Friday, July 31, 2020


वृत्त क्र. 715  
जिल्हा परिषदेच्या शाळांचा
दहावी परीक्षेचा यावर्षी वाढला निकाल
नांदेड (जिमाका) दि. 31 :- माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता दहावी) यावर्षी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढली असून गतवर्षी शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळा आणि विशेष अभियानाची ही फलनिष्पत्ती आहे. जिल्हा परिषदेच्या 70 पैकी 65 शाळांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निकाल 26 टक्के वाढला असून अ श्रेणीत 190 ब श्रेणीत 232 तर पास श्रेणीत 165 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.
आदिवासी दुर्गम क्षेत्रातील जिल्हा परिषद हायस्कूल कन्या किनवटचा गतवर्षीच्या निकाल 0 होता तर यावर्षीचा निकाल 70 टक्के आहे. जिल्हा परिषद हायस्कूल बोधडीचा निकाल गतवर्षी 28 टक्के होता . यावर्षी 89 टक्के झाला आहे. जिल्हा परिषद हायस्कूल मांडवीचा निकाल गतवर्षी 39 टक्के होता तो यावर्षी 90 टक्के झाला आहे.जिल्हा परिषद हायस्कूल मरखेल तालुका देगलुर ,जिल्हा परिषद हायस्कूल बिलोली व जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर वगळता इतर सर्व शाळांमध्ये निकालाची टक्केवारी भरघोस वाढली आहे.
सन 2018-19 या वर्षात गणित, विज्ञान, इंग्रजी विषय शिकवणारे शिक्षक व मुख्याध्यापकांच्या दोन कार्यशाळा घेण्यात आल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर व शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
पहिली कार्यशाळा दिवाळीपूर्वी व दुसरी कार्यशाळा दिवाळीनंतर परीक्षेआधी एक महिन्यापूर्वी घेण्यात आली. या कार्यशाळेत शाळानिहाय व विषय निहाय आढावा घेऊन विद्यार्थ्यांची अनुत्तीर्ण होण्याची कारणे शोधली. कोणत्या विषयात विद्यार्थी मागे पडतात आणि का मागे पडतात याची कारणमीमांसा करून निकाल वाढविण्यासाठीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. संपूर्ण दिवाळी सुट्टीत सुट्टी न घेता शिक्षक व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. प्रशासनाच्या आवाहनाला दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सोशल मीडियाचा वापर झेडपी स्टॅंडर्ड टेन नॉर्थ व साउथ असे व्हाट्सअपचे दोन ग्रुप केले त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हे एडमिन होते. दोघेही दररोज त्यावर टाकण्यात येणारा प्रतिसाद पाहत शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षकांना प्रोत्साहन देत, त्यामुळे शिक्षक अधिक जोमाने कामाला लागले.
कॉपीमुक्त परीक्षा आणि निकालात वृद्धी हे ध्येय ठेवून अध्यापनाच्या दिशा निश्चित केल्या. यावर्षी वाढलेली निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर व शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी सांगीतले.
0000



वृत्त क्र. 714  
शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी 
शंभर टक्के निकाल देवून केला शाळेचा गौरव

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  अनुसूचित जाती मुलां-मुलीचे शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी परिश्रम घेऊन यावर्षी शालांत परीक्षेचा निकाल 100 टक्के लावलेला आहे. अत्यंत प्रतीकुल परिस्थितीतून गोरगरिबा घरच्या येणाऱ्या या मुलांना शिक्षणाची गोडी लावून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यात शासकिय निवासी शाळेतील शिक्षकांना यश मिळाले असून याला विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करत हे घवघवीत यश संपादन केले आहे.
हदगाव येथील अनुसूचित जाती मुलींची शासकिय निवासी शाळा येथून 39 विद्यार्थींनी परिक्षेला बसल्या होत्या. यातील सर्वजणी उत्तीर्ण झाल्या असून कु. पुजा मोहन घुंगरराव हिने 91.80 टक्के मार्क, कु. आश्विनी संतोष मुरमुरे हिने 91.20 टक्के मार्क तर कु. मिनाक्षी शंकर कदम हिने 90.60 टक्के मार्क संपादित केले. माहूर येथील अनुसूचित जाती मुलींची शासकिय निवासी शाळेतून 38 विद्यार्थींनी परिक्षेला बसल्या होत्या. यातील सर्व उत्तीर्ण झालेल्या आहेत. यात कु. पुजा मारेराव हिने 82.80 टक्के, कु. पुजा डाकोरे हिने 82.40 टक्के, कु. निकिता सावते हिने 82.20 टक्के मार्क संपादित केले. उमरी येथील अनुसूचित जाती मुलांची शासकिय निवासी शाळेतून 33 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात दत्ता पवार याने 88.40 टक्के, गंगाधर तुपसाखरे याने 85.80 टक्के, राहूल बुद्धेवाड याने 77.40 टक्के मार्क संपादित केले. नायगाव येथील अनुसूचित जाती मुलांची शासकिय निवासी शाळा येथून 34 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सुशिलकुमार गजभारे याने 93 टक्के, बुद्धभुषण कांबळे याने 89.20 टक्के, सुरेश सोनटक्के याने 87.60 टक्के मार्क घेऊन यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांना दिले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी अभिनंदन केले.
0000

वृत्त क्र. 713  
पिककर्ज लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी
बँकानी करावेत विशेष प्रयत्न
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
        नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ देण्यासाठी बँकानी गावोगाव पिककर्ज जनजागृती करावी. शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करु नये असे, निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
            जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे प्रमाण 19 टक्के एवढे कमी आहे. कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी बँकानी गावोगाव पीककर्ज मेळावे आयोजित करुन या कर्ज मेळाव्याची माहिती, पुर्वसूचना, प्रसिध्दी व्यापक प्रमाणात करावी. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीचे सहकार्य घेण्यात यावे. बँकानी जुने कर्जधारकांना नवीन पीककर्ज वाटप करतांना फेरफार नक्कल, टोच नकाशा, बेबाकी प्रमाणपत्र व इतर अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे आढळून आल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

00000

वृत्त क्र. 712  
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती
लक्षात घेवून पुढील आदेशापर्यंत ताळेबंदी
            नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेवून पुढील आदेश पावेतो दिनांक 31 जुलै, 2020 नंतरही ताळेबंदीचा (लॉकडाऊन) कालावधी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वाढविला आहे.
यापुर्वीच्या आदेशान्वये नियमावलीसह दिनांक 31 जुलै, 2020 पर्यंत नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटीं व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सकाळी 7-00 ते सायंकाळी 5-00 वाजपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. दिनांक 19 जुलै, 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात दिनांक 31 जुलै, 2020 नंतरही ताळेबंदीचा कालावधी पुढील आदेश पावेतो वाढविण्यात येत आहे.
000000



वृत्त क्र. 711  
कोरोनातून आज 41 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 154 बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 31 :-  जिल्ह्यात आज 31  जुलै रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 41 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 154 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 746 अहवालापैकी 471 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 839 एवढी झाली असून यातील 887 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 859 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 5 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे.
बुधवार 29 जुलै रोजी हिंगोली गेट नांदेड येथील 67 वर्षाचा एक पुरुष, गुरुवार 30 जुलै रोजी मिलगेट नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष, तरोडा बु. नांदेड येथील 69 वर्षाच्या एक महिला डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 81 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 41 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 6, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 3, लोहा कोविड केअर सेंटर येथील 3,पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 13, कंधार कोविड केअर सेंटर येथील 4, खाजगी रुग्णायातील 4, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 5,जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 2, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1 अशा 41  कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये देगाव चाळ नांदेड येथील 55 वर्षाचा एक पुरुष,  सराफानगर नांदेड येथील 42  वर्षाचा एक पुरुष, तरोडा नांदेड येथील 72 वर्षाचा एक पुरुष, शारदानगर नांदेड येथील 38 वर्षाचा एक पुरुष व 19 वर्षाची 1 महिला, वसंतनगर नांदेड येथील 37,71 वर्षाचा दोन पुरुष, वजिराबाद नांदेड येथील 40 वर्षाची 1 महिला, लेबर कॉलनी नांदेड येथील 50 वर्षाचा एक पुरुष, निर्मलनगर नांदेड येथील 45 वर्षाचा एक पुरुष, दिलीपसिंग कॉलनी गोवर्धनघाट नांदेड येथील 25 वर्षाचा एक पुरुष व 29 वर्षाची 1 महिला, कलामंदिर नांदेड येथील 41 वर्षाचा एक पुरुष, नवीन मोंढा येथील 72 वर्षाचा एक पुरुष, यशनगर नांदेड येथील 48 वर्षाचा एक पुरुष, श्रीरामनगर नांदेड येथील 66 वर्षाचा एक पुरुष, सुंदरनगर नांदेड येथील 65 वर्षाची 1 महिला, काबरानगर नांदेड येथील 65 वर्षाचा एक पुरुष, रामननगर सिडको येथील 8,32 वर्षाचे दोन पुरुष व 29 वर्षाची एक महिला, व्यंकटेश्वरानगर नांदेड येथील 45 वर्षाचा एक पुरुष, व्यंकटेशनगर नांदेड येथील 58 वर्षाचा एक पुरुष, आनंदनगर नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष, भाग्यनगर नांदेड येथील 19 वर्षाचा एक पुरुष व 35,40,75 वर्षाच्या तीन महिला, नांदेड हैदरबाग येथील 28,32 वर्षाचे दोन पुरुष व 16 वर्षाची एक महिला, मिलरोड येथील 30 वर्षाचा एक पुरुष, कौठा नांदेड येथील 19,33,39 वर्षाचे तीन पुरुष तर 9,30,54 वर्षाच्या तीन महिला, सिडको येथील 49 वर्षाचा एक पुरुष, पोर्णिमानगर येथील 37 वर्षाचा एक पुरुष, एमजीएम कॉलेज येथील 30 वर्षाचा एक पुरुष, आंबेडकरनगर येथील 55 वर्षाचा एक पुरुष, चौफाळा येथील 65 वर्षाचा एक पुरुष, जीएमसी परिसर विष्णुपुरी येथील 25 वर्षाचा एक पुरुष व 27 वर्षाची एक महिला, मिलगेट येथील 47 वर्षाची 1 महिला, मालेगाव रोड येथील 65 वर्षाचा एक पुरुष, विष्णुपुरी येथील 25,26 वर्षाच्या दोन महिला, नेहरुनगर तरोडा येथील 69 वर्षाची एक महिला, केळीमार्केट इतवारा येथील 62 वर्षाची एक महिला, कृष्णानगर येथील 30 वर्षाचा एक पुरुष, साठेनगर येथील 34 वर्षाची एक महिला, दत्तनगर येथील 18 वर्षाचा एक पुरुष, दुलेशानगर येथील 26 वर्षाचा एक पुरुष, दिपनगर येथील 55 वर्षाची एक महिला, गुरुनगर येथील 41 वर्षाचा एक पुरुष, मगनपुरा येथील 52 वर्षाचा एक पुरुष, गोविंद कॉम्पलेक्स येथील 66 वर्षाचा एक पुरुष, आखाडा बाळापूर येथील 70 वर्षाचा एक पुरुष, संघमित्रा कॉलनी 51 वर्षाचा एक पुरुष,  येताळा धर्माबाद येथील 37 वर्षाची एक महिला, अर्धापूर येथील 29,21,50 वर्षाचे तीन पुरुष व 19 वर्षाची एक महिला, बिलोली येथील 53,40 वर्षाचे दोन पुरुष, नायगाव रोड देगलूर येथील 65 वर्षाची एक महिला व 56 वर्षाचा एक पुरुष, मरखेल येथील 60 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 34 वर्षाचा एक पुरुष, तोटावार गल्ली येथील 45,50 वर्षाच्या दोन महिला, सुगाव देगलूर येथील 48 वर्षाची एक महिला, तोटावार गल्ली येथील 90 वर्षाची एक महिला व 45 वर्षाचा एक पुरुष, कोत्तेकल्लू येथील 16,13 वर्षाचे दोन पुरुष व 32 वर्षाची एक महिला, शहापूर येथील 43, 60 वर्षाच्या दोन महिला, देशपांडेनगर येथील 65 वर्षाचा एक पुरुष,  गांधीनगर येथील 37 वर्षाचा एक पुरुष, धर्माबाद येथील 30 वर्षाचा एक पुरुष, किनवट येथील 55 वर्षाचा एक पुरुष, इस्लापूर येथील 60 वर्षाची एक महिला, मोमिनपुरा किनवट येथील 45 वर्षाचे दोन पुरुष व 60 वर्षाची एक महिला, बारुळ कंधार येथील 24 वर्षाचा एक पुरुष व 44 वर्षाची एक महिला, कासरवाडी येथील 27 वर्षाची एक महिला, हदगाव येथील 16,47 वर्षाचे दोन पुरुष, लोहा येथील 22 वर्षाचा एक पुरुष, मुखेड येथील 50 वर्षाच एक पुरुष, खरबसाडगाव येथील 34,38 वर्षाच्या दोन महिला, कारला मुखेड येथील 33 वर्षाचा एक पुरुष, दापका येथील 40,42 वर्षाचे दोन पुरुष, वाल्मीकनगर मुखेड येथील 90,18 वर्षाच्या दोन महिला, कोळीगल्ली येथील 30 वर्षाचा एक पुरुष, गायकवाड येथील 41 वर्षाचा एक पुरुष, जुहूर येथील 24,26 वर्षाच्या दोन महिला व 73 वर्षाचा एक पुरुष, नायगाव येथील 27 वर्षाची एक महिला, वसंतनगर येथील 17 वर्षाचा एक पुरुष व 8 वर्षाची एक मुलगी, घुंगराळा येथील 25 वर्षाचा एक पुरुष व 45,60 वर्षाच्या दोन महिला, भायेगाव उमरी येथील 26 वर्षाचा एक पुरुष, पुसा येथील 56 वर्षाची एक महिला, खरबी ता. उमरखेड येथील 28 वर्षाचा एक पुरुष हे आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
अँटिजेन तपासणीद्वारे समीराबाग नांदेड येथील 36 वर्षाचा एक पुरुष, वसरणी येथील 20 वर्षाची एक महिला, उदयनगर येथील 49,90 वर्षाचे दोन पुरुष, भालचंद्रनगर येथील 40 वर्षाची एक महिला, देगलूरनाका येथील 45 वर्षाचा एक पुरुष, खडकपुरा येथील 27 वर्षाचा एक पुरुष, रहेमतनगर येथील 29 वर्षाचा एक पुरुष, वेदांतनगर येथील 50 वर्षाचा एक पुरुष, आनंदनगर येथील 25 वर्षाचा एक पुरुष, हिंगोली नाका येथील 24 वर्षाचा एक पुरुष, कामठा येथील 50 वर्षाचा एक पुरुष, कासराळी बिलोली येथील 13,15,41 वर्षाचे तीन पुरुष, इंदरानगर येथील 26 वर्षाचा एक पुरुष व 16 वर्षाची एक महिला, गंगास्थान निजामाबाद येथील 36,39,41,41 वर्षाचे चार पुरुष, बाळापूर धर्माबाद येथील 30 वर्षाचा एक पुरुष, कुंठागल्ली येथील 32 वर्षाचा एक पुरुष, धर्माबाद येथील 23 वर्षाचा एक पुरुष, रुक्कीनीनगर येथील 25 वर्षाचा एक पुरुष, बेलूर येथील 24,26 वर्षाचे दोन पुरुष, रत्नाळी येथील 18 वर्षाचा एक पुरुष, समराळा येथील 35 वर्षाचा एक पुरुष, रसीकनगर येथील 43 वर्षाचा एक पुरुष, सरस्वतीनगर 45 वर्षाचा एक पुरुष, बालाजीनगर येथील 52 वर्षाचा एक पुरुष,  देवीगल्ली 21 वर्षाचा एक पुरुष, गांधीनगर येथील 38 वर्षाचा एक पुरुष, निजामाबाद येथील 32 वर्षाचा एक पुरुष,  इंदिरानगर धर्माबाद येथील 32 वर्षाचा एक पुरुष हे अँटिजेन तपासणीद्वारे बाधित आढळले.
जिल्ह्यात 859 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 145, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 292, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 33, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 23, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 20, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 99, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 46, लोहा कोविड केअर सेंटर येथे 1, हदगाव कोविड केअर सेंटर 25, भोकर कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर येथे 11, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 33, किनवट कोविड केअर सेंटर येथे 10, खाजगी रुग्णालयात 109 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 4 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 2 तर मुंबई येथे 2 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 305,
घेतलेले स्वॅब- 14 हजार 30,
निगेटिव्ह स्वॅब- 11 हजार 347,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 154,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 839,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 2,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 28,
मृत्यू संख्या- 81,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 887,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 859,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 342. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


वृत्त क्र. 710  
कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
समन्वय अधिकाऱ्यांचे पथक
नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे 16 अधिकाऱ्यांचे एक पथक निर्माण केले आहे. हे पथक कोविड-19 च्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या उपचारासंबंधीत व त्यांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा, स्वच्छता विषयक बाबी, डॉक्टर, नर्ससच्या समस्या, रुग्णांच्या समस्या व इतर आरोग्य विषयक समस्या आदी पडताळून घेण्याचे काम करेल. याचबरोबर जिल्हा शासकिय रुग्णालय, उपजिल्हा शासकिय रुग्णाय, कोविड-19 साठी निर्माण केलेले केंद्र (सीसीसी) यात असलेल्या कोविड बाधितांना पुरविल्या जाणाऱ्या सोई-सुविधा व उपचाराबाबत योग्य नियोजनासाठी समन्वय अधिकारी म्हणून हे पथक कार्य करेल.
या पथकात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांची हदगाव येथे तर जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार यांची  हिमायतनगर, भोकरचे कार्यकारी अभियंता शंकर व्‍ही. तोटावाड यांची किनवट येथे, किनवटचे उपविभागीय कृषि अधिकारी बी.पी.कदम यांची माहुर येथे, जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार यांची देगलूर येथे, शिक्षणाधिकारी (मा.) बालासाहेब कुंडगीर यांची मुखेड येथे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सुधीर ठोंबरे यांची बिलोली येथे तर कृषि विकास अधिकारी संतोष नादरे यांची नायगाव येथे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी पा.पु. व स्‍वच्‍छता दिलीप इंगोले यांची नांदेड येथे तर कार्यकारी अभि. बांधकाम विभाग (उत्‍तर) अनिल करपे यांची अर्धापूर येथे तर उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (म.व बा) सुनिल शिंगणे यांची कंधार येथे, नांदेड उप‍विभागीय कृषि अधिकारी एम.के.सोनटक्‍के यांची लोहा येथे जिल्‍हा हिवताप अधिकारी डॉ.आकाश देशमुख यांची धर्माबाद येथे, राज्‍यकर सह आयुक्‍त राहुल कळसे यांची उमरी येथे तर जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ.एम.आर.रत्‍नपारखी यांची भोकर येथे, कृषि उपसंचालक तर एम.के.सोनटक्‍के यांची मुदखेड येथे यांची समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
00000


वृत्त क्र. 709  
 खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्ण आढळल्यास
वेळीच उपचारासाठी शासकिय रुग्णालयात पाठवावे
नांदेड (जिमाका)दि. 31:- खाजगी रुग्‍णालयात इतर उपचारासाठी आलेले रुग्णांमध्ये जर कोविड-19 ची लक्षणे आढळली तर अशा रुग्‍णांना तात्काळ शासकीय रुग्‍णालयात रेफर  करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या 1 हजार 685 अधिक झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेले तसेच ज्यांचे 50 वर्षापेक्षा जास्त वय आहे अशा व्यक्ती, ज्यांनी विदेशातून, अथवा इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून प्रवास केला आहे अशा सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. यामध्ये ट्रेस, टेस्ट व ट्रिट अशा त्रीसुत्रीचा वापर करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  
खाजगी रुग्णालयामध्ये व नोंदणीकृत वैद्यकिय व्यावसायिक यांच्या क्लिनिकमध्ये कोविड-19 ची लक्षणे असलेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ज्या रुग्णांमध्ये कोविड-19 ची प्राथमिक लक्षण आढळतील अशा व्यक्तींना खाजगी रुग्णालयानी तात्काळ पुढील उपचारासाठी शासकिय रुग्णालय किंवा कोविड-19 साठी निर्माण केलेल्या केंद्रावर पाठविणे अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी असे होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले असून कोविड-19 बाधित रुग्णांना वेळेवर उपचार देण्याच्यादृष्टिने संबंधित खाजगी डॉक्टरनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.  
000000


 दहावी परीक्षेत अव्वल गुणसंपादन करणारी
स्नेहल कांबळे सांगतेयं तिच्या यशाची गोष्ट

नांदेड (जिमाका) दि. 31 :- नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली शाळेची द्वारे पुन्हा त्याच उत्साहाने उघडल्या गेली. निकाल ऑनलाईन असल्यामुळे दरवर्षी निकालाच्या दिवशी शाळेत जशी गर्दी असते तशी दिसली नाही, मात्र विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालकांपर्यंत आत्मविश्वास पूर्ण आनंदात तसूभरही कमतरता झाली नाही. या आनंदाच्या उत्सवात स्नेहल कांबळे या विद्यार्थींनीने पाचशे पैकी पाचशे गुण मिळवून नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
नांदेड येथील शारदा भवन शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाची स्नेहल ही विद्यार्थींनी. तिला या यशाबद्दल जेंव्हा बोलते केले तेंव्हा शिकवणींच्या आभासाला अधोरेखित करित ज्या प्रांजळपणे शाळेतील शिक्षकांना तिने श्रेय दिले ते कदाचित कोणाला पटणारही नाही. माझी शाळा आणि माझ्या शाळेतील शिक्षकांनी वर्षेभर ज्या पोटतिडकिने आम्हाला शिकविले त्यांची तीच तळमळ डोळ्यासमोर ठेवून मी घरी प्रामाणिकपणे अभ्यास केला. अभ्यासाप्रती असलेला प्रामाणिकपणा इतर कुठल्या क्लासेसमधून न शिकता येणारा आहे. असे सांगत तिने अप्रत्यक्ष या साऱ्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांना व अभ्यासाप्रती बाळगलेल्या प्रामाणिक तळमळीलाही तिने बहाल केले. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयामार्फत स्नेहल व तिचे वडिल मारोतीराव कांबळे यांचा आज शाल व महात्मा गांधी यांचे पुस्तक देवून प्रातिनिधिक सत्कार केला. यावेळी ती बोलत होती.  
माझे घर केवळ दोन खोल्यांचे आहे. वडिल शिक्षक असल्याने घरात लहानपणापासूनच शिक्षणाला पोषक वातावरण आहे. या पोषक वातावरणात आम्हाला भौतिक सुविधेची कधी गरज भासली नाही. आहे त्या दोन खोल्यातचं जिथे जागा असेल तिथे मी मनापासून अभ्यास करित राहीले. अभ्यासासाठी मी कोणताही वेळापत्रक कधी निश्चित केले नाही. मनाला ज्या विषयाचा जेंव्हा अभ्यास करावसा वाटेल तेंव्हा त्या-त्या विषयाचा मी अभ्यास करत गेले, असे स्नेहल हिने आवर्जून सांगितले.
माझी शाळा दुपारची होती. सकाळी नाही म्हणायला एक ट्युशन लावली होती. मात्र शाळेतल्या शिक्षकांनी ज्या पद्धतीने प्रत्येक विषय डोक्यात बिंबविले त्यामुळेच मला एवढे घवघवीत यश संपादित करता आले, असे स्नेहल सांगते. विद्यार्थ्यांना अभ्यास हा मनातून करावसा वाटला पाहिजे. ज्यांना मनातून काहीच वाटत नाही ते अभ्यासातून होणाऱ्या समाजापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मी अभ्यास करतांना माझ्या ज्या शंका आहे त्या सर्व शंका शाळेतल्या शिक्षकांकडून दुरुस्त करुन घेत राहिले. यामुळे मला यात अधिक गोडी वाढत गेली. संपूर्ण दिवस शाळा व क्लासेस यांच्यात जाण्या-येण्यात खर्ची पडायचा यामुळे मला दिवसा तसा अभ्यासाला वेळ कधी घेता आला नाही. दिवसभराच्या या दगदगीमुळे मी रात्री लवकर म्हणजेच साडेसात ते आठला झोपी जायचे. मात्र दररोज सकाळी न चुकता मी पहाटे दोनला उठून दिवसभराचा अभ्यास करुन घ्यायचे असे स्नेहलने सांगितले.
माझ्या पालकांनी मला कधीही अभ्यासाबाबत आग्रह धरला नाही. वडिल किनवटला आश्रमशाळेत शिक्षक असल्याने त्यांना कधी आम्हाला वेळ देता आला नाही. आठवड्यातून एक दिवस ते येत असल्यामुळे आम्हाला त्यांचा तेवढा वेळ पुरेसा होता. मी मोठे यश संपादीत करु शकते हे त्यांनी प्रत्येकवेळी माझ्या मनावर बिंबविले. यातूनच माझा आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे मी हे यश संपादित करु शकले असेही ती कृतज्ञतेने जेंव्हा सांगत होती तेंव्हा नकळत तिच्या डोळ्याचे काठ ओले झाले. वैद्यकिय शिक्षण घेऊन तिला मानसोपचार तज्ज्ञ व्हायचे आहे. गणितात तिने चांगले गुण घेतल्यामुळे ती पीसीएमबी हा ग्रुप घेणार आहे. 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी
फोनवर सांधला तिच्याशी संवाद
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तिच्या या घवघवीत यशाबद्दल फोनवर संवाद साधून स्नेहल व तिचे वडिल मारोतीराव कांबळे यांचे अभिनंदन केले. तु नांदेडच्या गौरवात भर घातली असून तुझ्या या यशाबद्दल कौतूक करावे तेवढे कमी आहे. मला तुझा व तुझ्या शिक्षकांचा अभिमान आहे या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
00000

Thursday, July 30, 2020


वृत्त क्र. 707  
मुखेडच्या कोरोना केअर सेंटर येथील बाधितांची
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी घेतली प्रत्यक्ष भेट  
क्ष-किरण सीआर मशीनचे उद्घाटन
        नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने ग्रामीण भागात अधिक वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. याअंतर्गत मुखेड येथील कोविड केंअर सेंटरला सीआर मशीनचे उपलब्ध करुन दिल्या असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी त्याचे औपचारिक उद्घाटन केले.  यावेळी डॉ. मगदूम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ए. एम. पाटील, नोडल ऑफिसर डॉ. एस. के. टाकसाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी मोरे व कोविड केअर सेंटर येथील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
 यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी पीपीई किट परिधान करुन डेडिकेटेड कोविड केअर सेंटर मधील कोरोना बाधितांच्या आरोग्याची विचारपूस करुन त्यांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याबाबत आश्वासित केले. कोरोना बाधित व्यक्तींनी घाबरुन न जाता वेळेवर औषधोपचार घ्यावा. पन्नास वर्षावरील व्यक्तींनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. इतर राज्य व जिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांनी स्वत: पुढे येवून प्रशासनाला सहकार्य करावे व उपचार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुखेड येथील बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. गाव, घरनिहाय संशयित व्यक्तींची तपासणी सर्वेक्षण मोहिम सुरु असून ॲटीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आढळलेल्या बाधित व्यक्तींना वेळेत उपचार देण्यात येत आहे. त्यामुळे बाधित व्यक्तीं बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहेत. डॉ. भोसीकर यांनी मुखेड कोविड केंअर सेंटर येथील अतिदक्षता विभागास भेट देवून व्हेटिलेटरबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.   
00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...