Monday, February 28, 2022

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे

 नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 711 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 757 एवढी झाली असून यातील 1 लाख 42 हजार रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2, असे एकुण 2 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 12, खाजगी रुग्णालय 2 असे एकुण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 76 हजार 470

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 56 हजार 776

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 757

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 42

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-25

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत सर्व शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी येथे तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूपासून होणाऱ्या वाईट परिणामाची माहिती देण्यात आली. यात खाजगी शिकवणी वर्गात मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता. यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, खाजगी शिकवणी असोसिएशन आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांनी एकत्रित काम केले आहे. 

किशोरवयीन आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाच्या प्रमाणाबाबत मागील आठवड्यात राज्यासाठीचा अहवाल प्रसिध्द झाला. त्यामध्ये लहान वयोगटात तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त असल्याने सर्व शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्ग येथे तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले होते. 

शैक्षणिक संस्थेमध्ये आणि शैक्षणिक संस्थेच्या 300 फूट अंतरामध्ये कोणत्याही प्रकारे तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ, पानमसाला, गुटखा इत्यादीचे सेवन अथवा विक्री किंवा धुम्रपान करण्यास बंदी आहे. यांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व विभाग आणि सर्व स्तरातून पुढे यावे, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या

विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण 

नांदेड (जिमाका) दि. 28  :-  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. 

विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण न देण्याची तरतूद आहे. परंतु कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2021-22 या वर्षी इयत्ता 10 वीच्या परीक्षेला बसणाऱ्या  विद्यार्थ्यांना सन 2020-21 या वर्षी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला श्रेणीच्या आधारे, त्यांना सन 2021-22 या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. हा निर्णय फक्त सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापुरता लागू राहील  यांची सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी , पालक व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी,  असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

000000

 दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण 

नांदेड (जिमाका) दि. 28  :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहेत. कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2021-22 या वर्षात इयत्ता 10 वीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा इयत्ता सातवी व आठवीतील क्रीडा स्पर्धेतील सहभागाचा विचार केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांस सन 2021-22 साठी सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येतील. ही सवलत केवळ सन 2021-22 वर्षाच्या परीक्षेसाठी देय राहील, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.  

000000

 पाचवी ते आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या

विद्यार्थी ऑनलाईन नाव नोंदणीला मुदतवाढ    

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळात नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले नाव नोंदणीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यास गुरुवार 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी प्रवेश अर्ज स्विकारण्याचा 1 ते 28 फेब्रुवारी 2022 हा कालावधीत निश्चित करण्यात आला होता. हा कालावधी संपुष्टात आला आहे. ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास ही मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.  

बुधवार 2 मार्च ते सोमवार 4 एप्रिल 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क शाळेमध्ये जमा करावे. गुरुवार 7 एप्रिल 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. विद्यार्थ्यांनी वरील नमूद कालावधीत मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. 5 वी व आठवीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

000000

 गोरगरीबांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात

यासाठीच नांदेड येथे शैक्षणिक संस्था उभारण्यावर भर  

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·   नांदेड येथे नर्सिंग कॉलेजच्या शुभारंभासह

  इतर सहा प्रकल्पांचे भूमिपूजन-लोकार्पण

·  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती

·  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा 

          

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेडच्या शिक्षण क्षेत्राला भक्कम पायावर उभे करण्याचा ध्यास घेण्यापाठीमागे स्व. शंकरराव चव्हाण यांची दूरदृष्टि आहे. त्याकाळी नांदेडची गरज ओळखून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयासह इतर शैक्षणिक संस्थाही सुरू करण्याबाबत विचार केला होता. तथापि यात इथल्या गोर-गरीब बहुजन वर्गातील मुलांना खाजगी संस्थांमध्ये शिक्षण घेणे परवडणार नाही, त्यांना शिक्षणाच्या संधी मिळणार नाहीत हे लक्षात घेऊनच ज्या काही शैक्षणिक शासकीय संस्था येथे आणता येतील, उपलब्ध करून देता येतील त्यावर प्राधान्याने आम्ही भर दिला. यातूनच शिक्षणाच्यादृष्टिने नांदेड हे महत्वाचे केंद्र साकारू शकले, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

नांदेडच्या शैक्षणिक सेवा-सुविधांना अधिक भक्कम करणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुल, शासकीय अध्यापक महाविद्यालय इमारत, शंभर प्रवेश क्षमता असलेल्या मुलींचे वसतीगृह इमारतीचे भूमिपूजन, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बीएससी नर्सींग कॉलेज शुभारंभ, प्रशासकीय व ग्रंथालय इमारतीच्या आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण कामांच्या शुभारंभ, धनगरवाडी येथील दोनशे क्षमतेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदींची उपस्थिती होती. 

आज भूमिपूजन झालेल्या विविध शैक्षणिक प्रकल्पासाठी वर्षभरापासून नियोजन सुरू होते. उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सर्व प्रक्रिया तत्पर पूर्ण करून दिली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील विविध प्रकल्पांसाठी भरीव पाठिंबा दिल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले. विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू राहिली पाहिजे. कालागणिक यात बदलही झाले पाहिजेत. जनतेच्या कल्याणासाठी याचे उत्तरदायित्व असते. हे लक्षात घेता आजवर कोणत्याही विकासाच्या कामात मी राजकारण आणले नाही, आणत नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करून त्यांनी विकास प्रक्रियेच्या सर्व समावेशक योगदानाला अधोरेखीत केले. 

वाढत्या नांदेड महानगराच्या गरजांना लक्षात घेऊन येथील वैद्यकीय सेवा-सुविधाही भक्कम असल्या पाहिजेत यावर आमचा भर आहे. सर्वसामान्य लोकांना विविध आजारांवरील उपचार परवडले पाहिजेत.आजही कॅन्सरवरील उपचारासाठी, न्युरॉलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी सारख्या आजारांवर उपचाराच्या चांगल्या सुविधा आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. वैद्यकीय क्षेत्रात स्टाफ-नर्सेसची अत्यावश्यकता आपण कोरोनाच्या काळात अनुभवलेली आहे. या भागातील विद्यार्थी व विद्यार्थींनींना या क्षेत्रातले चांगले शिक्षण मिळावे यासाठी शासकीय परिचारीका महाविद्यालयाची उपलब्धी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॉमा केअर सेंटर, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, फिजीओ थेरपी यासह रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाची नितांत आवश्यकता आहे. एका बाजुला शैक्षणिक सेवा-सुविधा भक्कम करीत असतांना त्यांची स्वच्छता आणि निगा ही तेवढीच महत्वाची आहे. यासाठी पर्यायी विचार करून जबाबदार संस्थांना ही कामे सोपविली पाहिजेत, असेही त्यांनी स्‍पष्ट केले. 

नांदेडच्या या वैभवासाठी व विविध शैक्षणिक संस्थांसाठी विष्णुपूरी येथील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान याची तुलना करता येणार नाही. आज त्यांच्या योगदानामुळेच हे सर्व प्रकल्प साकारू शकले, असे सांगून त्यांनी विष्णुपुरीच्या भूमिपूत्रांबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. 

समृद्ध शैक्षणिक साहित्य परंपरेसह नांदेडला

परिपक्व राजकीय कार्यसंस्कृतीचाही वारसा

-         उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 

मराठवाड्याच्या एका काठावर असूनही नांदेड जिल्ह्याला एक समृद्ध शैक्षणिक-साहित्यिक वारसा लाभलेला आहे. शिक्षणाचा यशस्वी नांदेड पॅटर्न म्हणूनही आम्ही या जिल्ह्याकडे पाहतो. या साऱ्या वैभवासह या जिल्ह्याला माजी केंद्रीय गृह मंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी एक समृद्ध आणि परिपक्व राजकीय संस्कृती दिली आहे. याचा वारसा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समर्थपणे सांभाळून सर्वसामान्यांच्या विकास कामांचा नवामापदंड निर्माण केला आहे, या शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गौरव केला. मराठी भाषा संवर्धनासाठी आणि वाचन चळवळ अधिक रुजावी, वाढावी यादृष्टिकोणातून नांदेड येथे सर्वात चांगले मध्यवर्ती ग्रंथालय उभे राहील यासाठी सर्वतोपरी मदत करू असे त्यांनी जाहीर केले. 

शिक्षणाचे प्रवाह हे मातृभाषेतून विकसित होतात. मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राष्ट्रभाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपले सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. कालच आपण साजऱ्या केलेल्या मराठी भाषा दिनाच्या औचित्याने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची घोषणा होईल अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. आता याची अधिक प्रतिक्षा न करता आम्ही महाराष्ट्रात स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ साकारू असे त्यांनी जाहीर केले. नांदेड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मी मागच्यावेळेस भेट देऊन पाहणी केली होती. येथील सर्व सुविधा, वास्तुरचना पाहून मलाही रत्नागिरीमध्ये असे महाविद्यालय का असू नये असे वाटले. मी त्यादृष्टिने प्रयत्न सुरू केले व आता तेथेही असे महाविद्यालय साकारले जात आहे. नांदेड मधील प्रत्येक पॅटर्न कोकणासाठीही आवश्यक असून जी विकास कामे पालकमंत्री या नात्याने अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये घेतली तशीच कामे आम्ही रत्नागीरीतही पूर्ण करीत असल्याचे त्यांनी निसंकोचपणे सांगितले. कोकणासाठीही सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने अशोक चव्हाण यांनी मदत केली आहे. तेथे समुद्र किनाऱ्यावर गावे अधिक आहेत. तेथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी 275 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. 

स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे असलेल्या सर्व सोई-सुविधायुक्त स्वतंत्र अभ्यासिकेच्या व इतर शैक्षणिक कामांचे भूमिपूजन करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे. विशेषत: आपले राजकीय ज्येष्ठत्व बाजुला सारून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मला व आमच्या सहकाऱ्यांना पुढे केले. या सर्व भूमिपूजन समारंभास उपस्थित राहणे हे मी माझ्या राजकीय जीवनातील एक महत्वपूर्ण योगायोग असल्याचे प्रतीक समजतो, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. 

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांची समयोचित भाषणे झाली.

000000

















 हिमायतनगर, माहूर येथे पक्के अनुज्ञप्ती चाचणी शिबीर

·         कोरोना लस प्रमाणपत्र आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 28:- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने मार्च 2022 मध्ये हिमायतनगर येथे 16 मार्च व माहूर येथे 22 मार्च 2022 रोजी पक्के अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनांकामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो. या शिबिरासाठी 2 मार्च 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अपॉटमेंट खुल्या होतील. सर्व अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह शिबिरास उपस्थित राहावेअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

0000

Sunday, February 27, 2022

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 4 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 910 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणी द्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 756 एवढी झाली असून यातील 1 लाख 40 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून यात 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.  

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 690 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, किनवट 1 तर अँटिजेन तपासणी द्वारे मुखेड येथे 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहे. आज नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 2 असे एकुण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 75 हजार 759

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 56 हजार 71

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 756

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 40

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 690

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...