Saturday, October 15, 2016

जलयुक्त शिवार पत्रकार पुरस्कारासाठी
अर्ज करण्याची मुदत 20 ऑक्टोबर
नांदेड, दि. 15 :- जलयुक्त शिवार अभियानात वृत्तपत्रातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जलसंधारणाचे महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींना शासनातर्फे राज्य, विभाग तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता इच्छुक पत्रकारांनी 20 ऑक्टोबर 2016 पर्यंत प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत संबंधित स्तरावरील निवड समितीकडे सादर करावी. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन निर्णय यामधील ग्रामविकास व जलसंधारण विभागाचा दि. 28 सप्टेंबर 2016 रोजीचा शासन निर्णय आणि दि. 10 ऑक्टोबर 2016 रोजीचे  शासन  परिपत्रक पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000
वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन,
 ई-बुकचे सामुहिक वाचन संपन्न
            नांदेड, दि. 15 :- वाचनाचा हेतू ज्ञान मिळविण्यासाठी, अभ्यासासाठी, विरंगुळयासाठी, मनोरंजनासाठी असा असला तरी खरे वाचन स्वत:ला ओळखण्यासाठी करावयाचे असून वाचन ही एक तपश्चर्या,साधना असायला हवी अशा वाचनातून स्वत:ची ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांनी केले.
भारतरत्न डॉ..पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन -बुक्सचे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे उदघाटन तहसिलदार अरविंद नरसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सूर्यवंशी,संभाजी शिंदे,बसवराज कडगे,कुबेर राठोड,विठठल काळे, शिवाजी पवार,‍दिनकर कोलते,श्रीनिवास शेजूळे यांची उपस्थिती होती.
            ‍जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथ प्रदर्शन -बुक्स सामूहिक वाचन या विषयी माहितीदिली. तहसिलदार अरविंद नरसीकर यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या विचारसरणी विषयी माहिती देऊन डॉ.कलामांचे चरित्र सदैव सर्वांना प्रेरणादायी राहील असा विश्वास व्यक्त केला. निर्मलकुमार सुर्यवंशी,कुबेर राठोड यांनीही मनेागत व्यक्त केले.
            कार्यक्रमात वसंत बारडकर यांनी 75 ग्रंथ दिनकर कोलते यांनी 1 ग्रं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास भेट दिला. विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शन -बुक्स साहित्याचे मोठया प्रमाणावर वाचन करुन डॉ.कलामांना आदराजंली वाहिली. विद्यार्थीनींनी वाचन प्रेरणा दिनाची काढलेली सुबक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कोकुलवार यांनी केले. संजय कर्वे,अजय वटटमवार,कोंडिबा गाडेवाड,मयूर कल्याणकर,ओंकार कुरुडे, सोपान यनगुलवाड, विठठल यनगुलवाड, आर.डी.मुंजाळ, सोनाली देशमुख,सुजाता वाघमारे,सुप्रिया करले यांनी संयोजन केले.

0000000
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ
नांदेड, दि. 15 :- भारत निवडणक आयोगाने  दिनांक 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याची मुदत शुक्रवार 21 ऑक्टोंबर 2016 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक व राजकीय पक्षांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...