Saturday, June 5, 2021

 

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची

नामांकित कंपन्यांमध्ये निवड

नांदेड, दि. 5 (जिमाका) :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड या संस्थेतील अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमधील सातत्याने निवडीची परंपरा यावर्षी देखील कायम राहिली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमी असताना सुद्धा शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये बजाज ऑटो, एल अँड टी, सिग्मा इलेक्ट्रिक, जनरल इलेक्ट्रिक, एन्डयुरन्स, इन्फोसिस आदि प्रसिद्ध कंपन्यांनी ऑनलाईन चाचणी व मुलाखतींचे आयोजन केले. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विविध शाखांच्या 220 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यापैकी 40 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे मिळाली असून उर्वरित विद्यार्थ्यांची नियुक्तीपत्रे लवकरच प्राप्त होतील. मागील शैक्षणिक वर्षात देखील संस्थेच्या एकूण 209 विद्यार्थ्यांना विविध मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.

 

संस्थेत सिव्हिल,  मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रॉडक्शन,  इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी,  मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आदी शाखेचा पदविका अभ्यासक्रम चालवला जात आहे. या सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांची कोअर इंडस्ट्री तसेच सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये निवड होत आहे. संस्था निवड करताना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कॅम्पस प्लेसमेंट हा ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकाचा महत्वाचा निकष असतो.  हे लक्षात ठेवून संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व आस्थापना विभाग अधिकारी एस. एम. कंधारे हे परिसर मुलाखतींसाठी अधिकाधिक नामवंत तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांना निमंत्रित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. नामवंत कंपन्यांकडून संस्थेच्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये 1.8 ते 2.5 लाखापर्यंत पॅकेजची नोकरी देण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा संस्थेत प्रवेश घेण्याकडे कल दिसून येतो. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

00000

 

विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, दि. 5 (जिमाका) :- नांदेड जिल्ह्यातून विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी गैरसोय होऊ नये याची दक्षता शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे घेतली जात आहे. यासाठी आता संबंधित विद्यार्थ्यांनी विदेशातील शैक्षणिक संस्था / विद्यापिठाकडून प्रवेश संदर्भात दिलेली कागदपत्रे, ॲडमीशन ऑफर लेटर, व्हिसा अथवा व्हिसा मिळण्याबाबत सादर केलेले कागदपत्र तपासून संबंधितांचे लसीकरण केले जाईल. cowin.gov.in या वेबसाईटवर नोंदी घेऊन तसा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या ईमेल आयडीवर dhonanded4@gmail.com वर सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशीत केले आहे.  

000000

 

नांदेड जिल्ह्यात 126 व्यक्ती कोरोना बाधित

तर 147 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 546 अहवालापैकी  126 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 54 तर अँटिजेन तपासणीद्वारे 72 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 262 एवढी झाली असून यातील 87 हजार 120 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 742 रुग्ण उपचार घेत असून 17 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आजच्या अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 890 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 23, किनवट 4, अर्धापूर 1, नांदेड ग्रामीण 13, लोहा 3, परभणी 2, हिमायतनगर 1, मुदखेड 1, हिंगोली 3, भोकर 1, मुखेड 1, आदिलाबाद 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 22, धर्माबाद 1, मुखेड 1, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 15, हदगाव 2, किनवट 3, वाशिम 2, बिलोली 1, कंधार 1, परभणी 2, नागपूर 1, देगलूर 4, लोहा 2, हिंगोली 3 असे एकूण 126 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 147 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10,  मुखेड कोविड रुग्णालय 6, लोहा कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, किनवट कोविड रुग्णालय 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 92, हदगाव कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालयातील 28 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 742 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 37, माहूर कोविड केअर सेंटर 2, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  4, देगलूर कोविड रुग्णालय 7,  हदगाव कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 5,  किनवट कोविड रुग्णालय 26, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 363, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 215, खाजगी रुग्णालय 56 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 114, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 119 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 55 हजार 663

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 54 हजार 29

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 262

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 120

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 890

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.51 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-263

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 742

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-17

00000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 6 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 8 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर) येथे प्रत्येकी 100 डोस, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात 90 डोस, श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, जंगमवाडी, सिडको येथे प्रत्येकी 70 डोस, शिवाजीनगर व दशमेश या केंद्रावर 50 डोस उपलब्ध आहेत.    

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दिले जातील.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव व उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल. 

 

जिल्ह्यात 4 जून पर्यंत एकुण 4 लाख 39 हजार 804 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 5 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 27 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 25 हजार 700 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 53 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी

त्यांच्या सोईच्या ठिकाणी लसीकरण केंद्र  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, दि. 5 (जिमाका) :- राष्ट्रीय लसीकरणाच्या मोहिमेत दिव्यांग व्यक्ती तसेच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध नागरिकांच्या कोविड-19 लसीकरण अधिक सोईचे व्हावे यादृष्टिने शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत. शासनाच्या या सूचनानुसार आता दिव्यांग व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या वयोवृद्धांसाठी ग्रामीण भाग, शहरी भाग व महानगरपालिका भागात विशेष सोई उपलब्ध करुन दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. 

आरोग्य विभाग, सामान्य न्याय विभाग, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्या परस्पर समन्वयातून त्या-त्या कार्यक्षेत्रात याबाबत नियोजन केले जात आहे. यात ग्रामीण पातळीवर कोविशिल्ड लसीच्या साठ्यांपैकी 10 टक्के लस ही यासाठी राखीव ठेवली जात आहे. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल समितीच्या बैठकीत नियोजन केले जाईल. यात संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी व आशा यांच्यामार्फत हे लसीकरण यशस्वी केले जाईल. वैद्यकिय अधिकारी हे गावनिहाय लसीकरणाचे आयोजन करतील. दिव्यांग व वयोवृद्धांचे लसीकरण यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था, तालुका दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभाग लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी घेतला जाईल. 

शहरी भागात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल समितीची बैठक घेऊन त्यात वार्ड निहाय यादीसह सुक्ष्म कृती आराखडा तयार केला जाईल. वार्डनिहाय लसीकरणाचे आयोजन नगरपरिषद, नगरपालिका यांच्या समन्वयातून होईल. महानगरपालिका भागात समाज कल्याण अधिकारी आणि वैद्यकिय अधिकारी, शहरी प्राथमिक आरोग्य अधिकारी हे वार्डनिहाय दिव्यांगाची यादी करुन सुक्ष्म कृती आराखडा तयार करतील. दिव्यांग व वयोवृद्धांचे लसीकरण यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाईल. लसीकरण केंद्रासाठी त्या-त्या भागातील शाळा, समाज मंदिर, मनपा कार्यक्षेत्रात शहरी, प्राथमिक आरोग्य केंद्र यांची निवड केली जाईल. सर्व लाभार्थ्यांची लसीकरण नोंदणी जागेवरच नोंदणी पद्धतीने पोर्टलवर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

*****

 

ऑटोरिक्षा चालकांनी आधार कार्डचा

तपशिल दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन 

 

नांदेड, दि. 5 (जिमाका) :- जिल्ह्यात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान 1 हजार 500 रुपये ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. काही ऑटोरिक्षा मालकांचे मोबाईल क्रमांक हे आधारशी लिंक होत नाहीत. आधार व ड्रायव्हींग परवानाच्या जन्म तारखेत फरक असल्याने अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या आधार कार्डचे तपशील दुरुस्ती करण्यासाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आधार सुविधा केंद्र सुरु केले आहे. हे केंद्र गुरुवार 17 जून 2021 पर्यंत सकाळी 11 ते सायं. 5 यावेळेत चालू आहे. या शिबिराचे लाभ घेऊन आधार कार्डचा तपशिल दुरुस्ती करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

 

 शिवस्वराज्य दिन जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीसह

पंचायती समिती व जिल्हा परिषदेत होणार साजरा

 पालकमंत्री अशोक चव्हाण साधणार ऑनलाईन संवाद   

नांदेड, दि. 5 (जिमाका) :- रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी शिवस्वराज्याचा अभिषेक केला. याच्या प्रित्यर्थ 6 जून हा दिवस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून शासनातर्फे साजरा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती पुढे सरसावल्या आहेत. जिल्हा परिषदेत सर्व पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य समारंभ होईल. सकाळी 9 वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन केले जाईल. पालकमंत्री अशोक चव्हाण हे या कार्यक्रमाच्या औचित्याने उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधून शुभेच्छा देतील.       

हा कार्यक्रम साजरा करतांना शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या कोविड-19 च्या मार्गदर्शक सुचनांचे / नियमांचे पालन करुन शिवराज्य दिन कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. 

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करतांना पुढील निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. भगवा स्वराज्यध्वज संहितेनुसार ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. ध्वज हा 3 फुट रुंद आणि 6 फुट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा. 

शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहितेत शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा. सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकु, ध्वनीक्षेपक या आवश्यक साहित्याचा वापर करावा. 

6 जून सकाळी 9 वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्यावा. शिवरायांना सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुख, समृद्धी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्ण कलश बांधवा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहुन त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणुन सांगता करावी. सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवुन द्यावा. 

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखील भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन होय. हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतन रहावे म्हणून महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतला. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरुन घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करुन महाराज शक कर्ते ही झाले. तो हा शुभदिन होय. महाराजांनी तत्कालीन प्रस्थापित सत्तांना पालथे करुन स्वत:च्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करुन रयतेची झोळी सुख समृद्धीने भरली होती आणि याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्यांची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमीपुत्रांच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.

00000

 

मृत्यूच्या भितीपेक्षा जीवनाचे मोल ओळखू यात  

ज्येष्ठांनो मनसोक्त निर्भीड जगा

-         डॉ. प्रभाकर देव         

नांदेड, दि. 5 (जिमाका) :-  अलिकडच्या दीड वर्षात सर्वाधिक घुसमट जी होत आहे ती मृत्यूच्या भयातूनच होत आहे. यातही सर्वाधिक भरडला जाणारा वर्ग हा ज्येष्ठ नागरिकांचा आहे. कोरोना सारख्या घातक आजाराचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठांनाच असल्याबाबत माध्यमातून अधिक भडीमार झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची मानसिक घालमेल अधिक झाली. आयुष्यभर असंख्य ऊन पावसाळे सुख-दु:खाचे प्रसंग झेलून उतरत्या वयात ही भयावहता अनेकांसाठी अत्यंत त्रासावून सोडणारी आहे. मृत्यू हा सर्वांगण सुंदर सोहळा आहे हे विसरुन चालणार नाही. आजच्या काळात ज्येष्ठांची होणारी मानसिक घालमेल समाजाने, कुटूंबातील प्रत्येकांनी निट समजून घ्यायला हवे या शब्दात ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव यांनी आजच्या भवतालाचे वास्तव समोर ठेवले. 

नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने समाजात सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरु केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच या अभियानाच्या निमित्ताने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांनी आपले भावविश्व व्यक्त करुन ज्येष्ठांना आश्वासकता दिली. 

ज्यांनी वयाची साठी ओलांडून ज्येष्ठांचा मान घेतला आहे त्यांनी मृत्यूच्या या भितीतून बाहेर पडायला हवे. एकदा मृत्यूचे मोल कळले की भिती आपोआप गळून जाते. रोज जगून भितीने मरण्यापेक्षा आजवर आपल्याला ज्या काही गोष्टी करता आल्या नाहीत त्या करुन पाहण्याचा प्रयत्न केला तर कोणतेच भय मनाला शिवणार नाही, असे डॉ. देव म्हणाले. इतिहासाच्या दृष्टिकोणातून आजच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पाहिले तर पूर्वीच्या काळातील भावविश्व अगोदर आपल्याला समजून घ्यावे लागेल. पन्नास वर्षापूर्वीचे जग आणि आजचे जग यात जमीन-आसमानचा फरक आता पडला आहे. यात भौतिक सोई-सुविधा असलेला वर्ग व ज्यांच्या पर्यंत कनेक्टिव्हिटी पोहचली नाही असा वर्ग या द्विस्तरावर विभागणी करावी लागेल. 

ज्यांची बोटे मोबाईलच्या स्क्रिनवर स्थिरावली आहेत त्यांना आता जगाचे अंतर राहिले नाही. जे व्यक्ती याचा जसा उपयोग करुन घेत आहेत ते भावविश्व प्रत्येकाला मिळत आहे. असंख्य ज्येष्ठ नागरिक आज या आजच्या कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहेत. पण ही कनेक्टिव्हिटी केवळ व्हॉटसॲप पुरतीच मर्यादित असेल आणि ठराविक चौकटितीलच असेल तर तुमचे भावविश्वही तेवढ्याच चौकटीत बंदीस्त होईल. या साऱ्या चौकटीच्या बाहेर पडून आजच्या काळात ज्येष्ठांना खूप काही वाचता येईल. अनेकांनी आपल्याला जसे जमेल तसे व त्या शब्दात लिहिण्यासाठी प्रयत्न केला पहिजे. आपण जे आयुष्य वेचले ते लिहिले पाहिजे. हा क्रम जर ज्येष्ठांनी निवडला तर कोरोनाच्या भयातून आपण केंव्हा भयमुक्त झालो हे लक्षातही येणार नाही. आजार होऊ नये याची काळजी घेतली तर भयमुक्तीचा मार्ग सहज मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आजही ग्रामीण भागामध्ये जिथे व ज्यांच्यापर्यंत कनेक्टिव्हिटी पोहचली नाही त्यांची स्थिती 50 वर्षापूर्वीचच आहे. या काळात ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या भितीच्या सावटाखाली आले नाहीत. एक सश्रद्ध भावना त्यांच्यात असल्याने आत्मबलातून त्यांनी सुरक्षीततेला प्राधान्य दिले असावे. पूर्वीच्या काळी प्लेग, देवी सारख्या गावेच्या गावे उद्धवस्त करणाऱ्या साथी आल्या तेंव्हा माणुस हा सश्रद्धतेतूनच सावरला हे लक्षात घ्यावे लागेल. साथीच्या आजाराला देवपण देणारी भावना ही सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेला मंत्र होता, असे डॉ. देव यांनी स्पष्ट करुन त्याकाळातील मानसिक धैर्याचे विश्लेषण केले. भक्तीच्या मार्गात विवेक असला की माणसे सावरुन जातात हा आपला इतिहास विसरता येणार नाही. 

मानवी अस्तित्त्व हे पंचमहाभुताचा एक भाग आहे. जल, अग्नी, वायु, आकाश, पृथ्वी ही पाच तत्वे म्हणजे पंचमहाभूत अशी भारतीय तत्वचिंतनाची भूमिका आहे. कणाकणात ईश्वर आहे, प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. मृत्यू म्हणजे आपल्या मूळ अस्तित्त्वात एकरूप होणे आहे, मिसळणे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मृत्यूची भिती काढून टाकण्यासाठी एवढे जरी समजून घेतले तरी  ते पुरेसे आहे. जो निसर्गाशी जवळ आहे, जो शेता-मातीत काम करणारा आहे तो आपल्या खेड्यापाड्यातील बांधव ह्या गोष्टी, हे तत्व चांगले समजून आहेत म्हणून तो भितीपासून दूर आहे. निर्भयता ही जीवनाला अर्थ देणारी गोष्ट आहे. वेळच मिळाला नाही हे ज्यांचे शब्द होते त्यांनी आतातरी निश्चिंत होऊन आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवून मनसोक्त जगावे असे डॉ. प्रभाकर देव यांनी सांगून ज्येष्ठांना नवे बळ दिले.  

*****

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...