Friday, December 30, 2022

 शस्त्र परवानाधारकांनी शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घ्यावा  

नांदेड (जिमाका) दि. 30 :- नांदेड जिल्ह्यातील शस्‍त्र परवानाधारकांनी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत / अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा.  

परवानाधारकाने दिनांक 2 ते 31 जानेवारी 2023  या कालावधीत आपला शस्‍त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे, आपले शस्‍त्र परवान्‍यातील असलेले अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन, विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅनकार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा. याबाबत सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 विजय होकर्णे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न

जिल्हा माहिती कार्यालय व नांदेड जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्यावतीने गौरव

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- एखाद्या कर्मचाऱ्याला एकाच ठिकाणी आपली सेवा बजावण्याची संधी मिळणे हे क्वचित आढळते. विजय होकर्णे यांना छायाचित्रकार म्हणून जिल्हा माहिती कार्यालयात मिळालेली संधी ही त्यापैकीच एक आहे. आपली सेवा बजावतांना त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळविल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी केले.

 

जिल्हा माहिती कार्यालय व नांदेड जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विजय होकर्णे यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या छोटेखानी समारंभास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, संपादक सर्वश्री महमद अब्दुल सत्तार, राम शेवडीकर, शंतनू डोईफोडे, संतोष पांडागळे, मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, विजय होकर्णे, सौ. अरुणा होकर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.  

 

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, महमद अब्दुल सत्तार, राम शेवडीकर, शंतनू डोईफोडे,  संतोष पांडागळे, मुन्‍तजोबोद्यीन मुनिरोद्यीन, बापु दासरी, उमाकांत जोशी, ना. रा. जाधव, पवनसिंह बैस, सौ. अरुणा विजय होकर्णे यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.

 

छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी आपल्या सेवा कालावधीतील अनेक महत्वपूर्ण आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून होकर्णे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती कार्यालयातील सहकारी अलका पाटील, काशिनाथ आरेवार, अनिल चव्हाण, गंगाधर निरडे यांनी विजय होकर्णे यांना भेट वस्तु देऊन शुभेच्छा दिल्या.

0000  



Thursday, December 29, 2022

 लोकसहभागातून नदीचे स्वरूप बदलेल

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

· नदी संवाद यात्रेत गावकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सहभाग  

· मन्याडकाठची शेवाळा, आलूर आणि लिंबागावचे नागरिक पुढे सरसावले

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- लोकसहभागाशिवाय, नदीच्याकाठावर असलेल्या गावातील लोकांच्या योगदानाशिवाय नदीचे आरोग्य निरोगी होऊ शकणार नाही. गावाच्या पर्यावरणासाठी श्रमदान व निस्वार्थ लोकसहभाग यात एक वेगळी शक्ती दडलेली असते. आपण ज्या भागात वाढतो, मोठे होतो त्या भागाच्या विकासासाठी, जपणुकीसाठी जेंव्हा त्या-त्या भागातील लोक पुढे सरसावतात त्या चळवळीला, अभियानाला सकारात्मकता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे मन्याड नदी संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावकऱ्यांसह सुरू झालेल्या या यात्रेत मन्याड नदीचे समन्वयक प्रमोद देशमुख, शिवाजी देशपांडे, शेवाळाचे सरपंच शिवकुमार पाटील, आलूरचे सरपंच राजू देसाई, राज्य समिती सदस्य डॉ. सुमन पांडे, पर्यावरण तज्ज्ञ अजीत गोखले, देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम व मान्यवर उपस्थित होते.

 

जनसामान्यांना नदीसाक्षर करण्यासाठी, त्यांच्यासमवेत नदीला समजून घेत तिला अमृत वाहिनी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चला जाणुया नदीला हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील आसना नदी, मन्याड, कयाधू, मांजरा, सिता या नद्यांचा अभियानात समावेश आहे. या अभियानाअंतर्गत मन्याड नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नदी साक्षरता केली जाणार आहे.

 

नदीसमन्वयक प्रमोद देशमुख व शिवाजी देशपांडे यांनी या नदीसंवाद यात्रेत मन्याड नदीला दोन प्रवाहात विलग करणाऱ्या वझरगा येथील बेटाची माहिती दिली. वझरगा येथून मन्याड नदी विलग झाल्याने लिंबा येथे 1975 पासून सुरू असलेले उपसा जलसिंचन योजना बंद पडली. ही योजना पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी या ठिकाणी असलेल्या मन्याड नदीच्या पात्रातील गाळ काढण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. गावकऱ्यांशी संपूर्ण चर्चा करून आता लोकसहभागातून मन्याड नदीतील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे सर्व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सांगण्यात आले. या जबाबदार डोळस लोकसहभागाबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.  

00000




 राज्य मार्ग परिवहन महामंडळात

56 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागामध्ये सन 2022-23 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार म्हणुन 56 पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in व डिग्री / डिप्लोमा इन मेकॅनिकल / ॲटोमोबाईल अभियांत्रिकी उतीर्ण उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर एमएसआरटीसी विभाग नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्ज केल्यानंतर विभागाचे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन तो अर्ज दिनांक 2 ते 16 जानेवारी 2023 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचा दिवस वगळून विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा. प. नांदेड येथे विभागीय कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या नांदेड विभाग नियंत्रकांनी केले आहे.

 

 शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यात (मेकॅनिकल मोटार व्हेईकल-36, ॲटो इलेक्ट्रीशियन-6, शिट मेटल वर्क्स-10, पेंटर (जनरल)-1, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-1 अभियांत्रिक पदवीधर/पदवीकाधारक मेकॅनिकल/ॲटोमोबाईल -2 अशी एकुण 56 जागा आहेत. या जागांपैकी अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत) या जागेसाठी विहीत नमुन्यातील छापील अर्ज आस्थापना शाखा विभागीय कार्यालय रा.प. नांदेड येथे 16 जानेवारी 2023 रोजी 3 वाजेपर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील.

 

या अर्जाची किंमत खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये व मागासवर्गीयांसाठी 295 रुपये आहे. ही शिकाऊ उमेदवार भरती नांदेड जिल्ह्यासाठी असून केवळ नांदेड जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा व्यतीरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय / अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज व मागील 3 वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असेही राज्य परिवहन विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

28.12.2022

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कॅबिनेट हॉल, नियोजन भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 


यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 


या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमूख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 


न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

28.12.2022

 लम्पी प्रतिबंधक बाबत निराधार वृत्तावर विश्वास ठेवू नये

45 लाखांची उधळपट्टी या आशयाचे वृत्त निराधार

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- काही वर्तमानपत्रात लम्पी प्रतिबंधक प्रचारावर 45 लाखांची उधळपट्टी या आशयाची निराधार बातमी छापून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्यात येवू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथे 22 ते 26 डिसेंबर 2022 दरम्याने जिल्हा परिषदेमार्फत भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीमार्फत 45 लाख रुपये नियतव्यय मंजूर आहे. या तरतुदीमधून पशुसंवर्धन विभागामार्फत विभागाचा स्टॉल, भव्य अश्व, श्वान, शेळी आणि कुक्कूट प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी पशुंना बक्षीस वितरण, सहभाग भत्ता, शेतकऱ्यांसाठी माहितीपर पुस्तिका, घडीपत्रिका आणि अनुषंगिक बाबींसाठी शासन निर्णय 30 ऑगस्ट 2010 च्या अधीन राहून अंदाजे 16 लक्ष खर्च होत आहे. उर्वरित 29 लक्ष रुपये शासनखाती भरणा करण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद बोधनकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

Tuesday, December 27, 2022

 आधार नोंदणी करून दहा वर्षे झालेल्या

नागरिकांनी केवायसी अपडेट करून घेणे आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- ज्या नागरिकांनी आधार नोंदणी करून दहा वर्षे पूर्ण केले आहेत, त्यांनी आपले आधार केवायसी अपडेट करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आधार समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले.

 

या आधार नोंदणीबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपसंचालक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आधारबाबत काही समस्याचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1947 व ईमेल आयडी help@uidai.in  यावर संपर्क करावा. आधार सेवेसाठी शुल्क ही पुढीलप्रमाणे आहे. नवीन आधार नोंदणी व अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय ही मोफत आहे. डेमोग्राफिक अपेडट नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेलसाठी 50 रुपये तर बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय शंभर रुपये शुल्क आहे. एकाचवेळी किंवा त्यापेक्षा जास्त माहिती बायोमॅट्रिक / डेमोग्राफिक अपडेट करणे ही एकच विनंती मानली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000 

 कोरोनाच्या आव्हानाला पेलण्यासाठी

नांदेड जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

 

जिल्ह्यातील कोविड समर्पित 12 रुग्णालयांमध्ये घेतली रंगीत तालीम

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अधिक सुरक्षित  

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जगभर कोरोनाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर तयारी केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकताच जिल्हातील आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

 

शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सर्व साधन व सेवा-सुविधांची रंगीत तालीम घेऊन पूर्व तयारी केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वैद्यकियदृष्ट्या मुबलक प्रमाणात सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. मागील कोविडच्या लाटेत सर्वाधिक 35 मे. टन पर्यंत ऑक्सिजनची मागणी गेली होती. त्यावेळेसच्या मागणीच्या तीनपट पेक्षा अधिक आता जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता झाली आहे. सद्यस्थितीत 178.99 मे. टन ऑक्सिजन सुविधा आहे. यात आणखी 45.82 मे. टन ऑक्सिजन क्षमता वाढविली जात आहे. जिल्ह्यात समर्पित कोविड रुग्णालयामध्ये सुमारे 1190 खाटा अर्थात बेडस् सुविधा आहे.

 

मागील कोविड लाटेत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेडसची संख्या 4 हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सुमारे 250 व्हेंटीलेटरची सुविधा आहे. हे सर्व यंत्रणा आज रंगीत तालमीमध्ये तपासून घेण्यात आली. भविष्यात गरज जर भासलीच तर त्यात कोणतीच त्रुटी असता कामा नये यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. टेस्टींग किटस् मुबलक प्रमाणात आहेत. मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर केंद्र साकारले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 68 रुग्णवाहिका तर शासकीय रुग्णालयाकडे इतर 36 रुग्णवाहिका असा एकुण 107 रुग्णवाहिका प्रत्येक ठिकाणी तयार आहेत. याचबरोबर इतर 25 रुग्णवाहिका जिल्ह्यात तत्पर आहेत.

 

जिल्हा प्रशासनाने कोविडच्यादृष्टिने पूर्व तयारी केलेली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यात वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण, मास्क यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000      




Monday, December 26, 2022


 


 

 


 वृत्त

 साहिबजादा यांच्या बलिदानाला स्मरण करून

लाखो विद्यार्थ्यांनी घेतली धैर्याची शिकवणूक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

·  नांदेडमध्ये आयोजित रॅलीला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सहभाग

·  साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेह सिंघजी यांच्या वीर बलिदानापासून घेतली प्रेरणा 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेहसिंघजी यांच्या शौर्य व बलिदानाची गाथा पोहचविण्यासाठी आयोजित केलेल्या रॅलीला आज विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. नांदेड शहरातील सुमारे 65 शाळातून 5 हजार विद्यार्थ्यांनी साहिबजादे यांच्या धैर्य, साहस, बलिदान यांचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करुन एकात्मतेवर घोषणा देवून परिसर निनादून टाकला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित होते.   

सकाळी 8.30 वाजेपासून सुरु झालेल्या रॅलीत विविध शाळांनी साहिबजादा यांच्या बलिदानाचे स्मरण करुन देणाऱ्या देखाव्यासह, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची सहिष्णुता दर्शविणारी दिंडी, पंजाब आणि महाराष्ट्रातील अध्यामिक नाते दृढ करणाऱ्या संत नामदेव महाराजाच्या वेशभुषेसह विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया उत्साहात सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या या विविध सादरीकरणासह या रॅलीचे आकर्षण जबलपूर येथून आलेल्या बँडचे पथकही ठरले. अनेक देशभक्तीपर गीते त्यांनी सादर करुन नांदेडकराची मने जिंकली.    

साहिबजादा यांच्या बलिदानाला स्मरण करून

लाखो विद्यार्थ्यांनी घेतली धैर्याची शिकवणूक

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेहसिंघजी  यांनी दिलेल्या बलिदानापासून प्रेरणा घेता यावी, त्यांच्या धैर्याचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या बलिदानाप्रती कृतज्ञतेचा भाव अधिक वृद्धिंगत व्हावा आणि सहिष्णुता व एकतेचा विचार सर्वांपर्यंत पोहचावा या उद्देशाने हा उत्सव आपण घेतला. महाराष्ट्र शासन व गुरुद्वाराबोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शिख धर्मिय व पंजाबशी असलेले नाते या दोन दिवसांच्या उत्सवातून अधिक दृढ झाल्याची भावना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली. शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 729 शाळांपर्यत आपण ही शौर्याची गाथा या उत्सवाच्या निमित्ताने पोहोचवीली आहे. याच बरोबर जिल्ह्यातील सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व बाबा फतेह सिंघजी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा प्रशासनाच्या कुशल नियोजनातून

या उत्सवाला आले लोकाभिमूख स्वरुप

-         डॉ. पी.सी. पसरीचा

या कार्यक्रमासाठी मागील दोन महिन्यापासून आम्ही शासनासमवेत एकत्र काम करीत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढाकार घेवून हा वीर बाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली. नांदेडचा पंजाब व शिख धर्माशी असलेला स्नेह लक्षात घेवून नांदेड येथे हा वीर बाल दिवस चांगला साजरा व्हावा यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने अचूक नियोजन केले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शालेय शिक्षण विभाग, महानगरपालिका व इतर विभागांचा योग्य समन्वय ठेवून नियोजन केल्यामुळे हा दिवस व नांदेड उत्सव अधिक लोकाभिमूख झाल्याच्या भावना गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. पी. सी. पसरीचा यांनी व्यक्त केल्या.

 विविध स्पर्धाचे हे ठरले विजेते  

 वक्तृत्त्व स्पर्धा

प्रथम पारितोषिक रोख रुपये 51 हजार विजेती कु. श्रुती सावे, केंब्रिज विद्यालय नांदेड

द्वितीय पारितोषिक रोख रुपये 31 हजार. विजेती कु.चरणजित कौर गिल, दशमेश स्कूल नांदेड

तृतीय पारितोषिक रोख रुपये 21 हजार. कु. अक्षरा बरबडे, लिटल फ्लावर स्कूल, बिलोली

उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 7 हजार. विजेते पवन चंद्रकांत संगमकर, साने गुरुजी विद्यालय, बिलोली

उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये 7 हजार. विजेते अपूर्वा अनिल सोनकाबंळे, विवेकवर्धीनी हायस्कुल,नांदेड

 उत्कृष्ट देखावा स्पर्धा  

प्रथम पारितोषिक रोख रुपये 7 हजार. विजेते संचखंड स्कुल, वीर बाल दिवस देखावा

द्वितीय पारितोषिक रोख रुपये 5 हजार. विजेते खालसा हायस्कूल, पंच प्यारे देखावा

तृतीय पारितोषिक रोख रुपये 3 हजार. विजेते जिजामाता माध्यमिक विद्यालय, बाल विवाह देखावा

उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रुपये 2 हजार. विजेते शिवाजी हायस्कुल पावडेवाडी, दिंडी देखावा

उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रुपये 2 हजार. विजेते महात्मा फुले हायस्कूल, एनसीसी स्काऊट गाइड देखावा

00000






Sunday, December 25, 2022

 विश्वशांतीचे केंद्र म्हणून नांदेडला विकसित करण्यावर देऊ भर - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

▪️ जिल्ह्यातील 15 क दर्जाच्या पर्यटन क्षेत्रावर प्राथमिक सुविधा
▪️होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद
▪️लोकाभिमुखतेसाठी जिल्ह्यात पर्यटन समिती
▪️वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 25 :- अध्यात्म, तीर्थक्षेत्र आणि पर्यटन याचा सुरेख संगम नांदेड जिल्ह्यात आहे. संपूर्ण विश्वाला आवश्यक असलेल्या शांतीचे प्रतिक म्हणून नांदेडच्या पवित्र भूमीकडे पाहिले जाते. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराच्या माध्यमातून जो शांती व एकात्मतेचा संदेश दिला जातो तो अत्यंत मोलाचा आहे. येथील हे शक्तीस्थळ भक्तीसह विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसीत करण्यावर आपण सर्व मिळून भर देऊ, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने वीर बाल दिवस व नांदेड महोत्सवाचे उद्घाटन आज गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास पंजाबचे विधानसभेचे सभापती स. कुलतार सिंघ संधवान, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार मोहनराव हंबर्डे, खासदार स. विक्रमजित सिंघ साहनी, उपसभापती जयकिसन सिंघ, आमदार कुलवंत सिंघ, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. माळवदे, दै. तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक किरण शेलार, प्रविण साले, लड्डू सिंग महाजन आदींची उपस्थिती होती.
अखंड हिंदुस्थान हीच आपली ओळख आहे. आपल्या इतिहासात जर डोकावून पाहिले तर आपल्या अखंडत्वाला वेळोवेळी तोडण्याचा इतिहास आपल्या लक्षात येईल. इथे राहणाऱ्या सर्व धर्मांनी एकात्मता ठेऊन राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. आपली एकात्मता यातूनच देशाची अखंडता टिकून राहिली आहे. ही अखंडता टिकवून ठेवण्यासाठी शीख धर्माने याचबरोबर साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेहसिंघजी यांचे बलिदान देश कधी विसरणार नाही, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. देशाच्या अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले आहे तो इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचावा या उद्देश ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीरबाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक बुलंद संदेश नांदेड येथून देण्यास प्रारंभ करतांना आम्हाला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री गुरूगोविंदसिंघजी यांची ही पावन भूमी आहे. श्री गुरूगोविंदसिंघजी यांनी सदैव एकात्मतेवर भर दिला. त्यांनी संहिष्णुतेवर भर दिला. त्यांनी दिलेल्या या गुरूसंदेशाला विचारात घेऊन नांदेड हे विश्वशांतीचे केंद्र म्हणून विकसीत करण्यामध्ये पर्यटन विभागाने अधिक द्यावा, अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त व्हाइस चान्सलर पंजाबी युनिर्व्हसिटी पटीयालाचे डॉ. स. जसपाल सिंघजी, पंजाब कला परिषदेचे अध्यक्ष स. सुरजीत सिंघजी पातर, पंजाबी साहित्य अकॅडमीचे सेवानिवृत्त अध्यक्ष राजन खन्ना यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेसिंघजी यांच्या साहसाबद्दल माहिती दिली. श्री गुरूगोविंदसिंघजी यांनी धर्माचा अर्थ सत्य असल्याचे सांगितले आहे. सत्याचे पालन यातच संपूर्ण जगाच्या कल्याणाचा मार्ग असून भारताचा राष्ट्रवाद हा संताचा असल्याचे प्रतिपादन राजन खन्ना यांनी केले.
ज्या इतिहासावर आपण उभे आहोत तो इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. श्री गुरूगोविंदसिंघजी धर्मानुसार चालले म्हणून आपली अखंडता टिकून राहिल्याचे प्रतिपादन पंजाब विधानसभेचे सभापती कुलतारसिंघ संधवान यांनी केले. साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा फतेसिंघजी हे येणाऱ्या पिढीचे आयकॉन असल्याचे तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक किरण शेलार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे बाल वीर दिवसानिमित्त दोन दिवस संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगुन प्रास्ताविक माजी पोलीस महासंचालक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा यांनी केले.
*जिल्ह्यातील पर्यटनस्थळ व कौशल्य विकास विभागाबाबत पर्यटनमंत्री लोढा यांनी घेतली आढावा बैठक*
नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्र यांचे महत्व लक्षात घेता यावर येत्या काळात अधिक भर दिला जाईल. रोजगार व स्वयंरोजागाराच्या संधी त्या-त्या पर्यटन तीर्थक्षेत्राच्या भागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात यादृष्टिने आमचे नियोजन सुरू आहे. पर्यटनक्षेत्राच्या विकास कामात लोकसहभागही तेवढाच महत्वाचा असतो. पर्यटनक्षेत्राच्या संदर्भात असणाऱ्या ज्या सेवासुविधा लागतात त्यात कार्य करणारे हॉटेल, गाईडस्, पर्यटनाशी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांचा सहभाग तेवढाच आवश्यक असतो. हे लक्षात घेता जिल्हा पातळीवर पर्यटनाच्या विकासासंदर्भात अशासकीय सदस्यांची एक समिती नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकुण पर्यटनक्षेत्रापैकी प्राथमिक स्तरावर क दर्जाच्या 15 पर्यटनक्षेत्रावर प्राथमिक पायाभूत सुविधा विकसीत केल्या जातील, असे पर्यटन मंत्री लोढा यांनी जाहीर केले. होट्टल महोत्सवासाठी भरीव तरतूद करून या ठिकाणी जनसुविधेच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा महोत्सव एप्रिल ऐवजी फेब्रुवारी महिन्यात घ्यावा या सूचनेचा त्यांनी स्विकार करून पर्यटन विभागाला निर्देश दिले. याचबरोबर जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र यांना जोडणारे एक सर्किट निर्माण करून विकासावर भर देऊ असेही त्यांनी सांगितले. शंभर किमी परिसरातील जेवढी पर्यटनस्थळे येतील, तीर्थक्षेत्र येतील त्याचा यात समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*राज्यात पाच लाख बेरोजगारांना देऊ रोजगार*
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी ग्रामीण पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने आम्ही भर देत आहोत. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना आयटीआय केंद्राच्या मार्फत वेगळे कोर्सेस तयार करीत आहोत. यात प्रामुख्याने सौरऊर्जा, कृषिक्षेत्र याबाबींचा विचार आम्ही केला आहे. राज्यात सुमारे पाच लाख युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
*वीर बालकांच्या शहिदांची आठवण करतांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गाऊन व्यक्त केल्या भावना*
साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा बाबा फतेह सिंघजी यांच्या वीर बलिदानाचे स्मरण करतांना पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आपल्या भावना व्यक्त करतांना “कही पर्वत झुके भी है” हे गीत गाऊन दाखविले. त्या गिताचे बोल पुढील प्रमाणे आहेत.
कही पर्वत झुके भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
गुरू गोबिंद के बच्चे,
उमर मे थे अगर कच्चे,
मगर थे सिंह के बच्चे,
धर्म ईमान के सच्चे,
गरज कर बोल उठे थे यूँ,
सिंह मुख खोल उठे थे यूँ,
नही हम रूके नही सकते,
नही हम झूके नही सकते,
कही पर्वत झुकें भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
हमे निज देश प्यारा है,
हमे निज धर्म प्यारा है,
पिता दशमेश प्यारा है,
श्री गुरू ग्रंथ प्यारा है,
जोरावर जोर से बोला,
फतेहसिंह शोर से बोला,
रखो ईटें भरो गारा,
चुनो दिवार हत्यारों,
कही पर्वत झुकें भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
निकलती स्वास बोलेगी,
हमारी लाश बोलेगी,
यही दिवार बोलेगी,
हजारों बार बोलेगी,
हमारे देश की जय हो,
पिता दशमेश की जय हो,
हमारे धर्म की जय हो,
श्री गुरू ग्रंथ की जय हो,
कही पर्वत झुकें भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
कही पर्वत झुके भी है,
कही दरिया रूके भी है,
नहीं रूकती रवानी है,
नहीं झुकती जवानी है।।
00000

 





























  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...