Sunday, December 28, 2025

दि.२७ डिसेंबर 2025

वृत्त क्रमांक 1327

अवैध वाळू उत्खननाविरोधात पुन्हा नांदेड महसूल प्रशासनाची कार्यवाही

३५ लाख किमतीचा मुद्येमाल नष्ट

नांदेड, दि.२७ डिसेंबर:-आज दिनांक 27 डीसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन  खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या आदेशानुसार पथक प्रमुख नायब तहसीलदार स्वप्निल  दिगलवार यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी संतोष अस्कुलकर, अनिरुद्ध जोंधळे, मोहसीन सय्यद, प्रमोद बडवने, ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, गौतम पांढरे, एम.के.पाटील, मनोज जाधव, मनोज सरपे, दिलीप पवार, आढाव, मोहन कदम, सचिन उपरे, रमेश गिरी, माधव शिराळे महसूल सेवक शिवा तेलंगे यांचे महसूल पथक त्रिकुट परिसरामध्ये सकाळी 6 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना त्रिकुट संगमजवळ रेती उत्खनन करणारे 3 मोठी  बोट , एक  छोटी बोट आढळून आले. 

पथकाने मजुरांच्या साह्याने 2 मोठी  बोट  बुडवून टाकले तर एक मोठी बोट व 1 लहान बोट जिलेटीने स्फोट करून नष्ट केले.असे एकूण 35 लाख किमतीचा मुद्देमाल पाण्यात बुडवून व स्फोट करून नष्ट करण्यात आला.

अवैध उत्खननासंदर्भात  महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.

0000





दि. २६ डिसेंबर 2025

वृत्त क्रमांक 1326

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

नांदेड, दि. २६ डिसेंबर : दिनांक २६ डिसेंबर हा दिवस श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या दोन लहान सुपुत्रांच्या अतुलनीय शौर्य, धैर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुलांमध्ये धैर्य, त्याग, प्रामाणिकपणा, राष्ट्रभक्ती, संवेदनशीलता तसेच सत्य, स्वाभिमान व न्यायाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा आहे. वयाला धैर्याचे बंधन नसते आणि मूल्यांसाठी जगणारेच खरे वीर असतात, ही प्रेरणा या दिवसातून मिळते.

या अनुषंगाने श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे शुक्रवार २६ डिसेंबर २०२५ रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास ॲड. अमरिकसिंघ वासरीकर, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य हर्षदभाई शहा, क्रीडा प्रशिक्षक व सचिव वृषाली पाटील, पिनॅकल शाळेचे क्रीडा प्रशिक्षक साहेबराव शिंदे तसेच संस्थेचे प्राचार्य व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. विविध क्षेत्रात विशेष कौशल्य दाखवलेल्या कु. अवनी अविनाश कापसे, आर्यन लक्ष्मण मालेवार, अथर्व जोंधळे, स्वयंम मालू कांबळे, सानिध्य बळीराम अकोले व सूर्या सतीशकुमार पाटील या बालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज व त्यांच्या चार सुपुत्रांचा जीवनपरिचय तसेच त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यावर संस्थेतील शिल्प निदेशक सुरेंद्रसिंघ सुखमणी यांनी पीपीटीच्या माध्यमातून माहिती सादर केली.

मार्गदर्शन करताना ॲड. अमरिकसिंघ वासरीकर म्हणाले की, महान विभूतींच्या बलिदानामुळेच भारत देश घडला आहे. धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी आपले प्राण अर्पण केले असून, त्यांचे स्मरण ठेवून आपल्या जीवनात सत्य, स्वाभिमान व न्यायाची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवली पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राका एस. एम. (शि. नि.) यांनी केले. संस्थेचे प्रभारी गटनिदेशक कलंबरकर एम. जी. यांनी वीर बाल दिवसानिमित्त उपस्थितांना राष्ट्रीय मूल्ये व शौर्य शपथ दिली. सिलेदार डी. के. (शि. नि.) यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता “इतनी शक्ति हमें देना दाता” या प्रेरणादायी गीताने झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

00000



दि. 26 डिसेंबर 2025

 वृत्त क्रमांक 1325

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

नांदेड दि. 26 डिसेंबर : नांदेड जिल्ह्यात 28 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 11 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 28 डिसेंबरचे सकाळी 6 वाजेपासून ते 11 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...