Friday, November 27, 2020

 

फौजदारी प्रक्रिया संहितानुसार

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्‍यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, लोहा, कंधार, नांदेड अर्धापूर या 16 तालुक्यातील 123 मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रांतर्गत नियुक्त 54 क्षेत्रिय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्र हद्दीपर्यंत 27 नोव्हेंबर 2020 रोजी 6 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. अशाप्रकारे नियुक्‍त विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्‍त संहितचे कलम 129, 133, 143 व 144 खाली अधिकार प्रदान केले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 27 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केले आहेत.

000000

 

 

68 कोरोना बाधितांची भर तर    

59 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- शनिवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 68 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 49 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 19 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 59 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या एकुण 1 हजार 630 अहवालापैकी  1 हजार 521 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  20 हजार 264 एवढी झाली असून यातील  19  हजार 109 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 416 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आज प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 547 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 37, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 11, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1 असे एकूण 59 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.30 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 34, देगलूर तालुक्यात 1, लोहा 2, जळगाव 1, पटना बिहार 8, ग्वाल्हेर मध्यप्रदेश 1, दिल्ली 2 असे एकुण 49 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 8, कंधार तालुक्यात 5, मुखेड 1, हिंगोली 2, हदगाव 1, किनवट 1, परभणी 1 असे एकुण 19 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 416 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 45, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 18, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरण 123, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 108, खाजगी रुग्णालय 44 आहेत.  

शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 46 हजार 958

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 22 हजार 571

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 264

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 109

एकूण मृत्यू संख्या- 547

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.30 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-15

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-611

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-416

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

 

जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने

29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत बंद 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणुकीदरम्यान नांदेड जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढीलप्रमाणे बंद राहतील, असे आदेश निर्गमीत केले आहे. 

जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर रविवार 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस सोमवार 30 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण दिवस तर मतदानाचा दिवस मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

00000

 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सुचना 

नांदेड (जिमाका) दि. 27 :-05-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार मतदान होणार असून भारत निवडणुक आयोगाने मत नोंदविण्यासाठी मतदारांना आवश्यक त्या सुचना निर्गमीत केल्या आहेत.

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना

मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन यांचा वापर करु नये. ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात 1 हा अंक नमूद करुन मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी 1 हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार पसंतीक्रम (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करु नये. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I,II,III इत्यादी किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसूचितील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदविता येतील. मतपत्रिकेवर तुमीच स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर () किंवा (×) अशी खुण करु नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर 1 हा अंक नमूद करुन तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदारांनी मतदान करतांना या सूचनांचे पालन करुन आपले मतदान अवैध ठरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 5- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ यांनी  केले आहे.

000000

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे 1 डिसेंबरला मतदान

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक- 2020 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर  झाला आहे. नांदेड जिल्‍ह्यातील एकूण 123 मतदान केंद्रांवर  1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 

नांदेड जिल्‍ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी  5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक- 2020 साठी त्यांच्या मतदान केंद्रावर  1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान करावे, असे आवाहन  जिल्‍हाधिकारी नांदेड तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 5- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ यांनी  केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...