Saturday, November 28, 2020

 

मुख्यालयी अथवा कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या  

अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सर्वसामान्य नागरिकांची व शासकिय कामे वेळच्यावेळी पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष असले पाहिजे. जिल्ह्यातील विविध प्रशासकिय विभागातील काही अधिकारी, कर्मचारी आपल्या कार्यालयात अथवा मुख्यालयी हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जे कर्मचारी / अधिकारी शासकिय कामात टाळाटाळ करीत आहेत अथवा कार्यालय सोडून बाहेर थांबतात अशांविरुद्ध शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहेत. 

सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या व मुख्यालयी न थांबणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासन परिपत्रक क्रमांक सिडीआर-1300/प्र.क्र.9/00/11 दिनांक 17 ऑगस्ट 2000 अन्वये शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जे अधिकारी, कर्मचारी विनापरवानगीने कार्यालयात गैरहजर राहिल्यास अथवा विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्याची तरतुद केली आहे. 

याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम 1979 मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांने नेहमीच कर्तव्य परायनता ठेवावी आणि शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल अशा कोणत्याही गोष्टी करता कामा नयेत, असा स्पष्ट उल्लेख करुन प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीवही करुन दिली आहे. 

शासनाच्या या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहून शासकीय, नागरिकांची कामे पार पाडावीत, असे स्पष्ट करुन गैरहजर अथवा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देय असलेला घरभाडे भत्ता कपात करण्याची कार्यवाही करुन, संबंधीत विभाग प्रमुख यांनी त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी, असे निर्देशीत केले आहे. याचबरोबर सर्व संबंधीत विभाग प्रमुखांनी शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांचे व शासनाचे कामे वेळेत होण्यासाठी Geofenced Attendance System कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 24 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमीत केले.

00000

 

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 

ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 डिसेंबरपर्यंत वाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी गुरुवार 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 31 ऑक्टोंबर 2020, 4 व 15 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात गुरुवार 31 डिसेंबर 2020 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. 28 नोव्हेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

0000

 

61 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

71 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शनिवार 28 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 61 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 38 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 71 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या एकुण 1 हजार 893 अहवालापैकी 1 हजार 799 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 325 एवढी झाली असून यातील 19 हजार 180 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 404 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 रोजी मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 548 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 32, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, अर्धापूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, नायगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, भोकर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 71 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.36 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 17, नांदेड ग्रामीण 2, धर्माबाद तालुक्यात 1, हदगाव 2, मुखेड 1 असे एकुण 23 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 12, हदगाव तालुक्यात 1, किनवट 1, लोहा 3, मुखेड 11, देगलूर 9, निजामाबाद 1 असे एकुण 38 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 404 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 42, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 18, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 11, नांदेड जिल्ह्यातील गृह विलगीकरण 89, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 132, खाजगी रुग्णालय 37 आहेत. 

शनिवार 28 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 60 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 48 हजार 953

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 24 हजार 373

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 325

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 180

एकूण मृत्यू संख्या- 548

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-793

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-404

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...