल. 

नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून हे केंद्र पर्यटनाच्या दृष्टीनेही विकसित केले जाणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून  12 कोटी 25 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 4 कोटी 62 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या प्रकल्पामूळे नांदेडच्या सौंदर्यात भर पडणार असून येथील पर्यटन  क्षेत्रालाही चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.  

येथील जी नैसर्गिक संपदा आहे त्या संपदेला कोणताही बाधा न पोहचवता काळेश्वर परिसरातील याअनुषंगाने असणारी अत्यावश्यक कामे लवकरच पायाभूत सुविधेसह पूर्ण केल्या जातील. हा प्रकल्प केवळ पर्यटनच नव्हे तर जिल्ह्यातील युवकांच्या जलक्रीडा, पोहणे या क्षमतानाही विकसित करणारे चांगले केंद्र ठरेल असेही त्यांनी स्पष्ट केले. 

काळेश्वर विकास प्रकल्पात बोटींग क्लब, ॲडव्हेंचर पार्क याचा समावेश राहील. याठिकाणी मल्टी ॲडव्हेंचर टॉवर ॲण्ड ग्लॉन्ट स्विंग, झिप लाईन रोप कोर्सेस, मुलांच्या खेळाचे साहित्य, फ्लोटींग जेट्टी, प्लॅटफॉर्म आदी वैशिष्टपूर्ण कामे पूर्ण केली जाणार आहेत.

0000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 4 एप्रिल 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील असे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.

00000


 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 656 अहवालापैकी एकही अहवाल कोरोना बाधित आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी असून यातील 1 लाख 105 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 1 व्यक्ती उपचार घेत आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 97 हजार 375

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 77 हजार 408

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 105

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...