Friday, November 15, 2019


नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित ;    
ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षणात
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले मार्गदर्शन
          
नांदेड दि. 15 :- नेदरलँड सरकारच्या सहकार्याने नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित बिलोली तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे पोल्ट्री फार्म ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षणात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतीच (गुरुवार 14 नोव्हेंबर) रोजी भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.  
          यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद झडके, बिलोलीचे तहसिलदार विक्रम राजपूत, संस्थेचे संचालक श्री. देशमुख व कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
             या कार्यक्रमाचा भाग म्हणून युरोप खंडातील नेदरलँड् या देशातील "एरिस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेच्या"वतीने नांदेड जिल्ह्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे 4 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. 
          वातावरण बदलाचा शेतीवर होत असलेला अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळावी व शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देता यावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी मार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.
         
"एरिस" या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अनुभवी तज्ज्ञांची टीम मार्गदर्शनाखाली सगरोळी येथे नेदरलँड् शासनाच्या "नफीक" या संस्थेचा व  संस्कृती संवर्धन मंडळाचा  संयुक्त उपक्रमातून प्रथमच या स्वरूपाचे  हे प्रशिक्षण  शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण चार आठवड्याचे असून ते दोन टप्प्यामध्ये घेण्यात येत आहे.
        पहिल्या दोन आठवड्यात ब्रॉयलर व्यवस्थापनाविषयी सखोल प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये जैवसुरक्षा, उन्हाळ्यातील अतिउष्ण तापमानात पक्ष्यांची घ्यावयाची काळजी, खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, तुसाचे व्यवस्थापन, रोगनियंत्रण, लसीकरण व महत्वाच्या बाबींच्या नोंदी ठेवणे इत्यादी विषयांचा समावेश आहे. त्यानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित दोन आठवड्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार असून त्यासाठी सुद्धा याच प्रशिक्षण संस्थेचे तज्ज्ञ भारतात पुन्हा एकदा येऊन पुढील प्रशिक्षण देणार आहेत.
        
या प्रशिक्षणाकरीता 26 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 17 पश्चिम महाराष्ट्रातील 4, उत्तर पूर्व राज्यातील 5  व तेलंगणातील 1  प्रशिक्षणार्थी असून यामध्ये महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी आपापल्या परिसरात तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
         नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी या स्वरूपाचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण असून त्याकरिता नेदरलँड शासनाचे सहकार्य  मिळविण्यासाठी संस्थेचे संचालक रोहित देशमुख व कृषि विज्ञान केंद्राचे प्रा.व्यंकट शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. हे प्रशिक्षण यशस्वी व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सहकार्यही मिळत आहे.
000000



राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान “कौमी एकता सप्ताह 
नांदेड, दि. 15 : केंद्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान “कौमी एकता सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या काळात अनुक्रमे राष्ट्रीय एकात्मता दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, ध्वजदिन तसेच दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन आणि जोपासना दिवस साजरे होणार असून त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
१९ नोव्हेंबर रोजी शासनाच्या विविध कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर आठवडाभर दुर्बल घटकतील व्यक्तींना इंदिरा आवास योजना आणि घरांचे वाटप, भूमिहीन मजुरांना जमिनीचे वाटप, गरिबांना कायदेविषयक सहाय्य देणे, चर्चा संमेलने, मिरवणुका आणि सभा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कौमी एकता सप्ताहामध्ये “सांप्रदायिक सद्भावना मोहीम निधी संकलन सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शासनाने केले आहे. हे शासन परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00000

केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण  
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सुधारीत दौरा
           नांदेड दि. 15 :- केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे शनिवार 16 नोव्हेंबर 2019 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
         शनिवार 16 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 9 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.15 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे सदिच्छा भेट. सकाळी 11 वा. रेणूकाई कार्डिऑक केअरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वा. जिल्हा पदाधिकारी समवेत बैठक. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण व राखीव. सायं 4.40 वा. नंदीग्राम एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात
बिरसामुंडा यांची जयंती साजरी
           नांदेड दि. 15 :- बिरसामुंडा यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात आज बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.  
000000



बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती रॅली संपन्न  
नांदेड दि. 15 :- बालकामगार प्रथे विरुद्ध नांदेड मुख्य बाजारपेठेत सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड कार्यालयाच्यावतीने आयोजित रॅलीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखवून महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रारंभ केला.
ही रॅली गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी पुतळ्यापासून मार्गस्थ होऊन महावीर चौक, वजिराबाद बाजारपेठ ते बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सांगता झाली. रॅलीच्या प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्यावतीने पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीत उपजिल्हाधिकारी श्रीमती देवकुळे, नायब तहसिलदार श्रीमती मोपडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेखा काळम, सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन सय्यद, सरकारी कामगार अधिकारी अ.अ.देशमुख  व निरिक्षक श्रीकांत भंडारवार यांचा सहभाग होता.
रॅलीचे मुख्य आयोजन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यालयाच्यावतीने दिनांक 7 नोव्हेंबर पासून 7 डिसेंबर 2019 या कलावधीत नांदेड जिल्ह्यात बालकामगार प्रथेविरुद्ध विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन सय्यद यांनी सांगून आभार मानले तर सूत्रसंचालन अॅड. विष्णु गोडबोले यांनी केले.
रॅलीत गुजराती शाळा, होलिसिटी शाळा व आंध्रा शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांचा  मोठ्या प्रमाणात सहभाग होता.  अशोक कांबळे, शैलेश जुगदार, परिवार प्रतिष्ठान नांदेडचे डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर तसेच नवजीवन बहूउदेशीय संस्थेच्या श्रीमती अपर्णा सावळे आणि रमेश सावळे, श्रीमती कल्पना  राठोड यांचाही सहभाग होता.  
000000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...