Sunday, April 9, 2017

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीत 801 प्रकरणे
निकाली, 5 कोटी, 20 लाखांवर तडजोड
नांदेड, दि. 9  :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश  सविता बारणे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे त्या-त्या न्यायालयात आयोजन करण्यात आले होते.  जिल्ह्यात 801 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली आहेत. विविध प्रकरणात 5 कोटी 20 लाख 81 हजार 753 इतक्या रक्कमेबाबत तडजोड झाली. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एनआय अॅक्ट, मोटार वाहन अपघात, भूसंपादन इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणाचा विविध बॅंका तसेच विद्युत प्रकरणाच्या दाखलपर्व प्रकरणांचा समावेश होता.  
लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनल वरील न्यायाधीश, की सदस्य, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे तसेच पॅनल सदस्य सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.
नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद एकताटे, उपाध्यक्ष अॅड जगजीन भेदे, जिल्हा सरकारी की अॅड अमरिकसिंघ वासरीकर, सचिव अॅड एन. एल. कागणे, जिल्हयातील विधिज्ञ, विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महस विभाग अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनीही उपस्थित पक्षकार तसेच न्यायाधीश, विधिज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. यापुढेही अशाच हकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीयावेळी प्रबंधक पी. एस. तुप्तेवार सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

000000
शेळगाव गौरीतील उपक्रमशीलतेचे
राज्यमंत्री खोत यांच्याकडून कौतूक
नांदेड, दि. 9  :-  नांदेड जिल्हा हा पॅटर्न निर्माण करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात शेळगाव-गौरीसारखे उत्कृष्ट गाव आहे, याचा अभिमान वाटतो. या गावाकडून प्रेरणा घ्यावी, असे कौतुकोद्गार राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले.
नांदेड दौऱ्यावर आले असताना राज्यमंत्री श्री. खोत यांनी नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी या आदर्श गावाला भेट दिली. एकेकाळचे महाराष्ट्राचे स्वच्छता दूत म्हणून माधवराव पाटील शेळगावकर यांनी हे उत्कृष्ट पूनर्वसित गाव वसवताना हागणदारी मुक्तही हे गाव केले आहे. या गावातील अभिनव व नाविन्यपुर्ण संकल्पना पाऊन राज्यमंत्री खोत मुक्तकंठाने प्रशंसाही केली.
शेळगाव गौरी गावाची उंच टोलेजंग इमारत, गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महिलांसाठी मशिनकला प्रशिक्षण केंद्र, काँक्रीटचे रस्ते अशा विविध विकास कामाची पाहणी करुन राज्यमंत्री खोत यांनी  ग्रामस्थांचे कौतुकही केले. या गावाला जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरचे स्वच्छता तसेच जलसंधारणाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. निर्मलग्राम, पर्यावरण ग्रामसंतुलीत गाव म्हणून दोनवेळा राष्ट्रपतींच्या हस्ते या गावाला पुरस्कार मिळाले आहेत.
राज्यमंत्री खोत यांनी गावातील महिलांसाठी कपडे धुण्यासाठी धोबीघाट पाहून या उपक्रमाचे कौतुक केले. धोबीघाटावरील महिलांशी त्यांनी चर्चा केली. गावाला जलशुद्धीकरण प्रकल्पामधून अॅक्वासारखं शुद्ध थंडगार पाणी दिले जाते, या प्रकल्पाचीही पाहणी केली. यावेळी शेळगाव गौरीचे सरपंच सदाशिव पांचाळ, उपसरपंच संजय पाटील शेळगावकर  यांनी राज्यमंत्री श्री. खोत यांचे स्वागत केले व त्यांना गावाची माहिती दिली.
या गावाप्रमाणेच राज्यातील अनेक गावे निर्माण करण्याचा मनोदय राज्यमंत्री खोत यांनी यावेळी व्यक्त केला. अशी अनेक निर्मल गावे तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची अपेक्षाही राज्यमंत्री खोत यांनी यावेळी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील आमदार आदर्श गाव म्हणून दत्तक घेतलेल्या सैनिक अपशिंगे या गावाची अभ्यास सहलही शेळगाव गौरीला आयोजित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शेळगाव गौरीतील मोतीराम पाटील शिंपाळे, हुसेन साहब सय्यद, नागोराव पाटील, लक्ष्मण वाघमारे, श्रीराम घाटोळे, कुंदन टेकाळे, कोंडीबा इंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

000000
पाणी टंचाई उपाय , स्वच्छता विषयक घटकासाठी
समन्वयाने, सांघिकरित्या प्रयत्न करा - राज्यमंत्री खोत
पाणी टंचाई, स्वच्छता विषयक आढावा बैठक संपन्न

नांदेड, दि. 9  :- जिल्ह्यातील टंचाईवरील उपाय योजना तसेच स्वच्छता अभियानासाठी सांघिकरित्या समन्वयाने प्रयत्न करा. त्यासाठी गाव-तालुकापातळीपर्यंत पोहचा , असे निर्देश कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील पाणी टंचाई व स्वच्छता विभागातील योजनांची आढावा बैठक राज्यमंत्री श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली. बैठकीस आमदार सर्वश्री डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण, नागेश पाटील-आष्टीकर, महापौर शैलजा स्वामी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, कृषी, जलसंपदा, तसेच विविध विभागांचे प्रमुख, जिल्हा परिषद पाणी पुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीत विविध बाबींचा आढावा घेतल्यानंतर बोलताना राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले की, गतवर्षी चांगला पाऊस होऊनही यावर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे टंचाई लवकरच जाणवू लागली आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे. यासाठी या तीन महिन्यात सतर्क राहून , सांघिक प्रयत्न करायला हवेत. टंचाई आराखडा तयार केला गेला असेल , पण तो प्रत्यक्ष राबविण्यापुर्वी विविध घटकांशी संवाद-समन्वय राखणे इष्ट ठरते. त्यासाठी तालुकास्तरावर संबंधित लोकप्रतिनिधी ते सरपंच आणि तलाठी, ग्रामसेवक यांच्या बैठका घेण्यात याव्यात. समन्वय आणि संवादातून पुढे उद्भवणाऱ्या अडचणी यातून टाळता येऊ शकतात. जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या उपाययोजनांबाबत गांभीर्याने चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत अर्धवट राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचाही आढावा घेण्यात यावा. त्यातील निधी, त्याच्या विनीयोगातील अनियमीतता याबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री. खोत यांनी यावेळी दिले. प्रसंगी यातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
टंचाई काळात पाणी पुरवठा करता यावा यासाठी गावा-गावातील पाणी योजनांच्या थकीत विज बिलांबाबतही राज्यस्तरावरून निश्चित असे धोरण ठरविण्यासाठी प्रयत्न करू, असे श्री. खोत म्हणाले.
ग्रामस्वच्छता अभियानाच्या यशस्वितेसाठी नांदेड जिल्ह्याने समन्वयाने प्रयत्न करावेत, त्यासाठी लोकप्रतिनिधी पासून विविध घटक, सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही राज्यमंत्री श्री. खोत यांनी दिले ते म्हणाले की, नांदेड जिल्ह्याची ओळख पॅटर्न निर्माण करणारा जिल्हा अशी आहे. त्यामुळे स्वच्छता या घटकात मागे राहू नये यासाठी संघटीतपणे प्रयत्न करण्यात यावेत. नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसह सर्वच घटकांना या चळवळीत सहभागी करून घेण्यात यावे. यावेळी त्यांनी सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी निधीची उपलब्धता व तरतूद याबाबतही निर्देशही दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री चव्हाण, सावंत तसेच नागेश पाटील-आष्टीकर यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये पाणी पुरवठा, सिंचनासाठीचे पाणी, स्वच्छता विषयक, कृषि, विज आदी बाबींचा समावेश होता. त्याबाबत बैठकीत चर्चाही झाली. प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सुरवातीला टंचाई आराखड्याबाबतची व जिल्ह्यातील पाणीसाठ्याबाबतची स्थिती दर्शविणारे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे यांनी स्वच्छता विषयक व ग्रामीण पाणी पुरवठ्याविषयी माहिती दिली. शेवटी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. मोटे यांनी आभार मानले.
हंगामाच्या शेवटीपर्यंत शेतकऱ्याच्या तूर खरेदीसाठी नियोजन - कृषी राज्यमंत्री खोत

बैठकीत तूर खरेदीच्या अनुषंगानेही गंभीर चर्चा झाली. यावेळी राज्यमंत्री श्री. खोत यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल घेतला. आमदारांकडून उपस्थित जिल्ह्यातील विविध मुद्यांवरही निर्देशही दिले. ते म्हणाले की, तूर खरेदीबाबत दर आठवड्याला मंत्रालयात केवळ याच विषयावर बैठक घेण्यात येते. आतापर्यंत राज्यात  31 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यापोटी 1 हजार 288 कोटी निधीचेही वितरण करण्यात आले आहे. बाजारात हंगामाच्या शेवटीही तूर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याकडून तूर खरेदी करता यावेत, असे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचेही ते म्हणाले.
शेतीतील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर - सदाभाऊ खोत
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानास प्रारंभ

नांदेड, दि. 9 :- शेती उत्पन्न, साठवणूक, पणन या सर्व टप्प्यांवरच पायाभूत सुविधांच्या विकासांवर भर देण्याचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान महत्त्वपुर्ण आहे , असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केले. ते नायगाव तालुक्यातील गडगा- नावंदी शिवारातील अर्जुन कोनोले यांच्या विकास नर्सरीत आयोजित उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. पी. गोंडेस्वार, उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी. भरगंडे, कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, प्रकल्प संचालक एस. व्ही. लाडके तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा. प्रकाश पोकळे, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, विकास नर्सरीचे अर्जून कोनोले, सतिश कोनोले आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले की , उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान हे महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्याची पद्धत सुरु केली. यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील नव-नवीन गोष्टी जाणून घेण्याचाही प्रयत्न आहे. शेतीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास व्हायलाच पाहिजे असे प्रयत्न आहेत. त्यासाठी सुक्ष्म सिंचनाचे गेले कित्येक वर्षे रखडलेले अनुदानही वितरीत करण्यात आले आहे. कांदा चाळ उभारणीसाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना नेहमीच पाठींबा राहीला आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणासाठी प्रयत्नशील शेतकऱ्यांना बी-बियाण्यांची खरेदी, शेती अवजारांची, निविष्ठांची खरेदी खुल्या बाजारातूनही करण्याची मुभा दिली आहे. खरेदीची पावती कृषी विभागाकडे जमा करताच, अनुदान थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सुरवातीला भाजीपाला नियमनमुक्तीलाही मोठा विरोध झाल्याचे नमूद करून श्री. खोत म्हणाले की, नव्या गोष्टीला सुरवातीला विरोध होतोच पण त्यावर ठाम राहिल्याने, यशही मिळते. हे यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठीही शेतकरी कंपन्यांना परवागनी दिली आहे. यापुढे या शेतकरी कंपन्यांना सोयाबीन खरेदीची परवानगी दिली जाईल. राज्यातला शेतकरी कर्जमुक्त व्हावा पण तो पुन्हा कर्जाच्या विळख्यात अडकू नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचसाठी शेतीमालाच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज, गोदामांची उभारणी, त्यावर मालतारण कर्ज योजना राबविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शेती हा आता व्यवसाय म्हणून करावा लागेल. त्यासाठी सरकारची योजना, शेतकऱ्यांची कष्ट आणि बँकाची मदत अशी सांगड घालावी लागेल. याचसाठी गावा-गावात पोहचून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न असेल. शेतीवर आणि पर्यायाने शेतीवर होणाऱ्या लहरी हवामानाचा परिणाम टाळता यावा यासाठी राज्यात 2 हजार 65 ठिकाणी स्वयंचलित हवामान अंदाजाची यंत्रणा कार्यान्वीत केल्याचेही त्यांनी सांगितले. जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि स्वर्णजयंती राजस्व अभियानातून पाणंदमुक्ती हे अभियानही प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाणंद मुक्तीसाठी गावा-गावांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने झाली. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी अभियानाचे उद्घाटन प्रगतीशील शेतकरी प्रल्हाद पाटील-होटाळकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. मोटे यांनी प्रास्ताविकात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाविषयी माहिती दिली.  कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. खोत यांनी शेतकऱ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी उमाकांत देशपांडे, शेषराव वडजे, के. एफ. पठाण, शंकरराव राजेगोरे, शंकर जाधव, दत्ता गिरे या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्याविषयी चर्चाही केली. कृषी विभागाच्या विविध माहितीपुस्तिका व घडीपत्रिकांचेही राज्यमंत्री श्री. खोत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच काही प्रगतीशील शेतकऱ्यांचाही राज्यमंत्री श्री. खोत यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. गोंडस्वार यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांशी हितगूज , अगंत-पंगतीत जेवण
तत्पुर्वी, राज्यमंत्री श्री. खोत यांनी कोनोले यांच्या विकास नर्सरीची पाहणी केली. यात त्यांनी शेततळे, आंबा, अंजीर  यांच्यासह विविध फळपिकांची पाहणी केली. श्री. कोनोले यांच्याकडून विविध बाबींची माहिती घेऊन त्यांचे कौतूकही केले. कार्यक्रमापुर्वीच त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी आस्थेवाईक संवाद साधला, विविध विषयांवर माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करतच जमिनीवर बसूनच अंगत-पंगतीत दुपारचे जेवणही घेतले.

00000
आर्थिक लाभ थेट शेतक-यांच्या बँक खात्यात (डीबीटी)
                                                       -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मी मुख्यमंत्री बोलतोय...’ मध्ये मुख्यमंत्र्यानी साधला जनतेशी संवाद

  मुंबई, दि.9 : डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफरच्या (डीबीटीमाध्यमातून अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या थेट  खात्यात जमा होणार आहे. यापुढे  शेतक-यांना  अवजारे खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या  मी मुख्यमंत्री बोलतोय... या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना दिली.
                 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय... संकल्प शाश्वत शेतीचा या विषयावरील हा कार्यक्रम आज सकाळी प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधून शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरे दिली.
     ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण प्रश्न मांडताना म्हणाले, अवजार खरेदीबाबत  गैरव्यवहार होत असून शेतक-यांना थेट अनुदान मिळाले तर त्यांनी अवजार खरेदी करून खरेदी केलेल्या अवजाराचे बील आणि अवजाराचे छायाचित्र कृषी विभागाकडे ई मेल वर पाठविले तर कृषी विभागाने या बाबीला मान्यता द्यावी. या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक दिवसांपासून अवजारे खरेदी संदर्भात तक्रारी  येत होत्या. हेच लक्षात घेवून जानेवारी 2017 मध्ये डायरेक्ट बेनिफीट  ट्रान्सफर च्या संदर्भात निर्णय झाला आहे आणि याबाबतचा शासन निर्णयही निघाला आहे.आता यापुढे  शेतक-यांनी अवजारे खरेदी करून अवजारे  खरेदीचे बील आणि  छायाचित्र अगदी व्हॉटसएप वर पाठवले तरी चालू शकेल.
                     कर्जमाफी ऐवजी संकल्प शाश्वत शेतीचा’ या विषयावर भर देणार मुख्यमंत्री
                  कर्जमाफी हा अंतिम अथवा रामबाण उपाय नाही हा अनेक उपायांपैकी तो आहे. कारण 2008 या वर्षी जेव्हा शेतक-यांची कर्जमाफी करण्यात आली तेव्हांचा कॅगचा अहवाल हेच सांगतो की ज्या शेतक-यांना कर्जमाफीचा खरा लाभ झाला त्यांची संख्या  तीस ते  चाळीस टक्के होती. ख-या अर्थाने ज्या  शेतक-यांची स्थिती बिकट होती त्यांना या  कर्जमाफीचा कोणताही लाभ झाला नाहीआपण कर्जमाफी करतो म्हणजे पुन्हा एकदा कर्ज घेण्यास त्यां  शेतकऱ्यांना पात्र करतो. त्यामुळे 2008 साली कर्जमाफी  मिळालेले शेतकरी पुन्हा कर्ज काढून कर्जबाजारी झाले होते.
             खरं तर शेतकरी कर्जबाजारी होवू नये यासाठी शेती क्षेत्रात शाश्वत प्रयत्न झाले पाहिजेतमहाराष्ट्रात आज रोजी एकूण  31 हजार कोटी रूपये गुंतवणूक आहे आणि शेतक-यांची कर्जमाफी करायची तर  30 हजार कोटींची आवश्यकता आहे. एकीकडे कर्जमाफी ही तात्पुरता उपाय आहे कारण एकवेळा कर्जमाफी केले तर पुन्हा कर्ज काढले जाईल आणि दरवर्षी भांडवली गुंतवणूकी ऐवजी कर्जमाफी करणे ही अशक्य गोष्ट आहेकारण आपल्याकडे असणा-या पैश्यातून हे करायचं आहे. त्यामुळे भांडवली गुंतवणूक वाढवून न शेती शाश्वततेकडे नेणे, दरवर्षी क्रापींग पॅटर्न बदलणे,शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे, सिंचन व्यवस्था वाढविणे, शेतीला शाश्वत वीज आणि पाणी या गोष्टीवर भर देवून शेतीमधील उत्पादकता वाढविणे,उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न वाढविण्यावर भर देणे, शेतक-यांना अधिक नफा मिळवून त्यांनी काढलेले कर्ज फेडण्याची क्षमता वाढविणे यावर भर देणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
           कर्जमाफी या विषयावर कन्हैया पगारे यांनी ई मेल व्दारे प्रश्न विचारला होता की अल्पभूधारक शेतक-यांसाठी  एक लाख रूपये तर पाच एकरपेक्षा जास्त् शेतीचे क्षेत्र असणा-या शेतक-यांना दीड लाख रूपये  मदत दिली तर कर्जमाफीचा प्रश्न सुटण्यास मदत होवू शकेल का ? अहमदनगर  येथील गणेश अवसणे यांनी सुध्दा शेतक-यांनी कर्ज घेवू नये साठी  काही कायमस्वरूपी उपाय आहे का  असा प्रश्न विचारला होता यावरती मुख्यमंत्र्यांनी  वरील उत्तर दिले होते.
           या कार्यकमात डोंबिवली येथील पुरूषोत्तम आठल्येकर,हिंगोली येथील रामचंद्र घरत सोलापूर येथील देविदास मोरे यांनीही प्रश्न विचारले होते.
                                                            *****

                         दूरदर्शनवर सोमवारी  ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...
               या कार्यक्रमाचे होणार सायंकाळी साडेपाच वाजता पुन:प्रक्षेपण
              राज्यातील जनता आणि मुख्यमंत्री यांच्यातील संवाद दृढ होण्यासाठी  ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्रमाचे आयोजन माहिती  जनसंपर्क महासंचालनालय मार्फत करण्यात आलेआहेया कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प शाश्वत शेतीचा’  या विषयाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात राज्यातील जनतेने ई मेलव्हाटस ॲप व्दारे आणि थेट विचारलेल्या   प्रश्नांना दिलेली उत्तरे ऐकायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सोमवार दिनांक 10 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5:30 वाजता.
                     दिलखुलास मध्ये जरूर ऐका सोमवारी आणि मंगळवारी मी मुख्यमंत्री बोलतोय...
                    राज्यातील जनता आणि मुख्यमंत्री यांच्यातील संवाद दृढ होण्यासाठी  ‘मी मुख्यमंत्री बोलतोय...’ या कार्यक्रमाचे आयोजन माहिती  जनसंपर्क महासंचालनालय मार्फत करण्यात आलेआहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प शाश्वत शेतीचा’  या विषयाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात राज्यातील जनतेने ई मेलव्हाटस ॲप व्दारे आणि थेट विचारलेल्या  प्रश्नांना  दिलेली उत्तरे ऐकायला विसरू नका आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून दिलखुलास या कार्यक्रमात सोमवार आणि मंगळवारी दिनांक 10 आणि 11 एप्रिल 2017 रोजी सकाळी 7:25 ते 7:40 या वेळेत.
        

                                                           *****

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...