Sunday, April 9, 2017

शेळगाव गौरीतील उपक्रमशीलतेचे
राज्यमंत्री खोत यांच्याकडून कौतूक
नांदेड, दि. 9  :-  नांदेड जिल्हा हा पॅटर्न निर्माण करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात शेळगाव-गौरीसारखे उत्कृष्ट गाव आहे, याचा अभिमान वाटतो. या गावाकडून प्रेरणा घ्यावी, असे कौतुकोद्गार राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले.
नांदेड दौऱ्यावर आले असताना राज्यमंत्री श्री. खोत यांनी नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी या आदर्श गावाला भेट दिली. एकेकाळचे महाराष्ट्राचे स्वच्छता दूत म्हणून माधवराव पाटील शेळगावकर यांनी हे उत्कृष्ट पूनर्वसित गाव वसवताना हागणदारी मुक्तही हे गाव केले आहे. या गावातील अभिनव व नाविन्यपुर्ण संकल्पना पाऊन राज्यमंत्री खोत मुक्तकंठाने प्रशंसाही केली.
शेळगाव गौरी गावाची उंच टोलेजंग इमारत, गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महिलांसाठी मशिनकला प्रशिक्षण केंद्र, काँक्रीटचे रस्ते अशा विविध विकास कामाची पाहणी करुन राज्यमंत्री खोत यांनी  ग्रामस्थांचे कौतुकही केले. या गावाला जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरचे स्वच्छता तसेच जलसंधारणाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. निर्मलग्राम, पर्यावरण ग्रामसंतुलीत गाव म्हणून दोनवेळा राष्ट्रपतींच्या हस्ते या गावाला पुरस्कार मिळाले आहेत.
राज्यमंत्री खोत यांनी गावातील महिलांसाठी कपडे धुण्यासाठी धोबीघाट पाहून या उपक्रमाचे कौतुक केले. धोबीघाटावरील महिलांशी त्यांनी चर्चा केली. गावाला जलशुद्धीकरण प्रकल्पामधून अॅक्वासारखं शुद्ध थंडगार पाणी दिले जाते, या प्रकल्पाचीही पाहणी केली. यावेळी शेळगाव गौरीचे सरपंच सदाशिव पांचाळ, उपसरपंच संजय पाटील शेळगावकर  यांनी राज्यमंत्री श्री. खोत यांचे स्वागत केले व त्यांना गावाची माहिती दिली.
या गावाप्रमाणेच राज्यातील अनेक गावे निर्माण करण्याचा मनोदय राज्यमंत्री खोत यांनी यावेळी व्यक्त केला. अशी अनेक निर्मल गावे तयार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची अपेक्षाही राज्यमंत्री खोत यांनी यावेळी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील आमदार आदर्श गाव म्हणून दत्तक घेतलेल्या सैनिक अपशिंगे या गावाची अभ्यास सहलही शेळगाव गौरीला आयोजित करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शेळगाव गौरीतील मोतीराम पाटील शिंपाळे, हुसेन साहब सय्यद, नागोराव पाटील, लक्ष्मण वाघमारे, श्रीराम घाटोळे, कुंदन टेकाळे, कोंडीबा इंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...