Monday, February 24, 2020


अवैध वाळु उत्‍खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे
--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचे निर्देश
नांदेड, दि. 24:- जिल्‍हास्‍तरीय वाळु संनियत्रण समिती बैठक जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीमध्‍ये जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्‍हास्‍तरीय वाळू संनियत्रण समितीच्‍या बैठकीमध्‍ये अवैध वाळु उत्‍खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी निर्देश दिले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता  एस. के. सब्बीनवार, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्‍ठ भु-वैज्ञानिक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, व प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ, नांदेड इ. उपस्थित होते.
अवैध वाळु उत्‍खनन व वाहतुकीच्‍या तक्रारींच्‍या अनुषंगाने जिल्‍हास्‍तरावर तक्रार निवारण कक्ष स्‍थापन करण्‍यात यावे. या तक्रार निवारण कक्षामध्‍ये 24X7 कर्मचारी यांची नियुक्‍ती करावी. ज्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये अवैध रेती उत्‍खनन/वाहतुक होत असेल अशा ग्रामपंचातीच्‍या ग्राम दक्षता समितीस जबाबदार धरुन त्‍यांचे विरुध्‍द नियमानुसार कार्यवाही अनुसरण्‍यात येईल. उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे संयुक्‍त समिती स्‍थापन करुन सदरील समितीमार्फत ज्‍या चौक्‍या/नाक्‍यावरुन अवैध वाहतुक होत असतील अशांची यादी तयार करुन जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. तसेच प्रत्‍येक चौकीच्‍या ठिकाणी महसुल, पोलिस व इतर विभागाच्‍या अधिकारी/कर्मचारी यांच्‍या नियुक्‍त्‍या करुन अवैध वाहतुक करणा-या वाहनांविरुध्‍द कार्यवाही करण्‍यात यावी. तसेच या चौकीच्‍या ठिकाणी सीसीटिव्‍ही कॅमेरा ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. तसेच जिल्‍हयातील उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दर आठवडयाला संयुक्‍त बैठक आयोजित करुन सदरील बैठकीमध्‍ये त्‍यांचे कार्यक्षेत्रात अवैध रेती उत्‍खनन/वाहतुकीसंदर्भात केलेल्‍या कार्यवाही बाबत आढावा घेऊन जिल्‍हास्‍तरीय समितीकडे प्रस्‍तावित करण्‍यात यावे. महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नायब तहसिलदार व पोलिस विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस उपनिरिक्षक व सहायक पोलिस निरिक्षक यांचे संयुक्‍त भरारी पथके गठीत करण्‍यात यावे. सदरील पथकामार्फत अवैध रेती उत्‍खनन व वाहतुकीच्‍या अनुषंगाने तात्‍काळ कार्यवाही करणेसंदर्भात निर्देश दिले आहेत. अवैध रेती उत्‍खनन व वाहतुकीच्‍या अनुषंगाने पोलिस व महसुल विभागाने एकत्रित कार्यवाही करण्‍यात यावी. तसेच अवैध रेती वाहतुकीमध्‍ये क्षमतेपेक्षा जास्‍त वाहतुक करत असताना पकडलेली वाहने परिवहन विभागाकडे  मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करणेसाठी देण्‍यात यावी.  मोटार वाहन कायद्यानुसार सदरील वाहनाची नोंदणी रद्द करण्‍याची कार्यवाही करण्‍यात यावी.
0000


ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी गतिमानता हवी
--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर
नांदेड, दि. 24:- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी वरिष्ठ सनदी अधिकारी तथा कार्यकारी संचालक उमाकांतजी दांगट यांच्या उपस्थितीत विभागस्तरीय बैठक घेण्यात आली.
सदरील बैठकीस संबोधताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले की, ग्राम प्रवर्तक यांनी ग्रामस्थांना शासकीय योजनांची परिपूर्ण व व्यवस्थित माहिती देऊन व शासकीय योजनांचा कृती संगम करून गावाचा विकासात्मक दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पारगमन धोरणानुसार गावातील पूर्ण झालेल्या शासकीय योजना व प्रकल्प शासन प्रचलित नियमानुसार संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करावेत, तसेच शिल्लक राहिलेली कामे पारगमन प्रक्रियेत पूर्ण करण्यात यावीत. गावाचा सामाजिक व आर्थिक विकास होणेसाठी ग्राम परीवर्तक, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शाश्वत विकासाचे धोरण अवलंबून योग्य ती विकासाची दिशा देण्यात यावी, जेणेकरून गावांना सोयीसुविधा उपलब्ध होऊन संबंधित गावे खऱ्या अर्थाने सक्षम बनतील असे सांगितले.
कार्यकारी संचालक तथा माजी वरिष्ठ सनदी अधिकारी श्री दांगट यांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ज्या ग्राम प्रवर्तकांनी यशस्वीरित्या फेलोशिप पूर्ण केली आहे, अशा ग्राम प्रवर्तकांना त्यांनी मागील तीन वर्षापासून घेतलेल्या अमूल्य अनुभवाच्या आधारे भविष्यातील चांगल्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे सूचित केले. पारगमन ग्रामपंचायतीच्या संदर्भात ग्राम कोष अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे तसेच शिल्लक असलेल्या निधीचे कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी किनवट तालुक्यातील संबंधित पाच गावे गौरी, प्रधानसांगवी, दिगडी, धामदरी, कनकवाडी या ग्रामपंचायतीची सखोल व परिपूर्ण माहिती दिली.
सदरील बैठकीचे प्रास्ताविक व प्रस्तुती नोडल अधिकारी सुपेकर यांनी केली, या बैठकीला मुंबईचे वरिष्ठ अधिकारी दिलीप बायस, मधुकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी व बीड तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

Thursday, February 20, 2020


हरवलेल्या व्यक्तीचा शोध
नांदेड दि. 20 :- विनायकनगर नांदेड येथील नरेंद्र दिगांबरराव निमगावकर (वय 32) हा खाजगी नौकरी करणारा युवक 19 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री मोटार सायकल क्र. एमएच 26 एफ 9385 जांभळा कलरची स्पलेन्डर मोटार सायकलसह त्यांचे राहते घरुन निघुन गेला तो परत आला नाही.
नरेंद्र निमगावकर यांचे वर्णन उंची 5 फुट 8 इंच असून रंग निमगोरा, अंग मजबूत, चेहरा गोल, पोषाख निळ्या रंगाचे स्वेटर व जिन्स पॅन्ट, दाढीची ठेवण वाढलेली, नाक सरळ, भाषा हिंदी, मराठी, इंग्रजी भाषा येते. या वर्णनाचा मुलगा मिळुन आल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे कळवावे, असे आवाहन पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेडचे त. अमलदार यांनी केले आहे.
00000


हमीभावाने तूर खरेदीसाठी
ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ
नांदेड दि. 20 :-  केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये हमीभावाने तुर खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत 15 फेब्रुवारी 2020 वरुन 15 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर तुर विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


निर्यातीस इच्छूक व्यापाऱ्यांना
माहिती नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 20 :- जिल्ह्यातील निर्यातदार व निर्यात करण्यास तयार असलेल्या व्यापारी / उद्योजकांना आवाहन करण्यात येते की, मा. प्रधानमंत्री यांनी स्वातंत्र्य दिन 2019 रोजी प्रत्येक जिल्ह्यास संभाव्य निर्यात केंद्रात रुपांतरित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याअनुषंगाने वाणिज्य सचिव वाणिज्य विभाग यांनी नांदेड जिल्ह्यास निर्यात केंद्रात रुपांतरित करणे, व्यापार, निर्यात क्षमता असलेल्या उत्पादनाची ओळख करुन देणे आणि उत्पादकाना, उत्पादकापर्यंत समन्वय साधून प्रस्तावित केलेल्या उत्पादनापर्यंत पोहचवण्यासाठी सुलभ भूमिका बजविण्याकरीता आपण आपल्या उत्पादनाची माहिती उदा. उत्पादन प्रकार, फर्मचे नाव, ईमेल, मोबाईल क्रमांक आदी माहिती जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड येथे नोंदणी करावी, अथवा didic.nanded@maharashtra.gov.in या ईमेलवर देण्यात यावी, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


दहावी व बारावी परीक्षा केंद्र
परिसरात 144 कलम
नांदेड दि. 20 :- जिल्ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (दहावी) केंद्रावर 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (बारावी) केंद्रावर 18 फेब्रुवारी ते 17 मार्च 2020 या कालावधीत परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/ एस.टी.डी/ आय.एस.डी/भ्रमणध्वनी/फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्गमीत केला आहे.
000000


दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु
नांदेड, दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ भांबुर्डा शिवाजीनगर पुणे यांच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविता याव्यात विभागीय मंडळ स्तरावर याकरिता इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर विभागीय मंडळात 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे.
नियुक्ती करण्यात आलेल्या मंडळ अधिकारी / कर्मचारी यांची माहिती खालील प्रमाणे असून विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.
इयत्ता 12 वी लेखी परीक्षेचा कालावधी 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 पर्यंत सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत एच. पी. (व.अ.) कोणेरी भ्र. 9527295491, दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्रीमती एस. आर. मोरे (सा.अ) फक्त कार्यालयीन वेळेत 9819136199, रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत एम. व्ही. केंद्रे (प.लि.) 7350843111.
इयत्ता दहावी लेखी परीक्षेचा कालावधी 3 मार्च ते 23 मार्च 2020 पर्यंत एन. एन. (व.अ.) डूकरे यांना सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत 8379072565 भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांकावर. ए. पी. चवरे (सा.अ.) दुपारी 2 ते रात्री 10 यावेळेत 9421765683. रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत जाधवर एम. डी. (प.लि.) 8855865435 संपर्क करावा.  
00000