Wednesday, October 11, 2023

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 149 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 149 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         49  रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         857 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 722

 

 नांदेड, (जिमाका) दि. 11 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 857  रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 722 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 9 ऑक्टोंबर ते  10 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  149  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात  7 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नवजात बालक 1 (स्त्री जातीचे 1) व प्रौढ 6 (पुरुष जातीचे 2, स्त्री जातीचे 4) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 49 शस्त्रक्रिया झाल्या. यात 40 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 9 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 26  प्रसुती करण्यात आल्या. यात 11  सीझर होत्या तर 15 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

बालविवाह होणार नाहीत यासाठी समाजाचीही दक्षता अत्यावश्यक - उपविभागीय अधिकारी विकास माने

 बालविवाह होणार नाहीत यासाठी समाजाचीही दक्षता अत्यावश्यक


-  उपविभागीय अधिकारी विकास माने

▪️आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त नांदेड तहसील येथे बालविवाह निर्मूलनाची सामूहिक शपथ

नांदेड (जिमाका) दि. 11 :- बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी बालविवाह हा मोठा अडसर असून सामाजिक जबाबदारीचे भान प्रत्येकाने ठेवून बालविवाह जर कुठे होत असतील तर ते रोखण्यासाठी हिरीरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तहसिल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी जिल्हा महिला बाल‍ विकास अधिकारी आर.आर. कांगणे, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयक चंदा रावळकर, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, शिक्षण विभागाच्या सविता अवातिरक, युनिसेफच्या प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा समन्वयक अरुण कांबळे, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे जगदिश राऊत यांची  उपस्थिती होती.

शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय राज्यशासन घेत आहे. 



आंतरराराष्ट्रीय बालिका दिन व नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने लेक लाडकी योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाखो मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे. विविध योजनाच्या माध्यमातून भर देण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होवू नयेत. बालविवाह होत असल्याचे आढळल्यास तात्काळ रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशिल राहावे, असेही त्यांनी आवाहन  केले. त्यांनी उपस्थितांना बालविवाह निर्मूलनाची शपथ दिली.

00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 25 ऑक्टोबरच्या 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 25 ऑक्टोबरच्या 2023 मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...