Wednesday, October 18, 2017

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा
नांदेड, दि. 18 :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तथा जहाजबांधणी, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी हे सोमवार 23 ऑक्टोंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 23 ऑक्टोंबर 2017 रोजी नागपूर येथुन मोटारीने सकाळी 10 वा. रेणुका देवी मंदिर माहूर येथे आगमन. सकाळी 10.30 ते 11.15 वाजेपर्यंत रेणुका देवी मंदिर येथे दर्शनासाठी राखीव. सकाळी 11.15 वा. रेणुका देवी मंदिर येथुन मोटारीने माहूर येथील कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. सकाळी 11.20 वा. माहूर येथील कार्यक्रमस्थळी आगमन. सकाळी 11.30 वा. माहूर येथील राष्ट्रीय महामार्ग व केंद्रीय मार्गनिधीतील प्रस्तावित कामांच्या भुमीपुजन समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे राखीव. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथुन मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000
 सैन्य, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी
अनुसूचित जाती, नवबौध्द युवकांना संधी
26 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथे निवड शिबिर
नांदेड दि. 18 :- अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील युवकांसाठी अमरावती येथे आयोजित सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी गुरुवार 26 ऑक्टोंबर 2017 रोजी नांदेड जिल्हयातील उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ईच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्य आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केलेले आहे.
            सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना सैन्य व पोलीसमध्ये भरती करण्याकरिता भरतीपुर्व प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे होणार आहे. प्रशिक्षणार्थी पैकी 30 टक्के महिला व 70 टक्के प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य व भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी पात्रतेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे असावे. उमेदवाराची पुरुष उंची 165 से.मी व महिला उंची 155 से.मी. छाती न फुगवता पुरुष 79 से.मी. (फुगवुन 84 से.मी. ) असावी. शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी पास. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातील नोंदणी आणि ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार हा शारिरीक व मानसिक दृष्टया निरोगी असावा.
            प्रशिक्षणाच्या निवडीसाठी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतीनी गुरुवार 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या समोर नमस्कार चौक नांदेड येथे मुळ कागदपत्र व साक्षांकित प्रतींसह उपस्थित रहावे. उमेदवारांना जाण्या-येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

                                                                  00000
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीचा शुभारंभ संपन्न
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण
नांदेड, दि. 18 :- दिपावळीच्या शुभ मुर्हतावर बळीराजाला दिवाळीची भेट म्हणून राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करुन दिवाळी गोड केली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. ते जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी  आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. खोतकर म्हणाले की, निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे त्यांना बँकांचे कर्ज फेडण्यास तसेच नव्याने कर्ज घेण्यास अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. अनेक वर्ष तो कर्जाच्या ओझ्याखाली राहतो. त्यामुळे सन 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याबाबीकडे लक्ष वेधले व एकमताने शेतकऱ्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी कर्जमाफीचे नियोजन करण्याबाबत ठरविले. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दि. 5 एप्रिल 2017 रोजी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असे सांगितले व आज मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते या योजनेचा राज्यस्तरावरील शुभारंभ मुंबई येथे होत आहे. संपुर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लाखो पात्र शेतकरी लाभार्थ्यांना कर्जमाफीबाबतचे तसेच कर्ज भरलेल्यांना प्रोत्साहनपर लाभ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे.  शेतकरी देशाच्या कणा असून त्यांच्या कष्टामुळे देशातील अन्न-धान्याचे गोदाम भरुन आहेत.  यापुढे शेतकऱ्यांचा सात / बारा कोरा करुन संपुर्ण कर्जमाफी करण्यासाठी प्रयत्न सुरु राहतील.
यावेळी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 25 शेतकरी बांधवांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांना कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभ मिळवुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपबिनंधक कार्यालय, राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याबाबत पालकमंत्री श्री. खोतकर यांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेमध्ये 1 एप्रिल 2009 नंतर  कर्ज घेतलेले व 30 जुलै 2016 अखेर थकबाकीदार असलेले 1 लाख 50 हजार रुपयाच्या मर्यादीपर्यंतचे सर्व पीक कर्ज व मध्यम मुदती कर्जमाफी झाली. एक लाख 50 हजारावरील थकबाकी असलेले सुद्धा सर्व शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत. मात्र त्यांनी 1 लाख 50 हजारावरील रक्कम दि. 31 डिसेंबर 2017 पुर्वी भरणे आवश्यक आहे. जे शेतकरी नियमित परतफेड करणारे आहेत ते सुद्धा प्रोत्साहनपर रक्कमेस पात्र असून त्यांनी जर सन 2015-16 मध्ये कर्ज घेऊन मुदतीत परतफेड केली असल्यास परतफेड रक्कमेच्या 25% किंवा रुपये 25 हजार यापैकी जी कमी रक्कम ती प्रोत्सहान म्हणुन देण्यात येणार. या योजनेमध्ये ज्यांचे कर्ज दि. 1 एप्रिल 2009 नंतर पुर्नगठीत करण्यात आलेले आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. तसेच एका कुटुंबास रुपये 1 लाख 50 हजार पर्यंतचा लाभ देण्यात येणार.  कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफी झाल्याबाबत प्रमाणपत्राचे वितरण राज्यस्तरीय समारंभ कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी ऑनलाईन दाखविण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी केले व आभार जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले. या कार्यक्रमास लाभार्थी शेतकरी परिवार, कर्मचारी व अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.            
  000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...