Wednesday, November 23, 2016

चर्मोद्योग विकास महामंडळाच्या
थकबाकीदारांची यादी जाहीर करणार
नांदेड, दि. 23 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या कर्ज थकबाकीदारांची यादी महामंडळाच्यावतीने जाहीर प्रसिद्धीस देण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड जिल्ह्यात महामंडळाचे सुमारे 71 कर्ज थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे 71 लाख 33 हजार रुपयांची थकबाकी आहे. सन 2004-05 पासून सन 2015 पर्यंतचे हे थकबाकीदार कर्ज परतफेडीबाबत महामंडळाला सहकार्य करत नाहीत. अशा या थकबाकीदारांची यादी महामंडळाकडून जाहीर प्रसिद्धीस देण्यात येईल. ही यादी विविध ठिकाणच्या शासकीय कार्यालयात फलकांवर लावण्यात येईल, असे महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

00000000
माजी सैनिकांना
पार्ट टू ऑर्डर संबंधात आवाहन
नांदेड, दि. 23 :-  माजी सैनिकाच्या मृत्यू नंतर कुटुंब पेन्शनसाठी संबंधीत सैन्य रेकॉर्ड कार्यालयामध्ये व पेन्शन पे ऑर्डरमध्ये पत्नीच्या नावाची नोंद असणे आवश्यक आहे. ज्या माजी सैनिकांच्या पत्नीच्या नावाची नोंद काही करणास्तव राहून गेली आहे. त्याबाबत पार्ट टू ऑर्डर करण्यासाठी सैन्य रेकॉर्ड कार्यालयानी कायदेशीर वारसहक्क प्रमाणपत्र तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांनी किंवा तत्सम अधिकारी यांची स्वाक्षरी केलेले असणे आवश्यक असल्याचे कळविले आहे. यासंबंधी गरजू माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे माहिती घ्यावी , असे आवाहन नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.

00000000
बिलोलीतील नरसी-बोधन पूल
जड वाहनांसाठी बंद
        नांदेड, दि. 23 :- नरसी-बिलोली-बोधन रस्त्यावर बिलोली तालुक्यातील येसगी गावाजवळ मांजरा नदीवर सन 1985 मध्ये मोठा पुल बांधण्यात आला आहे. या पुलाची दुरुस्ती सुरु करण्यात आल्याने खबरदारी म्हणून या पुलावरुन होणारी जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता सां. बां. विभाग देगलूर यांनी कळविले आहे.
        या पुलावरुन सतत क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांची वाहतुक होत असल्याने तो क्षतीग्रस्त झाला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामास 18 नोव्हेंबर 2016 रोजी पासून सुरुवात झाली आहे. पुल दुरुस्तीचे काम साधारणत: तीन महिने चालणार आहे. या कालावधीमध्ये पुलावरुन अतिशय जड वजनांच्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच पुलावरुन होणारी इतर दैनंदिन वाहतुक देखील संथ गतीने सुरु ठेवण्याची अनुमती आहे, अशी माहिती देगलूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.

000000
कापुस, तुर पिकावरील
किड नियंत्रणासाठी संदेश
नांदेड दि. 23 :- जिल्ह्यात कापुस व तुर पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीसाठी सायपरमेथ्रीन 10 टक्के प्रती 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॅास 50 टक्के सायपरमेथ्रीन 5 टक्के ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. सध्या तुरीचे पिक फुलोरा व शेंगा निर्मितीच्या अवस्थेत आहेत. शेंगा खाणाऱ्या अळ्यासाठी क्विनॉलफॉस 50 टक्के 28 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

0000000
बेघर स्वातंत्र्य सैनिकांना घरासाठी
10 लाखापर्यंत अर्थसहाय्य; अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 23 :-  ज्या स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नीला अजूनही स्वत:चे घर नाही अथवा त्यांच्या निकटवर्ती यांच्या नावे घर नाही, अशा स्वातंत्र्य सैनिकाला किंवा त्यांच्या हयात पत्नीला त्यांच्या राहत्या गावात घर घेण्यासाठी रुपये 10 लाखाच्या मर्यादेत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचे शासन परिपत्रकानुसार प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी शनिवार 31 डिसेंबर 2016 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा), नांदेड येथे विहित नमुन्यात अर्ज सादर करण्यात यावे, असे कळविले आहे.   
पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता व निकष निश्चित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नीच्या नावे (स्त्री स्वातंत्र्य सैनिक असल्यास तिच्या नावे किंवा तिच्या हयात पतीच्या नावे) किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा इतर देशात कोठेही स्वत:चे घर नको, निकटवर्तीय यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा आणि मुलगी, त्यांच्या नामनिर्देशनाच्या आधारे ज्या व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली आहे अशी व्यक्तीचा समावेश असावा. राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून निवृत्ती वेतन घेणारे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक सदर अर्थसहाय्यासाठी अर्ज करु शकतील.
स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची पत्नी किंवा पती यापैकी एक आवश्यक आहे, ते किंवा त्यांच्या नावाने त्यांचे निकटवर्तीय यांना अर्ज सादर करता येईल. स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नीच्या नावे (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास तिच्या नावे किंवा तिच्या हयात पतीच्या नावे) किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे मागील 10 वर्षांपासून स्वत:चे घर नाही याबाबत पुरावा म्हणून स्वातंत्र्यसैनिकाच्या वडिलांचे ज्यावेळी निधन झाले त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकाच्या वडिलांच्या नावे असलेल्या मिळकतीबाबतचा दाखला, वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटण्या झाल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकाच्या वाट्यास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतीबाबतचा दाखला, स्वातंत्र्यसैनिकाच्या निकटवर्तीयांच्या नावे असलेल्या मिळकतीबाबतचा दाखला, मागील 10 वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास ती किंवा तिचा हयात पती) भाड्याच्या घरात राहत असल्याबाबत घर मालकाबरोबर झालेल्या नोंदणीकृत करारनाम्याची साक्षांकित प्रत आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास ती किंवा तिचा हयात पती) यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयाने महाराष्ट्रात कोठेही म्हाडा, सिडको यांच्या गृहनिर्माण प्रकल्प योजनेचा किंवा शासनाच्या अन्य गृह निर्माण योजनेचा किंवा घरबांधणी योजनेचा यापूर्वी लाभ घेतला असल्यास तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा किंवा मुलगी यांना किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या नामनिर्देशनाच्या आधारे ज्या व्यक्तिस शासकीय नोकरी मिळाली आहे आणि अशा व्यक्तिस शासकीय निवासस्थान मिळाले असल्यास ते अर्थसहाय्य मिळण्यास अपात्र राहतील. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांची हयात पत्नी (स्त्री स्वातंत्र्यसैनिक असल्यास ती किंवा तिचा हयात पती) किंवा त्यांच्या निकटवर्तीयास यापूर्वी घरासाठी जमीन किंवा शेतीसाठी जमीन देण्यात आली असल्यास अशा व्यक्ती देखील अर्थसहाय्य मिळण्यास अपात्र ठरतील.
स्वातंत्र्यसैनिकास दोन किंवा दोनपेक्षा अधिक पत्नी असतील आणि अशा स्वातंत्र्यसैनिकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नींना केवळ एका घरासाठी अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज करता येईल. यासाठी दोन्ही पत्नींनी विचार विनिमय करुन कोणाच्या नावे अर्ज करावयाचा आहे हे सहमतीने ठरवावे. अधिक माहितीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा), नांदेड यांच्याकडे संपर्क साधावा.

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...