Saturday, December 29, 2018


झारखंड राज्य अल्पसंख्याक आयोगाचे
उपाध्यक्ष सरदार गुरविंदर सिंघ सेठी यांचा दौरा

नांदेड, दि. 29 :-  झारखंड राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष सरदार गुरविंदर सिंघ सेठी हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 30 डिसेंबर रोजी पुणे येथून रेल्वेने सकाळी 9.25 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 11 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम.  
सोमवार 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. नांदेड येथून रेल्वेने पुणेकडे प्रयाण करतील.
00000




कृषि पणन मंडळाची  
आंतरराज्य शेतमाल व्यापार-रस्ते
वाहतुक अनुदान योजना

नांदेड, दि. 29 :-   राज्यात शेतमालाच्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी राज्य कृषि पणन मंडळामार्फत रस्ते वाहतूक अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेत 9 ऑक्टोंबर पासून पुढील सहा महिने कालावधीत देशांतर्गत रस्ते वाहतूक भाड्यामध्ये अनुदान देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे राहतील. महाराष्ट्रातून रस्तेवाहतूकीद्वारे परराज्यात शेतमाल वाहतूक करुन प्रत्यक्ष विक्री करण्यात येणाऱ्या व्यवहारासाठी लागू राहील. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी पात्र असतील. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांच्या सभासदांनी स्वत: उत्पादित केलेला शेतमालच संबंधीत राज्यामध्ये पाठविणे आवश्यक असून कामकाज  सुरु करण्यापुर्वी संस्थेने पणन मंडळाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. ही योजना आंबा, केळी, डाळींब, द्राक्षे, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आलू व भाजीपाला पिकांसाठी लागू राहील. या शेतमाला व्यतिरिक्त शेतमाल परराज्यात विक्री करावयाचा झाल्यास त्यास पणन मंडळाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. या योजनेत रस्तेमार्गे प्रत्यक्ष वाहतूक होणाऱ्या शेतमालावर अनुदान देय राहील यामध्ये इतर कोणत्याही अनुषंगिक खर्चाचा अंतर्भाव असणार नाही तसेच शेतमाल प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतर अनुदान देय राहील.
प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या अंतरानुसार किमान 750 ते 1 हजार किमी अंतरापर्यंत वाहतूक खर्चाच्या 50 टक्के अथवा कमाल मर्यादा 30 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम देय अनुदान राहील.  एक हजार 1 ते एक हजार 500 किमी पर्यंत- वाहतूक खर्चाच्या 50 टक्के अथवा कमाल मर्यादा 40 हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम. 1 हजार 501 ते 2 हजार किमी पर्यंत वाहतूक खर्चाच्या 50 टक्के अथवा कमाल मर्यादा 50 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. दोन हजार एक किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वाहतूक खर्चाच्या 50 टक्के अथवा कमाल मर्यादा 60 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. सिक्कीम, आसाम, अरुणाचलप्रदेश, नागालॅड, मणिपूर, मिझोराम, मेघालय व त्रिपुरा या राज्यासाठी वाहतूक खर्चाच्या 50 टक्के अथवा कमाल मर्यादा 75 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम देय अनुदान राहील.
राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात शेतमाल नियमीतपणे लगतच्या परराज्यात जात असल्याने अपरंपरागत व दुरवरील बाजारपेठांमध्ये शेतमाल पाठविणे अर्थक्षम होण्याच्यादृष्टीने 750 किमी पेक्षा कमी अंतरावरील वाहतूकीस कोणतेही अनुदान देय असणार नाही. या योजनेंतर्गत एका लाभार्थी शेतमाल उत्पादक सहकारी संस्था, उत्पादक कंपनीस योजना कालावधीसाठी कमाल 6 वेळा वाहतूक अनुदान देय असेल. या योजनेंतर्गत बिगर कृषिमालाचे वाहतुकीस अनुदान देय असणार नाही. शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थेस वाहतूकदारास देय असलेली वाहतूक भाड्याची रक्कम धनादेश, आरटीजीएस, ऑनलाईन बँकींगद्वारे अदा करणे बंधनकारक राहील. शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थेकडून पाठविण्यात आलेल्या कृषिमालाची प्राप्त विक्री रक्कम प्रत्यक्ष सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यानंतर वाहतूक अनुदानासाठी अर्ज करु शकतील.
शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थेकडून पाठविण्यात आलेल्या कृषिमालाला गुणवत्ते अभावी अथवा अन्य कारणामुळे विक्री रक्कम प्राप्त न झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ जबाबदार असणार नाही तसेच या प्रकरणी वाहतूक अनुदान देय असणार नाही. अनुदान संपूर्णपणे नामंजूर, अंशत: मंजूर अथवा पूर्णपणे मंजूर करण्याचे सर्वाधिकार राज्य कृषि पणन मंडळास राहतील व तो निर्णय संबंधित अर्जदारावर बंधनकारक असेल. तसेच योजनेच्या अटी, शर्तीमध्ये उचित बदल करण्याचे अधिकार पणन मंडळास राहतील. संबंधीत संस्था, कंपनी यांनी या योजनेंतर्गत परराज्यात पाठविण्यात आलेल्या वाहतूक खर्चाचे अनुदान मागणी प्रस्ताव माल विक्री नंतर 30 दिवसात आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय कार्यालयाकडे सादर करावेत. या योजनेचा जास्तीतजास्त लाभ राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था यांनी घ्यावा, असे आवाहन राज्य कृषि पणन मंडळ पुणे यांनी केले आहे.
0000000

गुटखा, पानमसाला तत्सम पदार्थाची
विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई

नांदेड, दि. 29 :- अन्न व औषध प्रशासन, तंबाखू नियंत्रण विभाग, स्थानिक गुन्हे शाखा यांनी नुकतेच नांदेड शहरातील विविध पानस्टॉल यांच्यावर कार्यवाही करुन बंदी असलेला गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थ जप्त केली आहेत. प्रतिबंधीत अन्न पदार्थांची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध नियमित कार्यवाही होणार असून अन्नपदार्थ छुप्प्या, चोरट्या पद्धतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन नांदेड यांनी केले आहे.
यात रियाज सौदागर पान  शॉप शिवाजीनगर, गोदावरी पान शॉप आयटीआय कॉर्नर, नटराज पान शॉप शिवाजीनगर, गुरु डिलक्स पान शॉप वर्कशॉप व सावजी पान शॉप वजिराबाद नांदेड यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, सुगंधित तंबाखू आदी 23 हजार 390 रुपयाचा साठा, सुगंधित तंबाखू व इतर पानमसाला पदार्थ वापरुन त्यांचे मिक्चर बनविण्यासाठीची मशिन जप्त केली आहे. या प्रकरणी संबंधित पान शॉपचे शेख रमजाने, चंद्रकांत माने, मोहमद इमरान, एजाज खान व सुरेश साहू यांचे विरुद्ध भाग्यनगर, शिवाजीनगर व वजिराबाद पोलीस स्टेशन नांदेड येथे अन्न सुरक्षा कायदा व भादवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालायात गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास अजीवन तुरुंगवास आणि 10 लाख रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. या संयुक्त कार्यवाहीत अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कावळे, तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉ. शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. परदेशी, खाडे व नमुना सहायक बालाजी सोनटक्के यांनी सहभाग नोंदवला.
000000

Friday, December 28, 2018

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..!
बुधवारी ‘लोकसंवाद’
मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

नांदेडदि. 28 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थीआणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.
हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याdevendra.fadnavis या फेसबुक पेजवर, DevFadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणिDevendra.Fadanavis या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणिyoutube.com/maharashtradgipr यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण)उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाप्रधानमंत्री पीक विमा योजनामागेल त्याला शेततळेगाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवारस्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनासूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे.
0000

प्रेस नोट


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणूक 2018
मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडल्‍याबाबत.  

जिल्‍हाधिकारी, नांदेड यांची अधिसूचना दिनांक-26 नोव्‍हेंबर 2018 अन्‍वये नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूकीसाठी जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार  दिनांक 28 डिसेंबर 2018 शुक्रवार रोजी नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्‍ह्यातील एकुण 71 मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. निवडणुकी दरम्‍यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सदर निवडणूकीसाठी एकुण 26 मतदार निवडणूक लढवित आहेत. एकुण 12 हजार 714 मतदार होते. सर्वात जास्‍त 8 हजार 207 मतदार नांदेड जिल्‍ह्यात होते तर सर्वात कमी मतदार कमी 4 मतदार  उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात होते. एकुण मतदानाच्‍या 72.51 टक्‍के एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. संपुर्ण मतदार क्षेत्रामध्‍ये एकुण 9 हजार 220 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला, त्‍यामध्‍ये 4 हजार 888 पुरुष मतदार होते तर 4 हजार 332 स्‍त्री मतदार होते.
संपुर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व प्राधिकृत अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी हाताळली. नांदेड जिल्‍ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्‍ताच्‍या उपाययोजना नांदेड जिल्‍हा पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी व अतिरीक्‍त जिल्‍हा पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे  यांनी केल्‍या.  
नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्‍ह्यातील जिल्‍हाधिकारी, अपर जिल्‍हाधिकारी, पोलीस आयुक्‍त, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, अतिरीक्‍त पोलीस अधिक्षक, समन्‍वय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी यांनी काम केले. संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी क्षेत्रिय अधिकारी म्‍हणून काम पाहिले. उपरोक्‍त सर्व अधिकारी व त्‍यांच्‍या अधिनस्‍थ कर्मचारी यांनी निवडणूकीच्‍या कामांचे सुव्‍यवस्थित नियोजन व प्रत्‍यक्षात अंमलबजावणी करुन  मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्‍यात योगदान दिले.
या निवडणूकीची मतमोजणी सर्व तहसिल कार्यालयांच्‍या ठिकाणी व नांदेड तालुक्‍यात बहुउद्देशीय सभागृह, शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे शनिवार 29 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वाजेपासून होणार आहे. तसेच सोमवार 31 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मतमोजणी संकलन व तीन सदस्‍यांच्‍या निवडणूकीचा निकाल घोषित होणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍यावतीने कळविले आहे.
000000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू

नांदेड, दि. 28 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 डिसेंबर 2018 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 जानेवारी 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.  
00000


नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍पांतर्गत
नांदेड जिल्‍हयात दुसऱ्या टप्‍यात 215 गावांची निवड
सोमवार 31 डिसेंबर रोजी एकदिवसीय प्रशिक्षण
नांदेड, दि. 28 :-  गावातील लहान शेतकऱ्यांना बदलत्‍या हवामानाला जुळवुन घेण्‍यास सक्षम करणे व शेती व्‍यवसाय किफायतशिर करण्‍यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या अतंर्गत नांदेड जिल्‍हयात दुसऱ्या टप्‍यात 215 गावांची निवड करण्‍यात आली आहे.
प्रथम टप्‍यात निवडण्‍यात आलेल्‍या 70 गावात प्रकल्‍प राबविण्‍यास सुरवात झाली आहे. दुसऱ्या टप्‍यात निवडण्यात आलेल्‍या गावात अमंलबजावणीसाठी सोमवार 31 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सरपंच, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व ग्रामसेवक यांचे जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे  एकदिवसीय प्रशिक्षण आयोजीत करण्‍यात आले आहे. या प्रशिणास सर्व संबधित गावाचे  सरपंच, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे  यांनी केले.
या प्रकल्‍पातंर्गत   वैयक्‍तीक लाभार्थीसाठी फळबाग, शेडनेट, बंदिस्‍त शेळीपालन, कुकूटपालन, मधुमक्षीका पालन, शेततळे, शेततळे अस्‍तरीकरण इत्‍यादी बाबींचा समावेश असून सामुदाईक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची कामे, शेतकरी गट व शेतकरी उत्‍पादक कंपनी यांचेसाठी प्रकल्‍प आधारीत अनुदान देण्‍यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी गावस्‍तरावर ग्रामस्‍तरीय समितीची स्‍थापना करण्‍यात येणार असुन समितीने गावातील योजना राबवावयाची आहे.
            सोमवार 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या एक दिवशीय प्रशिक्षणास जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे  तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍पाचे मार्गदर्शक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
000000


पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात
27 उमेदवाराची प्राथमिक निवड

नांदेड, दि. 28 :-  जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड महात्मा फूले मंगल कार्यालय फुले मार्केट आय.टी.आय. जवळ नांदेड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या मेळाव्यात 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यास प्रमूख पाहूणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जी. पी. दुम्पलवार तर अध्यक्षस्थानी रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान उपस्थित होते.
 आयटीआय उत्तीर्ण असलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यास ओळखले पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वत:चा विकास रु घेतला पाहिजे. स्थानीक नोकरीच्या मागे लागता बाहेर गावी जावून नोकरी करावे असे प्रमुख पाहुण्याने आवाहन केले. सध्या शासकीय नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकरीस मोठया प्रमाणात वाव आहे. बेरोजगारानी आलेल्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खाजगी उद्योगात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आसल्यामुळे बेरोजगाराला आपल्या उदरनिर्रवाहासाठी उत्तम उपाय आहे. असे श्री. सकवान यांनी  उपस्थित बेरोजगारांना सुचविले.
यावेळी कंपनीचे अधिकारी आपआपल्या कंपनीतील भरावयाच्या पदासंबधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. टेनि, ऑपरेटर, एटियम ऑपरेटर, सिटीबायकर, ऑफीसर रिपोर्टस, ऑफीसर कॉल सेंटर,ड्रायव्हर,या पदाची भरती करण्यात आली असून 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले. मेळाव्यास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
00000



पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात
27 उमेदवाराची प्राथमिक निवड

नांदेड, दि. 28 :-  जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड महात्मा फूले मंगल कार्यालय फुले मार्केट आय.टी.आय. जवळ नांदेड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या मेळाव्यात 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यास प्रमूख पाहूणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जी. पी. दुम्पलवार तर अध्यक्षस्थानी रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान उपस्थित होते.
 आयटीआय उत्तीर्ण असलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यास ओळखले पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वत:चा विकास रु घेतला पाहिजे. स्थानीक नोकरीच्या मागे लागता बाहेर गावी जावून नोकरी करावे असे प्रमुख पाहुण्याने आवाहन केले. सध्या शासकीय नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकरीस मोठया प्रमाणात वाव आहे. बेरोजगारानी आलेल्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खाजगी उद्योगात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आसल्यामुळे बेरोजगाराला आपल्या उदरनिर्रवाहासाठी उत्तम उपाय आहे. असे श्री. सकवान यांनी  उपस्थित बेरोजगारांना सुचविले.
यावेळी कंपनीचे अधिकारी आपआपल्या कंपनीतील भरावयाच्या पदासंबधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. टेनि, ऑपरेटर, एटियम ऑपरेटर, सिटीबायकर, ऑफीसर रिपोर्टस, ऑफीसर कॉल सेंटर,ड्रायव्हर,या पदाची भरती करण्यात आली असून 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले. मेळाव्यास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
00000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...