Wednesday, December 22, 2021

 तिन्ही सांजेला सांजवातीने नदी उत्सवाची सांगता

त्रिकुट येथे रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत उपक्रमाचा समारोप

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड पासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले त्रिकुट हे गोदावरी आणि आसना नदीच्या संगमाचे गांव. इथला संगमाचा नितांत सुंदर काठ आणि या पात्रातील पाण्यात विसावलेल्या प्राचीन गणपती मंदिरामुळे हे ठिकाण तसे अनेकांच्या श्रद्वेचे आणि भक्तीचे आहे. नुकत्याच सुरु झालेल्या कडाक्याच्या थंडीतही हा काठ वेगळया ऊर्जेची अनुभूती देत आहे. याचे साक्षीदार आहेत पंचक्रोशीतील नागरिक आणि जिल्हा प्रशासनाची टीम.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमांत आपली गोदावरी आणि आसना नदीच्या त्रिकुट येथील संगमाचा आर्वजून समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने त्रिकुटच्या काठावर स्वच्छतेसह लोकसहभागातून अनेक उपक्रम गत आठ दिवसापासून सुरु आहेत. उपक्रमांची सांगता आज संगमाच्या पात्रात तिन्ही सांजेला सांजवातीने करण्यासाठी असंख्य महिला पुढे सरसावल्या. नदीच्या पावित्र्यासह तिला आमच्या कडून आणखी प्रदूषित होऊ देणार नाही यांची खूणगाठ मनाशी बांधत महिलांसह उपस्थितांनी या सांजवातेसह दिव्यांना संगमाच्या पाण्यात प्रवाही केले. या उपक्रमात नदी स्वच्छतेपासून मॅरेथॉन स्पर्धाचित्रकला स्पर्धागीत गायन स्पर्धाकोविड लसीकरणबचतगटाच्या महिलांच्या पुढाकारातून संगमाच्या काठाची स्वच्छतायोगा शिबिरवृक्षारोपण आदी विविध उपक्रम या काठाने अनुभवले.

 

नदी विषयी जाणीव जागृतीचा आदर्श वस्तूपाठ

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

रिव्हर्स ऑफ इंडियाच्या निमित्ताने मानवी जीवनातीलपर्यावरण संतुलनातील नदीच्या महत्वासह तीच्या प्रती अधिक जबाबदार वर्तन गावकऱ्यांकडूननागरिकांकडून व्हावे या उद्देशाने हा विशेष उपाक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला. त्रिकुट येथे आबालवृध्दांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी विविध उपक्रमात घेतलेल्या सहभागाने आमचा विश्वास द्विगुणित झाला आहे. यापुढेही आम्ही जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसहभागावर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. महिलांच्या पुढाकारातून ही सांजवात आता प्रवाहित झाली असून अनेक गावे नवा यातून प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

महिलांचा उर्त्स्फूत सहभाग हा नदीचा काठ उजळविणारा

– मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत त्रिकुट येथे साजऱ्या झालेल्या या नदी उत्सवात महिलांचा उर्त्स्फूत सहभाग मिळाला आहे. मॅरेथॉन ते सांस्कृतिक कार्यक्रमापासून हेरिटेज वॉक मध्येही मुली व महिलांनी सहभाग घेतला. त्याचा हा सहभाग काठाच्या स्वच्छतेपासून आहे. प्रत्येक गावकऱ्यांनी आपली जबाबदारी नदी प्रती कृतज्ञता व आपले उत्तरदायित्व स्वीकारले तर तीचे प्रदुषण कमी होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसहभागाची वेगळी शक्ती सर्वांनी अनुभवली आहे. माता साहिब गुरुद्वारा व गावकऱ्यांनी जो सहभाग दिला तो महत्वाचा असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले. सर्वाची कृतीही एक प्रकारे नदीचे काठ उजळविण्यासारखेच असल्याचे त्या म्हणाल्या.

0000000








 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 डिसेंबर 2021  पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2021  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित 

तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 305 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 539 एवढी झाली असून यातील 87 हजार 858 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालयात 2 असे एकुण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 4नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16खाजगी रुग्णालय 6 अशा एकूण 26 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 90 हजार 879

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 86 हजार 818

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 539

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 858

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-03

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...