Saturday, May 20, 2023

कौटुंबिक भावनांना सावरत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहूरच्या विकासाला चालना

·     श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- नागपूर येथून माहूर येथे पोहचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागायचे. आजच्या घडीला नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झाले असून माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र माहूर गडावर अबाल वृद्धांसह दिव्यांग व सर्व भक्तांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकाम योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना स्मरत भावनेचा बांध मोकळा केला.

माहूर येथे आज त्यांनी सपत्निक परिवारासह श्री रेणुका देवीची पुजा करून माहूरच्या विकासाला व रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्प श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन केले. माहूर गडाच्या पायथ्याशी या भूमिपूजन समारंभानिमित्त उभारण्यात आलेल्या व्यासपिठावरून ते बोलत होते. यावेळी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर, खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, आमदार राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर , माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी, व्यंकटेश गोजेगावकर, श्री रेणुका देवीसंस्थाचे सर्व सन्माननिय ट्रस्टी सदस्य आदी उपस्थित होते. 

सन 2004 साली एका अपघातात माझ्या पायाला चार फॅक्चर झाले होते. त्यानंतर मी दर्शनाला खुर्ची घेऊन गेलो होतो. आज गडावर मी श्री रेणुकादेवी मातेच्या दर्शनाला पायी गेलो. माझ्या आईला उरत्या वयात गडावर येऊन दर्शन घेणे सोपे नव्हते. भावनेचा हा धागा पकडत त्यांनी लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे भूमिपूजन करतांना माझ्या मनात कृतज्ञतेच्या भावना अधिक असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. 

तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत पर्यटन व अनुषंगिक सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होते. तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी पहिली अट ही स्वच्छतेची असते. शेगाव, शिर्डी, तिरूपती हे तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचे आदर्श मापदंड असून माहूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्यादृष्टिने नावाजले जावे यासाठी नगरपरिषदेने व माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. माहूर येथे वनसंपदा, जैवविविधता आणि सुंदर डोंगराळ भाग असल्याने पर्यटन क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध आहे. माहूरच्या पायथ्याशी मोठा तलावही उपलब्ध आहे. सर्वांच्या प्रयत्नातून याठिकाणी तलावातील पाण्याची पातळी चार मीटर पेक्षा अधिक आपण आणू शकलो तर या विस्तारीत तलावाच्या पाण्यावर प्रवाशी विमानसेवाही आपण उपलब्ध करू असा दुर्दम्य आत्मविश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखविला. या भागाला अनेक जैवविविधता लाभलेली आहे. येथील सत्व लक्षात घेता नगरपरिषदेने रस्त्याच्या दुर्तफा किमान 3 हजार झाडे लावावीत व याचबरोबर माहूर नगरातील प्रत्येक कुटुंबानी किमान तीन तरी झाडे लावावीत, असे कळकळिचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

या भागातील बेरोजगारांच्या हातांना कामे मिळावीत, आव्हानात असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न इतर साधणे मिळावीत, येथील ऐतिहासिक वारसा स्थळाला नव्या पिढीपर्यंत पोहचता यावे ऐवढी साधी मनिषा असून यासाठी मी श्री रेणुका देवीला प्रार्थना केल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

कंत्राटदारांनो काम व्यवस्थित नाही झाले तर केवळ बडतर्फी नसून कठोर कारवाई करू

देशभरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांमध्ये काही ठिकाणी कंत्राटदारांचे अतीशय वाईट अनुभव येतात यात नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या काम करणाऱ्या काही कंत्राटदारांचाही समावेश आहे. नांदेड-किनवट मार्गातील इस्लापूर येथील पुलाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. किनवटचे आमदार भिमराव केराम यांनीही यासंदर्भात जाहीर तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधीत कंत्राटदारांवर बडतर्फीची कारवाई केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. काम व्यवस्थीत झाले नाही तर आम्ही संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची पाऊले उचल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना

रोजगारासाठी पर्यटनाला चालना दिल्याशिवाय पर्याय नाही

- खासदार हेमंत पाटील

किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील बहुसंख्य लोक हे माझ्या मतदारसंघातील आहेत. या भागातील शेती, शेतकरी आणि युवक यांना स्वयंरोजगाराच्या कक्षेत आणण्यासाठी पर्यटन, कृषि पर्यटन व इतर शेतीपुरक उद्योगाशिवाय पर्याय राहिलेला नाही. यादृष्टिने सर्वच पातळ्यांवर एकत्रीत विचारविम्रस होऊन सामुहिक कृतीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले. 

आदिवासी व दुर्गम भास्क लक्षात घेता सुविधांच्या निर्मितीवर भर आवश्यक

- आमदार भिमराव केराम

किनवट, माहूर या भागात चांगल्या रस्त्याची सुविधा अपेक्षित आहे. यादृष्टिने जिल्ह्यातील आदिवासी वाड्यापर्यंत भक्कम रस्त्याचे जाळे अत्यावश्यक आहे. किनवट ते आदिलाबाद, किनवट ते नांदेड (इस्लापूर), उनकेश्वर, हिमायतनगर व विदर्भाला जोडणाऱ्या भक्कम रस्त्याचे जाळे निर्माण करण्याची मागणी आमदार भिमराव केराम यांनी केली. 

प्रारंभी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन निमित्त कोनशिलेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले. श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांना व भूमिपूजन समारंभाला शुभेच्छा दिल्या.

000000

(छायाचित्र : सदा वडजे, नांदेड)









  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...