Monday, April 19, 2021

 

अल्पसंख्यांक विकास व औकाफ,

मंत्री नवाब मलिक यांचा दौरा  

 

नांदेड, दि. (जिमाका) 19 :- राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार 20 एप्रिल 2021 रोजी दु. 4.15 वाजता विमानाने नांदेडकडे प्रयाण. सायं 5.45 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं 5.55 वाजता शासकीय  विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

0000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या

पात्र परिसरात कलम 144

नांदेड, दि. (जिमाका) 19 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 एप्रिल 2021  पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 एप्रिल 2021  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

 

  ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर

-पालकमंत्री अशोक चव्हाण  

नवीन जम्बो कोविड केअर सेंटरला आज पासून प्रारंभ

ऑक्सीजनसह इतर यंत्रणेची पालकमंत्र्यांनी भेट देवून केली पाहणी


                                                                               नांदेड, दि. (जिमाका) 19 :-

जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करीत आहोत. सोळा तालुक्यासह आपल्या जिल्ह्याचा विस्तार मोठया प्रमाणात असला तरी प्रत्येक तालुका पातळीवरील आणि ग्रामीण भागात जिल्ह्यातील बाधितांना आरोग्याच्या सुविधा सुलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितले असून आजच्या घडीला ऑक्सीजनच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

नांदेड महानगरातील आणि जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधिताची संख्या लक्षात घेवून भक्ती लॉन्स येथे आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवून जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन व पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.

 


नांदेड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.  प्रत्येक तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटरसह मालेगाव, अर्धापूर सारख्या गावातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड बाधितांसाठी उपचार केंद्र सुरु करीत आम्ही  ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि परिपूर्ण करु असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात असून याचा तुटवडा आहे हे नाकारता येत नाही. राज्यात सर्वत्रच याचा तुटवडा असून शासनातर्फे वितरक आणि उत्पादक यांच्याशी समन्वय साधला जात आहे. जिथे आवश्यकता वाटते आहे त्याठिकाणी कायदेशिर कार्यवाही करुन मार्ग काढीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

 

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर जी काही माहिती असेल ती मिळणे आवश्यक असून यासंदर्भात प्रत्येक कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल येथे माहिती केंद्र सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या. या नवीन कोविड केंद्रातील ऑक्सीजन यंत्रणा आणि इतर साहित्य चांगल्या स्थितीत सुरु आहे की नाही यांची खातरजमा त्यांनी स्वत: करुन घेतली. या दोनशे खाटांच्या भव्य कोविड हेल्थ सेंटर येथे सर्व बेड ऑक्सीजन यंत्रणेसह असून आवश्यक तो सर्व स्टाफ ही महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन दिला आहे. सद्यस्थितीत 112 जणांचा स्टाफ असून तो चार शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहे. तसेच चोवीस डॉक्टराचे पथक या जम्बो सेंटरमधील रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन करेल.  रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...