Tuesday, October 23, 2018


नदीपात्रापासून पाचशे मीटरच्या आत
माती उत्खनन करण्यास प्रतिबंध 
नांदेड, दि. 23 :- वीटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकर, वीटभट्टी चालक यांना नांदेड जिल्हा हद्दीतील वाहणाऱ्या सर्व नदीपात्रापासून 500 मीटरच्या आत दोन्ही बाजुनी नदी काठा लगत असणाऱ्या खाजगी / शासकीय मालकीच्या शेतामध्ये माती उत्खनन करण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढला आहे.
जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 23 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 20 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्री पर्यंत हा आदेश लागू केला आहे.    
00000


विष्णुपूरी प्रकल्प जलाशय काठावरील बागायतदारांना
दोन पाळ्यासाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन
                    नांदेड, दि. 23 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशयाच्या काठावरील लाभक्षेत्रात अधिकृत परवानाधारक बागायतदारांना मंजुर क्षेत्रास रब्बी हंगाम 2018-19 मध्ये दोन पाळ्यात पाणी उचलता येणार आहे. अधिकृत परवानाधारक बागायतदारांननमुना नं.7 (अ) मध्ये पाणी अर्ज भरुन दिल्यास शासन नियमानुसार पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने केले आहे.
               शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातील सन 2018-19 यावर्षी उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे दृष्टीकोनातुन 16 ऑक्टोंबर 2018 रोजी  मंत्री जलसंपदा यांचे अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. या प्रकल्पात 16 सप्टेंबर 2018 रोजी शंभर टक्के पाणीसाठा होता. दिनांक 20 ऑक्टोंबर 2018 रोजी विष्णुपूरी जलाशयात 79.94 टक्के एवढा पाणीसाठा आहे. याप्रमाणे जलाशयातील पाण्याचा वापर झाल्यास विष्णुपूरी प्रकल्पातील पाणीसाठा फेब्रुवारी 2019 अखेर पुर्णपणे संपेल त्यामुळे नांदेड शहर व परिसरातील ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
               कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार विष्णुपूरी प्रकल्पाचा जलाशयाच्या काठावरील लाभक्षेत्रात फ़क्त अधिकृत परवानाधारक बागायतदारांना मंजुर क्षेत्रास रब्बी हंगाम 2018-19 मध्ये दोन पाळ्यात पाणी उचलता येणार आहे.  पाणी उचलण्याचा कालावधी पुढील प्रमाणे आहे. प्रथम पाणीपाळी 1 ते 15 नोव्हेंबर 2018 तर द्वितीय पाणीपाळी  1 ते 15 डिसेंबर 2018 हा आहे.  केवळ या पाणीपाळी कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडुन विज पुरवठा चालु ठेवण्यात येणार आहे.                दिनांक 16 ते 30 नोव्हेंबर 2018 व दिनांक 16 डिसेंबर 2018 पासुन पावसाळा 2019 मध्ये जलाशयात समाधानकारक  पाणीसाठा येईपर्यंत विद्युत पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे.
               जिल्हाधिकारी नांदेड यांचे 15 ऑक्टोंबर 2018 च्या आदेशानुसार अनाधिकृत उपसा पुर्णपणे बंद करण्यासाठी आवश्यकतेनुसार विद्युत मोटारी / डिझेल पंप जप्तीची कार्यवाही करण्यात येईल तेंव्हा अधिकृत परवानाधारक बागायतदारांननमुना नं.7 (अ) मध्ये पाणी अर्ज भरुन दिल्यास खालील दर्शविलेल्या शर्तीचे अधीन राहुन प्रचलीत शासन नियमानुसार पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल.
               पाणी अर्जाचा विहीत नमुना क्रं. 7 () संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य  मिळेल. सदर पाणी अर्जात पिकाची मागणी विस आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पुर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात दाखल करुन त्याची पोच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरते वेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालू  पिकाची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे.  म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल. मंजुर क्षेत्रास जलाशयाचे पाणी अग्रक्रमाणे घेता येईल नामंजुर व अनाधिकृत क्षेत्रास पाणी घेता येणार नाही. तेंव्हा मंजुरी घेऊन पिकांचे  नियोजन करावे. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपतीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाणे  टाळावा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक रहातील.
               नामंजुर क्षेत्रावरील उभ्या हंगामी / बारमाही पिकाचे पाण्याअभावी नुकसान झाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही याची सर्व बागायतदारांनी नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार पाणी टंचाईची भिषण परिस्थिती विचारात घेऊन प्रकल्पातील पिण्यासाठीचा पाणीसाठा राखीव ठेवण्यास प्रत्येक बागायतदाराने सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेडचे कार्यकारी अभियंता मु. मो. कहाळेकर यांनी केले आहे.  
000000


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौंडीचे 31 ऑक्टोंबरला आयोजन
             नांदेड, दि. 23  :- सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित केली आहे. बुधवार 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन होणार असून जुना मोंढा टावर नांदेड येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
            दर वर्षाप्रमाणे जिल्हा युवा समनव्यक, नेहरु युवा केंद्र नांदेड, समनव्यक राष्ट्रीय सेवा अयोजन कार्यालय स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर ता. बिलोली, शिक्षणाधिकारी, प्राथमिक / माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांच्या समन्वयाने संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सदर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचित केले आहे.  
0000000


वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र
नूतनीकरण अर्ज जमा करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 23 :- वाहनधारक, मालकाने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अपॉईंटमेटची तारीख घेतलेली आहे. त्या तारखेच्या आदल्यादिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण अर्ज व वाहनाची सर्व वैध कागदपत्रे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील फिटनेस विभागात जमा करावी. त्यानंतर सदर अर्ज कार्यालयामार्फत अपॉईंटमेटच्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण चाचणीपथ येथील मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपविण्यात येतील, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
0000000


मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड दि. 23 :-  मोटार सायकलसाठी एमएच 26 बीएम ही नवीन मालिका 1 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे अर्ज 30 ऑक्टोंबर पासून स्विकारण्यात येतील, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.
000000


ज्येष्ठ नागरीकांसाठी दर शुक्रवारी
मोफत विधी सेवा सहाय्य   
नांदेड दि. 23 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरीकांना विधी सेवा सहाय्य पुरविण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथे जेष्ठ नागरीकांसाठी दर शुक्रवारी मोफत विधी सेवा सहाय्य उपलब्ध करुदेण्यात येणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समिती डॉ. हंसराज वैद्य,  अशोक तेलकर तसेच विधीज्ञ व्ही. डी. पाटनुरकर हे सदस्य काम पाहणार आहेत.
या समितीचे कामकाज आठवडयातील प्रत्येक शुक्रवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हा न्यायालय परिसर नांदेड येथे दुपारी 2 ते 3  यावेळेत चालणार आहे.  या समितीत जेष्ठ नागरीकांची प्रकरणे मिटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या न्यायालयीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी नमुद ठिकाणी नियोजीत दिवशी वेळेत उपस्थित राहुन आपल्या न्यायालयीन समस्या मिटविण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे. 
00000


महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा
नांदेड दि. 23 :-  महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 25 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी 3.30 ते 5 वाजेपर्यंत मुखेड येथे आगमन व जाहिर सभा. सायं. 5 वा. देगलूरकडे प्रयाण. सायं. 6.30 ते 8.30 देगलूर येथे आगमन व जाहिर सभा.
शुक्रवार 26 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 9.30 वा. नायगावकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नायगाव येथे आगमन व जाहिर सभा. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1 वा. मुदखेडकडे प्रयाण. दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत मुदखेड येथे आगमन व जाहिर सभा. दुपारी 3.30 वा. नांदेडकडे प्रयाण. सायं. 4 ते 7 वा. नांदेड शहरामध्ये आगमन व रॅली. सायं. 7 ते 10 वाजेपर्यंत जाहिर सभा स्थळ- नवा मोंढा मैदान नांदेड. रात्री नांदेड येथे मुक्काम.
शनिवार 27 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 9.30 वा. भोकरकडे प्रयाण. सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत भोकर येथे आगमन व जाहिर सभा. दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वा हदगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते सायं 4 वा. हदगाव येथे आगमन व जाहिर सभा.
0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...